– अनंत नारायण संझगिरी
🙏🏻*मनोगत*🙏🏻
मित्रहो ……
ह्यापूर्वी “आठवणीतील मुकेश ची गाणी” हे सदर पाठवून त्यात ‘कथानायकाच्या’ त्या त्या वेळच्या मनःस्तिथीत, त्याला आठवलेली, आणि त्याच्या नायिकेला आवडणारा गायक “मुकेश”ची काही “सोलो गाणी”, खाली दिलेल्या लिंक वर आहेत.
आणि आता ह्या सदरात, त्याची ‘नायिका’ त्या वेळी, ज्या ज्या मनःस्तिथीत होती, त्यावेळी तिला आठवलेली, तिच्या आठवणीतील गाणी पाठवीत आहे.
***********************
…………(०१)
आज अचानक आणि माझ्या आयुष्यात प्रथमच, मनाच्या ह्या अश्या उर्मी ह्या इवल्याश्या नाजूक हृदयात का बरं उचंबळून याव्यात? असे हे ‘शब्दातीत’….. एक अनामिक आकर्षण आणि आजपर्यंत जे कधीच कोणाबद्धल वाटलं नाही ते आज, एका अनोळखी,आणि अपरिचित असूनही “परिचित” वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल वाटावं ह्याचं खरोखरीच नवल वाटतंय, अशी एक ओढ जी शब्दात व्यक्त करणे कठीण, पण तरीही हवी हवीशी वाटणारी, मनाला उभारी देणारी, आणि “आपलं” कोणी तरी ह्या जगात आहे जे ‘विधात्याने’ फक्त आपल्या साठीच जन्माला घातलय, अशी स्पष्ट जाणीव करून देणारे मनाचे तरंग सर्व शरीरातून उभारून का यावेत….??? सर्वांगावर असे गोड रोमांच उभे राहिले. नजरेत एक जबरदस्त ओढ आणि पहिल्याच नजरेत मला ‘आपलंसं’ करून टाकायची किमया करणारा हा “जादूगर” सर्वांगावर प्रेमाच्या जादूची कांडी फिरवून, मला मोहित करून, आपलंसं करून गेला. ‘रातराणी’ फुलून एक मादक सुगंध ढगाआडून डोकावणाऱ्या द्वितीयेच्या चंद्र कोरीने सर्वांगावर शिंपडला. मी त्याच्या नजरेत नजर मिसळून मोहित मनाने ‘सर्वस्वी’ त्याची झाल्याचा भास झाला. ‘दिवाळीच्या’ ह्या शुभ दिनी, नयनांच्या निरांजनात, त्याच्या प्रतिमेच्या प्रकाशाने मनाच्या रांगोळीवरील चमकणाऱ्या कलाबूतीत, असंख्य चांदण्यांनी फेर धरून, त्याने “हॅपी दीपावली” च्या शुभेच्छा देण्यासाठी, माझा हात हातात घेतला….. त्याच्या त्या अनामिक ओढीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने,माझ नाजूक मन, त्याच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत हळुवार त्या रातराणीच्या कळ्यांची ओंजळ रिते करून, मी त्याच्या नजरेत माझ्याच प्रतिमेची नजर समरस झालेली पाहिली.आणि मी सुद्धा ओठातल्या ओठात पुटपुटले……. “सेम टू यु”……..
…………(०२)
‘कल्पनाने’ ओळख करून दिली….. “यश”… तिचा ‘आते भाऊ’ आणि मग, ह्या पूर्वी, त्याला आमच्या ‘सारस्वत समाज्याच्या ग्रुप’ मध्ये ओझरते पाहिल्याचं, आता कल्पना च्या सांगण्या वरूनच मलाही आठवलं. ‘त्याला’ कधीतरी मला प्रत्यक्ष भेटायचंच होतं, म्हणून ती मुद्धाम ‘दिवाळीच्या निमित्ताने’ त्याला भेटायला, आमच्या घरी घेऊन आली. मी तशी ग्रुप मध्ये ‘विभा’ बरोबर गेली तरी फारशी कोणा मद्धे मिसळत नसे, कल्पना माझी कॉलेज पासूनची जिवलग मैत्रीण, त्यामुळे आमच्या गप्पा चालायच्या. आज पाहिल्यांदाच त्याला जवळून नीट पाहिला, आणि ‘प्रथमदर्शनी’ की काय म्हणतात तसे “लव ऍट साईट” झाल्याची मनाने खूणगाठ बांधली. एकार्थाने मी सुद्धा कुठेतरी मनातून सुखावली. कॉलेज मध्ये असताना तसे आपणहून माझ्या पुढे पुढे करणारे सुद्धा मी पाहिले होते, पण मला कोणाबद्धल ‘तसं’ काहीच कधी वाटलं नाही, त्यावेळी आपण बरं, की आपला अभ्यास बरा. पण आज ‘यश’ ला भेटून मात्र, ज्याची मी वाट पाहत होते ‘तोच’ हा माझ्या ‘स्वप्नातील राजकुमार’ असल्याची खात्री पटली. कल्पनाच्या म्हणण्या प्रमाणे ग्रुप मध्ये तर हा नेहमीच येत होता, तर मग माझी भेट अगोदरच कशी झाली नाही? मला वाटतं प्रत्येक घटनेला स्वतःची अशी एक ‘वेळ’ यावी लागत असेल. एकंदरीत ही दिवाळी तरी, आता नक्कीच चांगली जाणार ह्याची खात्री पटली. माझ्या सुखावलेल्या मनानी, माझ्या चेहेऱ्यावर ‘कबुलीची’ पावती दिली असावी, बऱ्याच दिवसांनी माझ्या चेहेर्यावरचे प्रसन्न भाव, आणि माझे “स्मित हास्य” पुन्हा झळकल्याचे, ‘विभाच्या’ आणि ‘कल्पाच्याही’ बहुदा ते लक्षात आले असावे……….
…………(०३)
“यश” शुभेच्छा देऊन निघून गेला खरं, पण माझं मन मात्र अजून त्याच्या नजरेतच रेंगाळले होते. साधारण तासभर तो आणि कल्पना आमच्या घरी होते, पण माझं मन आणि लक्ष, ‘कल्पाच्या’बोलण्या कडे कमी आणि त्याच्याच कडे, त्याच्या बोलण्याकडे अधिक होतं. पाडव्याच्या, नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रुप चे बरेच जण आमच्या घरी येणार म्हणून विभाच्या आग्रहाखातर मी मोरपिशी रंगाचा नऊवारी शालू, आणि नाकात नथ, आणि त्यावर आईचे, “तिने” माझ्या लग्नात मला देण्यासाठी ठेवलेले दागिने घालून पारंपारिक वेशभूषा केली होती. माझं हे रूप पाहून बऱ्याच जणांनी मला ‘कॉम्प्लिमेंट्स’ दिल्या पण “साक्षात लक्ष्मी” हीच “कॉमेंट” हृदयात घर करून बसली. त्याच्या नजरेतले भाव,त्याची बोलण्याची पद्धत,ती ओघवती भाषा,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा “सेन्स ऑफ ह्युमर” मनाला गोड स्पर्श करून गेला.फराळ खातांना, वास्तविक आमच्या कडच्या ‘चकल्या’ ह्या अतिशय तिखट झाल्या असल्याची कबुली बाकीच्यांनी सहजपणे दिली, पण त्या “मी” केल्या आहेत हे कळल्यावर, “वाह चकली एकदम फर्स्ट क्लास,पण इतकी… ‘गोड’ कशी? हाताचा गोडवा उतरलाय वाटत? अशी ‘सारक्यास्टिक, मिश्किल’ कॉमेंट, आणि बेसन लाडू खातांना, “पुढच्या वेळी, नुसत्या हाताने वळले तरी गोडच लागतील. .. “गोड माणसांना” त्यात साखर घालायची गरजच नाही.” असे माझ्याकडे मिश्किल पणे बघत, माझ्यासकट, माझ्या फराळाची तारीफ त्यांनी दिलखुलास पणे केली.जी ओढ मला वाटत होती तितकीच ओढ मला त्याच्याही नजरेत जाणवली. ईश्वराने बहुदा आम्हाला एक मेकांसाठीच जन्माला घातले असावे असा ठाम विश्वास त्या क्षणी अंतर्मनाला स्पर्शून गेला.आणि मनाला सुखाचे पंख लागून उंच उंच अवकाशात, दारातील आकाश कंदिलातील आणि, तोरणांच्या लुकलूकत्या रंगीबेरंगी माळीतील एक एक काजवा, मला चांदण्यात न्हाऊन भविष्याच्या सुरेल, स्वप्नात घेऊन गेले……….
…………(०४)
आजपर्यंत क्लब मध्ये जाण्यात मला तसे फारसे स्वारस्य वाटत नसायचे, विभाच्या आग्रहाखातर, आणि कल्पा ही भेटेल, असा विचार करून शक्यतोवर शनिवारी संध्याकाळी आम्ही ‘समाजा’ मध्ये जात असू.पण आताशा कधी एकदा शनिवार उजाडतो, आणि मी ‘ ग्रुप’ मध्ये जाते अशी मनाची अवस्था झाली होती. ‘यश’ भेटणारच…. ह्या गोड कल्पनेवर,आणि आशेवर, माझी ही अस्वस्थता आणि अधीरता विभाच्याही लक्षात आल्या खेरीज राहिली नाही. आमच्या ‘ज्ञातीतीलच’ सगळे तेथे भेटत असत, बरेच नातलगही तेथे असायचे.माझा आतेभाऊ “अतुल” आणि “यश” हे कॉलेजचे ‘जिवलग मित्र’ आहेत, हे मला मात्र, ह्या वेळीच समजलं. यश परवा आमच्या घरी आलेला, तेही विभाने अतुल च्या कानावर बोलता बोलता घातले. त्या दिवशी महत्वाच्या ऑपरेशन मध्ये बिझी असल्या कारणाने तो घरी येऊ शकला नव्हता. आज आम्ही सर्व जण मजेत गप्पागोष्टी, टिंगल टवाळी करीत होतो. पण यश चे सर्व लक्ष फक्त माझ्यावरच केंद्रित होते. ह्या आधी सुद्धा त्याने मला ग्रुप मध्ये बऱ्याच वेळा पाहिले असणार, पण आज माझ्याशी प्रत्यक्ष ओळख झाल्यामुळे तो प्रफुल्लित होता.मध्येच तसे कोणाचे फारसे लक्ष नाही हे पाहून मला चटकन, हलकेच, म्हणाला “स्मित” तू जवळ असशील तर, तुझ्या मुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ येईल”…. माझं नाव “स्मिता”, पण “यश” ‘स्मिता’ वरून ‘स्मित’ वर आला, आणि मी मोहरून गेले. गालावरची खळी आणखीनच खुलली. वास्तविक तो जे म्हणाला, ‘तसच’ आणि ‘तेच’ मलाही त्याला सांगायचे होते, पण अतुल आणि विभा पटकन तेथे आल्यामुळे, माझे शब्द ओठांवर येऊन सुद्धा जिभेवरच विरघळून सर्वांगात एक गोड लकीर पसरवून गेले. चेहेर्यावरचे स्मिताचे “स्मित” मात्र लपवणे, मला कठीण गेले.पण “समझने वालोंको इशारा काफी”… “यश” काय समजायचे ते समजून गेला असणार, हृदयाला, हृदयाची भाषा नक्कीच अवगत असते. जीवनात भविष्याच्या काळोख्या भासणाऱ्या रात्रीत, यश च्या आगमनाने आणि आधाराने पहाट होऊन, अंधक्कार नष्ट होऊन, जीवनाचा मार्ग प्रकाशमय आणि सुखकर होईल अशी आशा निर्माण झाली. इतके दिवस, इतके जवळ असूनही आम्ही एकमेकांपासून दूर कसे राहिलो? ह्याचच मनाला नवल वाटलं. आपल्या मनात प्रेमाचा अंकुर असतोच, पण त्याचे वृक्षात रूपांतर व्हायला, कोणाच्या तरी हृदयातील प्रेमाचे खतपाणी मिळणे आवश्यक असते. मानवी ‘मनाचेही’ असेच असावे, ह्या नाजूक कळ्या तेव्हाच खुलतात, आणि फुलून त्यांचे फुलात रूपांतर होऊन, त्या सुगंध तेव्हाच दरवळतात, जेव्हा त्यांना प्रेमरूपी प्रकाश, रिझवायला, फुलवायला मदत करतो…. “यश” मध्ये मला आशेचा किरण सापडला, “प्रेमात पडणे” म्हणजे काय असते ते उभ्या उभ्या मला, येथे, आता जाणवायला लागलंय……….
…………(०५)
मी कोणाच्या ‘प्रेमात’ कधी पडेन असं मलाही कधीच वाटलं नव्हतं, मी चोखंदळ वृत्तीची, प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेणारी, विभा आणि कल्पाच्या दृष्टीनेही ‘व्हेरी प्रॅक्टिकल’ आणि त्यातून मानी, त्यामुळे “आमची ताई तसं कोणाला मीठ घालायची नाही” ह्या आपल्या मतावर विभा ठाम असायची. पण कल्पना मात्र बरेच वेळा म्हणायची तू “प्रॅक्टिकल” असशीलही, पण फार “हळवी” आहेस, तशीच “साधी” आहेस, तेव्हा एखाद्या वेळी पटकन प्रेमात पडून ‘फसूही’ शकतेस. माझ्या बद्धल कोणाला काय, तर कोणाला काय, असं वाटत असलं तरी आज मी स्वतःही यश च्या प्रेमात पडल्याचे मला प्रकर्षाने जाणवू लागले आहे. तसं नसत तर जे कधीही, कोणाबद्धलही वाटलं नाही, ते नेमकं “यश” बद्धलच का वाटावं? त्याला सारख बघावं, भेटावं, त्याच्याशी बोलावं, त्याच्या सानिध्यात सारखं राहावं, असं मला वारंवार का वाटतंय, डोळ्यावर झोप असूनही, अशी मी रात्र रात्र जागून का काढतेय? डोळा लागायला, आणि त्याची मूर्ती डोळ्यापुढे दिसायला एकच गाठ पडायची, आणि मग त्याच्याच विचारात पूर्ण रात्र सरून जायची. तो फक्त शनिवारी संध्याकाळीच समाजात भेटायचा. ह्या आठवडा भरात त्याचीही अवस्था माझ्या सारखीच व्हायची, आम्ही एकमेकांना कधी भेटतो असं व्हायचं. रात्री बरेच वेळा ‘अनुराधा’, ‘स्वाती’ ह्या माझ्या आवडत्या नक्षत्रांची रांगोळी, ‘विधात्याने’ आकाशाच्या निळसर पटावर, कुठे काढली आहे का, ते मी शोधायची. माझी झोप पूर्ण होत नव्हती, त्याचा थोडा परिणाम माझ्या प्रकृती वर मला जाणवू लागला होता. त्याचा विचार,त्याचे नजरेसमोर वारंवार येणारे रूप, ह्याची मला एकप्रकारची गोडीच लागली. त्याच्या शिवाय बाकी काही नसले तरी चालेल, अशी मनाची धारणा होऊ लागली. “जेवणात पण माझे लक्ष नाही”, अशी तक्रार विभाकडून येत होती. हळू हळू माझ्या बद्धलची तिची ‘नाराजी’ ती बोलून दाखवू लागली. मी माझ्या ‘प्रकृतीला’ जपावे ह्याचा अट्टाहास ती करायची……. पण मी खूष होती, मन बहरलेलं असायचं, मला वाटतं मनाची ताकद शरीराच्या ताकदीपेक्षा कधीही श्रेष्ठ असते…….. माझ्या ह्या अवस्थेलाच, “प्यारमें पागल”, असं म्हणत असावेत का???……….
…………(०६)
जी ओढ मला यश बद्धल होती नेमकी तीच ओढ त्याच्या नजरेत पाहून माला खूपच बरं वाटायचं, माझे दिवस आनंदात जाऊ लागले. आतापर्यंत मी माझे वाढदिवस तसे कधी साजरे केले नव्हते, वाढदिवासाच्या दिवशी ‘उपास’ करून माझ्या आवडत्या ‘श्री शांतादुर्गेची’, आमच्या कुलदेवतेची, मनोमन पूजा करून, फक्त रात्री एक वेळच जेवून मी उपास सोडायची. त्यामुळे बाकीच्यांचा आग्रह असला तरी सर्वांना बोलावून वाढदिवस साजरा मी कधीही केला नाही. पण ह्या वेळी “यश” ने मला सर्वांसमोर गळ घालून “काहीही करून तो स्वतः आमच्या घरी येऊन, “सेलिब्रेट” करणार आहे”, असा आग्रह धरल्यामुळे आणि ‘अतुल’ नेही त्याला पुस्ती जोडल्याने, नाईलाजाने त्याच्या प्रस्तावाला मी होकार दिला. ‘नववर्षाच्या शुभेच्छा’ देण्यासाठी सुद्धा, कल्पना बरोबर तो घरी येऊन गेला होता, आणि आता लगेच दोन दिवसा नंतर पुन्हा त्याची, ह्या एका आठवड्यातली ही तिसरी भेट होणार होती. ‘खुदा जब देता है तो छप्पर फाड के’ हे काही खोटे नाही. प्रत्येक भेटी नंतर मनाची जवळीक वाढत होती,आणि अधीरता पूर्णत्वाच्या मार्गावर होती. उद्धया वाढदिवस, पण सर्व रात्र मी जागूनच काढली, वास्तविक उठल्या उठल्या देवीचं ‘नाव’ आणि ‘ रूप’ डोळ्यांपुढे येताना आज त्याचं ‘यशा’ तही रूपांतर झालं,देवीच्या मनात पण तसच असेल का? मन देवीवर केंद्रित करताना, आज ‘श्री मंगेशा’ची सुद्धा प्रकर्षाने जाणीव झाली. ‘श्री शांतादुर्गा’ हे पार्वतीचेच रूप आणि ‘श्री मंगेश’ हे शंकराचे, आज “जोडीने” दोघे माझ्या डोळ्यासमोर आले. आणि मी नतमस्तक झाले. यश चे कुलदैवत सुद्धा गोव्याचेच, ‘श्री मंगेश’, काय योगायोग असतात पहा, लहान पणा पासून मला ‘गोव्याची’, ह्या कुलदेवतांची ओढ, आणि मी लग्न करेन, जोडीदार निवडीन तर ‘श्री मंगेशा’ चाच, असं मनोमन ठरवलं होतं,आणि योगा योगाने आणि शांतादुर्गेची ‘कृपा’ म्हणूनच बहुदा यश माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून येणार ह्याची खात्री वाटत होती…. तसे संकेतही ‘नियती’ देत असावी….. माझ्या आयुष्यातील आजचा माझा हा वाढदिवस, यश कडून “विशेस” मिळून, भावी आयुष्यात बहुदा “विशेष” काही तरी घडवून ‘यशाच्या’ मार्गावर नक्कीच नेणार……….
…………(०७)
आज ३ जानेवारी, माझा ‘वाढदिवस’, लहानपणी आई असेपर्यन्त च्या माझ्या झालेल्या वाढदिवसांच्या कोडकौतुकाच्या आठवणी, मी हृदयात जपून आहे, आई गेल्यापासून मी तो कधीच तसा साजरा केला नव्हता, वडिलांना खूप वाटायचं, पण आई नसल्याने मी तो ‘तिच्या’ आठवणीत उपास करून, आणि देवीचा दिवस मानून देवीची पूजाअर्चा करूनच साजरा करायची, कित्येक वर्षानंतर फक्त ‘यश ‘च्या आग्रहाखातर तो आज साजरा करायचा असं सर्वांनी ठरवलं होतं. यश भेटणार म्हणून मी खूष होते. सकाळ पासून तो कधी येतोय असंच मला झालं होतं.कल्पना बरोबर संध्याकाळी 5 च्या सुमारास तो आला, अतुल सकट, ग्रुप मधील बाकीचे ही होतेच, पण ह्या सर्वात मला फक्त तोच दिसत होता. शुभेच्छा देताना त्याच्या हाताच्या स्पर्शाने, मी मोहरून गेले.त्याच्या हातातील त्याने ‘गिफ्ट’ म्हणून आणलेले छोटेसे “हार्ट शेप” पेंडेंट, उघडले आणि त्यातील एका बाजूला ‘श्री शांतादुर्गेची’ आणि दुसऱ्या बाजूला ‘श्री मंगेशाच्या’ छोट्या मोहक, कोरीव मूर्तींना बघून मी भारावूनच गेले, सारे अंग शहारले, आज सकाळीच पूजेच्या वेळी झालेल्या “अनुभूती” ची पुन्हा प्रचिती आली. हा ‘योगायोग की दैवयोग’, मी अचंबित नजरेनं यश कडे पाहतच राहिले, मला दैवतांचे असलेले आकर्षण, ह्याला नेमके कसे काय कळलें, ह्याचेही आश्चर्य वाटले. “कोई खूब जानता है मेरी पसंदको” लटक्या मानेने, डाव्या खांद्यावरून माझ्या काळ्याभोर केसांच्या, जाड वेणीने छातीवर उचंबळून येत आपलीही पसंती दर्शविली.त्याने “ग्रीटिंग” ही स्वतः आपल्या हातानेच तयार केले होते, कार्डबोर्ड वर दोन हृदया कृती आकृत्या एकत्र करून, त्यावर सुवासिक फुलांच्या नाजूक पाकळ्या चिकटवून, त्यामध्ये वळणदार अक्षरात माझे नाव गुंफून, माझ्यावर कविताही लिहिली होती. कधी नाही तो माझा वाढदिवस इतका छान साजरा झाल्याने खुल्या मनाने त्याचे आभार मानून मी ‘पुन्हा’ त्याचा हात हातात घेतला…. “थँक्स”…. हाताच्या मूक स्पंदनातून,आणि मिश्किल नजरेतून, माझ्या हृदयाच्या स्पंदना पर्यंत पोहचत, त्याने “मला स्वीकारल्याची” पावतीही दिली. विभा आणि कल्पा ने ही खूप छान तर्हेने माझ्या वाढदिवसाची रंगत वाढवली, बाकीच्या मित्र मैत्रिणींनीही ‘प्रेसेन्ट्स’ आणली होती, पण माझं मन “यशमय” झाल्याने त्याचं मनाला तेव्हढं अप्रूप वाटलं नाही. ह्या सर्वांवर कळस चढला, जेव्हा ‘अतुल’ च्या आग्रहावरून, यश ने मला जुनी गाणी, आणि त्यात विशेषकरून “मुकेशची” आवडतात, हे कळल्या मुळे, एक सुंदर ‘गैर फिल्मी’ गीत, ज्या मध्ये ‘माझेच’ सुरेख वर्णन असावे असे गीत आपल्या सुरेल आवाजात म्हणून माझ्यासकट सर्वांनाच आश्चर्यचकित केले. माझ्या आवडत्या सुशील, सुंदर, गोड गळ्याचा, आणि हृदयाला भिडणाऱ्या दर्दभरी स्वरांचा “मुकेश” साक्षात माझ्या समोर उभा राहून मला क्षणात आपलंसं करून गेला……..
…………(०८)
“यश” मुळे माझा वाढदिवस, माझ्या अपेक्षे पेक्षा खूपच छान झाला. बऱ्याच वर्षानंतर तो आमच्या घरी साजरा झाल्याने विभा, कल्पा सर्वानाच खूप बरं वाटलं. मी तर खूपच आनंदात होते, आई आणि बाबांची खूप आठवण काढली. ‘देवीच्या’ मनात असल्या शिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते. हेच खरं, तिच्या मर्जीनेच बहुदा यशला तशी बुद्धी झाली असावी. थोड्याच दिवसानी तारीख ‘१८ जानेवारी’ ला त्याच्या ‘वाढदिवसाच्या’ निमित्ताने त्याने आम्हा सर्वांना ‘प्रीतम हॉटेल’ ला पार्टी देण्याचं कबुल करून, आम्हा सर्वांना आग्रहाने येण्याचे आमंत्रण देऊन आमच्या कडून तसे ‘प्रॉमिस’ सुद्धा घेऊन तो मोकळा झाला. शनिवारी नेहमी प्रमाणे तो ‘समाजात’ भेटेलच म्हणून मी हि खुषीत होते. का कळत नाही, पण हल्ली मला मध्ये मध्ये उगाच थकवा जाणवू लागला होता. कसलीही दगदग, धांदल नसूनही अचानक ‘विकनेस’ यायचा. विभाचे म्हणणे की हल्ली ‘मला नीट झोप लागत नाही’, त्यामुळे, जागरणामुळे सुद्धा प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असावा. मला दोन वर्षांपूर्वी झालेला आजार, हेच बहुदा ‘मूळ’ कारण असावे, असं माझं ‘अंतर्मन’ मला सांगत होते. एकीकडे शारीरिक त्रास जाणवत होता, पण यश चा विचार मनात आला त्याची आठवण आली की मग कसलीच अडचण जाणवत नसे, मनाला उभारी यायची प्रफुल्लित होऊन, मी पुन्हा भावी आयुष्याची स्वप्न पाहायला सुरवात करायची. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि आपला,मागील कोणत्या ना कोणत्या तरी जन्माशी संबंध असलाच पाहिजे,एकतर आपण त्यांचं, अर्धवट राहिलेल्या प्रेमाचं आपलं काही ऋण फेडण्यासाठी, अथवा ती व्यक्ती तिच्या काही प्रेमाच्या ऋणापोटी, आपल्या आयुष्यात पुन्हा ह्या जन्मात येत असावी. सुप्रसिद्ध विचारक, आणि लेखक “ब्रायन वेस” च्या ह्या विचारांशी आणि अभ्यासाशी, मी पूर्ण सहमत होते. यश चे नि माझे गेल्या जन्मीचे काहीतरी संबंध जर नसते, तर तो असा इतक्या वर्षानंतर अचानक येऊन सुद्धा, मला त्याच्या बद्धल इतकी ‘आंतरिक’ ओढ का वाटावी? तो “सोलमेट” असल्या शिवाय? काही माणसं आपणहुन, आपल्याला काही ओळख पाळख नसताना मदत करतात,त्यांचा काही फायदा तोटा न बघता, आपल्यावर प्रेमाची बरसात करतात,ह्या उलट आपण काही माणसांचे, काहीही वाईट न करता सुद्धा, ती आपलं उगाचच वाईट चिंततात. दोन व्यक्तींमधला जन्मोजन्मीचा हा संबंध आपण कधी समजूच शकत नाही,आणि ‘पुरुष’ आणि ‘स्त्रीचे’ प्रेम संबंध कळणे, तर त्याहुनही महान कठीण, आणि म्हणूनच परमेश्वराने निर्मिलेल्या विविध नात्यांकडे बघितल्यावर चक्रवायलाच होते. “एकच”, स्त्री, पण ती कोणाची तरी आई, बहीण, मुलगी, मैत्रीण, प्रेयसी, बायको,किती तरी विविध प्रकारची नाती, आणि किती विविध प्रकारचे प्रेमसंबंध. मानवी मनाची ही विविध रूपे खरोखरचं आकलनाच्या बाहेर आहेत. पण “ब्रायन वेस” म्हणतो तेच खरं, आणि मला पटतंय…… “ओन्ली लव्ह रीमेन्स”……..
…………(०९)
“यश” च्या वाढदिवसाला त्याची भेट नक्की होणारच होती, पण त्याला अजून १५ दिवसांचा अवकाश होता, त्यामध्ये अजून दोन शनिवारी, समाजात तो भेटेलच ह्याची खात्री होती. म्हणून मी खूष होते. पण माझ्या वाढदिवसाच्या ४ दिवसा नंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी नेहमीप्रमाणे, कल्पना बरोबर मी ग्रुप मध्ये जाण्याचे नक्की केले होते,पण ‘आयत्या वेळी’ तिला ऑफिस चे काही महत्त्वाचे काम निघाले म्हणून ती येणार नसल्याचे तिने कळविले, विभा आणि मी दोघीच समाजात गेलो. काय झालं कोणास ठाऊक, बहुदा आजचा दिवसच खराब असावा, आज यश सुद्धा आला नाही, माझा साफ हिरमोड झाला, आज भेटला की आपणहून त्याला, त्याच्यावरील माझ्या प्रेमाची कबुली देण्याचे मनाने ठरविलेच होते, पण तोच नाही म्हटल्यावर माझा मुडच साफ गेला. अपेक्षा भंगासारखे दुसरे दुःख नसावे. कदाचित उशिरा सुद्धा का होईना, तो येईलच म्हणून नजर भिरभिरत होती, कशातच लक्ष लागत नव्हतं, “हल्ली” माझं असच झालय, मन अगदी विचित्र वागतय, जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, की ते बेचैन होतं. थोडी चीडचिडही होते,उगाचच नको नको ते विचार मनात येऊन, छातीत धडकीच भरते,गर्भगळीत झाल्या सारखे वाटते आणि एकदम थकवा येतो. मी मनाला समजावण्याचा प्रयत्न करू लागले, खरंतर ही साधीच गोष्ट, आत्ता नाही भेटला, आज नाही भेटला,तर पुढे भेटेलच की,… पण नाही, ते मानायला तयारच नव्हतं, त्याने आत्ताच भेटायला हवं…. ह्या माझ्या मनाला मी आता कसं समजावू….? माझा उतरलेला चेहेरा, आणि माझी झालेली केविलवाणी अवस्था,सर्वांच्याच हास्याचा विषय बनली, विभाला हे बिलकुल आवडले नव्हते,घरी येई पर्यंत ती माझ्याशी एका शब्दानेही बोलली नाही. ग्रुप मध्ये माझं मनच नव्हतं, यश असताना वेळ कशी पटकन निघून जायची कळायचच नाही, आज मंनगटावरील घड्याळाचा काटा एक एक मिनिट सुद्धा पुढे सरकत नव्हता. आपले मन आपलेच वैरी झाल्या सारखे, नको नको ते विचार करीत होते.वास्तविक तो यायलाच हवा होता, उगाच मनात पाल चुकचुकली, कल्पना पण नाही, आणि तो पण…… पुन्हा भेटेल ना??? तो आत्ता यावा असं मनाला खूप वाटतंय, ते त्याला सादही घालतय. पण त्याचा पत्ताच नाही, व्याकुळ नजरेनी मी खिडकीतून रस्त्यावर वेड्यासारखी, सारखी एकटक पाहत होती… पुन्हा पुन्हा त्याच्याच विचारानें हैराण झाले. मला तिथे जास्त वेळ राहवेना,विभाला थांबायचे होते,त्यामूळे माझ्यावर रागावून, वैतागून, तीसुद्धा वेळेपूर्वीच निघाली……… “इंतजार और अभी, और अभी और अभी”……..
…………(१०)
आम्ही घरी आलो पण मनाला शांती नव्हती, माझी जेवायचीही इच्छा नाही म्हटल्यावर मात्र विभाचा पारा चढला. यश आमच्या घरी आल्यापासून तिचं तसं बिनसलच होतं म्हणा, त्यातून त्याने ते “हार्ट शेप” किंमती पेंडन्ट दिल्यामुळे ती आणि कल्पना दोघीही माझ्यावर नाराज होत्या. यशच्या मुळेच मला त्रास होतोय, म्हणून मी त्याचे संबंध तोडावे,म्हणून माझ्या जिव्हारी लागेल, असं बरेच काही ती बोलली. रात्र भर मी रडूनच काढली, आई ची सुद्धा फार आठवण येत होती.आज आई असती तर तिलाच माझं मन कळलं असतं…. त्या नंतर चे दोन तीन दिवस खूप वाईट गेले,कल्पनाची सुद्धा फोनवर भेट होऊ शकली नाही, त्यामुळे यश चे ही काही कळले नाही….मला त्याच्या विचारा शिवाय काहीच सुचत नव्हते…. कशी केलीस माझी दैना रे, मला तुझ्या बगर करमेना…… शेवटी कल्पनाला फोन लागल्यावर कळलं की, यश ला ऑफिस च्या कामासाठी त्वरित बेंगलोर ला जावं लागल्यामुळेच तो मागच्या शनिवारी, ग्रुप मध्ये येऊ शकला नाही,आणि काम झाल्या शिवाय येत्या शनिवारी तरी येईल की नाही ह्याची खात्री नसल्याचे तिने सांगितल्यावर मात्र मला रडूच कोसळले. एका गोष्टीचं मला राहून राहून नवल वाटलं की, त्याला माझी ओढ आहे,ते नजरेतही दिसतं, त्याने कवितेतून त्याचं प्रेम व्यक्त ही केलंय, मला बरं वाटावं म्हणून माझ्या आवडीची महागडी गिफ्ट सुद्धा दिली. वाढदिवसाची पार्टी ऍरेंज केलीय, मग इतकं सगळं असतांना, मला प्रेमाची भूल देऊन, मला त्याच्या वाटेकडे डोळे लावायला लावून, हा बेंगलोरला जाऊच कसा शकतो, ठीक आहे ऑफिस चे अर्जंट, महत्वाचे काम निघालेही असेल, पण ह्या सुज्ञ माणसाने एका शब्दाने तरी कल्पना बरोबर तसा निरोप का नाही पाठविला? त्याला माझ्या मनाची काहीच कशी पर्वा नाही.आता भेट झाल्यावर मी ही माझी ‘नाराजी’ दर्शवायची, माझ्या मनाने पक्क केलं.माझा असा अपेक्षा भंग झालेला मनाला सहन होणे कठीण होतं.तरी पण मनात त्याची आठवण आणि नजरेत त्याची प्रतिमा घेऊनच मी गुरुवार पर्यंत चे दिवस कसे बसे काढले. शनिवारी समाजात जायचं आहे हे कल्पनाने फोन करून कळवलं, आणि पुन्हा त्याला भेटण्याच्या ओढीने उचल खाल्ली,डोक्यात राग आणि हृदयात तीच ओढ, ह्या वेळी काहीही करून तो आलाच पाहिजे…. ‘तो आला तर तो खरा माझा’… आणि काहीही कारणास्तव जर तो आला नाही, ‘तर आयुष्यभर त्याला न भेटण्याचा निर्णय हृदयाने घेतला’ आणि मनाने त्याची खूणगाठ बांधली. आणि तसा मी निश्चयच केला, बहुदा देवीचाच तसा “कौल” आहे असं मी मनाशी पक्क ठरवलं. तरी सुद्धा देवीने उद्या त्याची आणि माझी भेट घडवावीच अशी मनोमन प्रार्थना करून तिला साकडही घातलं……….
…………(११)
सकाळ उजाडता उजाडता मला झोप लागली, त्यामुळे उठायला बराच उशीर झाला. विभाने सर्व कामे उरकून घेतली होती, माझ्या वाटणीची कामे पण आज तिने मुकाट्याने केली होती. मी गाढ झोपलेली पाहून, भांड्यांचा सुद्धा आवाज होऊ दिला नसावा. एकंदरीत आजचा दिवस चांगला जाण्याचीच ही लक्षणं मला दिसत होती. ‘शांतादुर्गेचं’ नाव घेतंच मी उठले. माझ्या उरलेल्या कामातही माझे लक्ष नव्हतेच, हल्ली वारंवार कोठलेही काम माझ्या कडून धड होत नसे, दूध तापवायला म्हणून घ्यायचे, तर गॅस वर भांड्यात पाणीच घेतलेले असायचे, दुधाचे भांडे तसेच फ्रीज मध्ये, आंघोळीला जाताना टॉवेलच न्यायला विसरायची, एक ना अनेक, विभा कडून नंतर ह्यावर खूप बोलणी खावी लागायची, तिच्या दृष्टीने यशच ह्याचा ‘गुन्हेगार’, त्याच्यावरच सर्व खापर फोडायची. माझं मन त्याच्यात गुंतलय ह्यात ‘त्या बिचाऱ्याचा’ काय दोष….
आज कधी संध्याकाळ होते आणि आम्ही समाजात जातो असं मला झालं होतं. आज माझी खरी परीक्षा होती. सत्व परीक्षाच जणू, आज माझ्या प्रेमाचा कस लागणार होता. माझं प्रेम खरं असेल तर तो आज काही करून भेटेलच…. पण… पण काही अपरिहार्य कारणास्तव तो आलाच नाही तर……?
ह्या जर, तर मध्ये मन ठेचाळणार का?
माझ्या मनाचा कौल माझ्या बाजूने होणार का? प्रेमाच्या पाकळीची ही देवीच्या पायाशी लावलेल्या कौलाची कळी, माझ्या बाजूने उजवा कौल देत, त्याचे भविष्याच्या सुंदर फुलात रूपांतर करणार आणि माझ्या प्रेमाला जीवदान मिळून मीच जिकणार का,…………का….??? ह्या दुसऱ्या,. …का??? चा मी विचारच करू शकत नाही. आईची, शांतादुर्गेची कृपा व्हावी हीच मनीषा हृदयी बाळगून ग्रुप मध्ये आम्ही दाखल झालो. आज अतुलही भेटला, मनाला धीर वाटला,…. पण जो यावा, भेटवा म्हणून आशेवर आले, त्याचं काय. …?
पर्स उघडून देवीचा फोटो ओंजळीत घेऊन तिच्या नजरेत मन केंद्रित केलं,. ….”शांताई “… एकच आर्त हाक,… आणि कल्पनाची… “वेलकम स…..र” ची ओढलेली री….. ने मी किल्ला ‘सर’ केल्याची, एक अतीव आनंदाची लकेर सर्वांगातून उठली… “येस”… नजरेसमोर “यश”….मीच जिकले. मनात आईचे आणि देवीचे आभार मानून, नतमस्तक झाले. ह्या क्षणाचा आनंद लपवित, “सरांना” माझी किंमत कळावी म्हणून, मुद्धाम त्याच्या कडे दुर्लक्ष करीत, मी अतुलशीच बोलत राहिले.
“काय बाईसाहेब?” जवळ येत कानावर हळुवार फुंकर मारीत,जणू भ्रमराने फुलावर झेपावे तसा गुणगुणत, हात पुढे करून “हॅलो” म्हणताच, माझा हात क्षणात त्याच्या हातात कधी गेला मला कळलेच नाही.
कुठला रुसवा आणि फुगवा, माझ्या ‘लटक्या रागातील’ हवाच त्याने आपल्या अस्तित्वाने आणि पतंगाच्या जीवघेण्या नजरेतील ओढीने काढून टाकून, ह्या “शमे” मध्ये एकजीव होण्यासाठी सरसावला. आता ह्या “शमे”ला त्या परवान्याला ‘क्षमा ‘ करून शमेच्या नजरेत विसावा देऊन शांत करण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही……….
…………(१२)
देवीच्या कृपेने आज यश भेटल्याने मी खुशीत घरी पोहोचले. यश ने बेंगलोर वरून आम्हा सर्वांसाठी स्पेशल ‘मैसूरपाक’ ची बॉक्सेस आणली होती. मला आवडणाऱ्या गोष्टी ह्याला बरोब्बर कश्या कळतात हे एक कोडेच आहे.गेल्या शनिवार च्या कटु आठवणी त्याने दिलेल्या स्वीट बॉक्स ने भरून काढल्या. खरतर त्याची ऑफिस ची कामं पूर्ण झाली नव्हती, पण मला भेटायच्या ओढीने कामं ‘ ऍडजस्ट ‘ करून मुद्धाम तो आज सकाळच्या फ्लाईट ने आला. माझ्या मनाची तळमळ, भेटी साठी लागलेली आंस,परमेश्वर कृपेने त्याच्या पर्यंत पोहचली असावी.आजच्या त्याच्या येण्याने माझ्यावरचे त्याच्या पासून दुरावण्याचे संकट टळले होते. मला न कळविता तो बेंगलोर ला गेल्याचा राग खोटा ठरला होता,त्याने खरतर कल्पना कडे तसा ‘मेसेज’ दिला होता,पण तिनेच ह्या बाबत मौन धरल्याने, मी उगाच ‘गैरसमज’ करून घेतला असं मला जाणवलं. देवीच्या कृपेनं, आज जर तो काम ऍडजस्ट करून आलाच नसता, तर विनाकारण आमच्यात आयुष्य भराचा दुरावा निर्माण झाला असता.त्याने हे आज स्पष्ट केले, आणि मनोमन मी त्याची माफी मागितली.
कल्पना, विभा, आणि समाजातील काही व्यक्तींना, आमच्या संबंधा बद्धल विरोध होता हे मला कळत होते.पण माझा नाईलाज होता.आमचे नाते हे जन्मोजन्मीचे असावे ह्याची मला खात्री पटली होती. एखादी व्यक्ती आपली
“सोलमेट ” असल्याची खात्री दोन व्यक्तींच्या मध्ये असलेल्या अनामिक ओढीनेच प्रत्ययाला येत असते, हया दोन जीवांच्या आंतरिक संबंधाची उकल, दोन आत्म्यांची आपापसातील ओळख, ते दोन जीवच समझु शकतात “ये है जनम जनम के फेरे” आता कोणी कितीही विरोध करो, कितीही अडचणी येवोत, आम्ही दोन जीव परस्परांशीवाय राहूच शकत नाही.जीवनाचा फुलोरा फुलण्यासाठी आम्हाला एकमेकांशिवाय आता कोणाची तशी गरजच नाही.आमच्या सहवासाचा सुगंधच आमच्या भावी जीवनासाठी पुरेसा आहे. यशची साथ मिळाली की माझ्या ह्या हल्लीच्या कंटाळवाण्या, निरस जीवनात पुन्हा बहर येईल ह्यात शंकाच नाही……….
…………(१३)
आज 18 जानेवारी यश चा वाढदिवस, माझा वाढदिवस बरोब्बर 15 दिवसांपूर्वी होऊन गेला, ह्या पंधरवड्यात प्रत्येक दिवस, मी प्रेमाच्या विश्वात, आणि त्याच्याच आठवणीत न्हाऊन निघाले होते,ध्यानी, मनी, स्वप्नी तोच असायचा, मागे मीच त्याच्यावरील माझ्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवून समाजात गेले होते, पण भेट झाली नाही, एकार्थाने ते योग्यच झाले असावे, बहुतांशी पुरुषच पुढाकार घेऊन आपले प्रेम व्यक्त करीत असतो.पण माझ्या मनाची अवस्थाच थोडी वेगळी असावी.त्याच्या नजरेत,वागण्यात जर प्रेमाची तितकीच ओढ मला दिसत होती, तर मी पुढाकार घेतला तर त्यात काय बिघडणार आहे, असा साधा सुधा विचार करून मीच व्यक्त होण्याचे ठरविले होते.आज जर तशीच वेळ आली तर मी स्वतःहून प्रेम व्यक्त करायला मागे पुढे पाहणार नाही. आखीर
“प्यार किया तो डरना क्या”….
पण माझ्यावर ती वेळ आली नाही,त्याला शुभेच्छा देताना त्याच्या हातात माझा हात असतांना “यश,तुला बर्थ डे गिफ्ट काय देऊ? ” ह्या माझ्या प्रश्नाला, त्यानेच माझ्या नजरेतून हृदयाच्या गाभाऱ्यात प्रवेश करीत, मला जवळ ओढीत सनईच्या सुरात म्हणाला, “स्मित, तूच मला सर्वार्थाने गिफ्ट म्हणून हवि आहेस “…..
बस….त्याच्या नजरेतले ते शब्दातीत भाव,ती जीवघेणी ओढ,हातातून हृदया पर्यंत पोहोचलेले स्पंदन……
शहारलेल्या मनाची एक उन्मादक गोड लकिर, सर्वांगावरील हजारो रोमांचित कळ्यांनि, क्षणात फुलून दरवळलेल्या सुवासात न्हाऊन निघालेले मनाचे पडसाद, माझ्या थरथरत्या ओठातुन सरगम छेडीत गुणगुणले “यश, मी सर्वार्थाने तुझीच आहे”
काळ थांबला असावा. …..
आता त्याच्याही नजरेत बदल होत होता, का, कसे कोणास ठाऊक, पण हृदयातील प्रेमाचा झरा त्याच्याही नजरेतून पाझरत आमच्या भावनांचा संगम झाला.
कल्पनाने माझ्या दंडाला धरून मला बाजूला घेऊन “काय झाले? ” असे प्रश्नातीत मुद्रेने मला विचारताच मी ‘भानावर’ आले. चेहेरा पुसत असताना जाणवलं, आनंदाच्या अत्यंत उत्कट क्षणी सुद्धा हृदयाला पाझर फुटून, नयनांच्या द्वारे ते आपली वाट मोकळी करत असावे……….
…………(१४)
बर्थडे पार्टी दणक्यात झाली. यश च्या चेहेर्यावरचे भाव पाहून मी ही सुखावले,माझ्या मुळे एखाद्याच्या आयुष्यात आनंद फुलतोय ह्याचं मलाही खरोखरीच बरं वाटलं.दुसर्यांना सुख समाधान देण्याची ताकद हीच माणसाजवळ असलेली खरी संपत्ती. कधी, कधी प्रेमाचे दोन शब्दही आपल्याला पुरेसे असतात.
प्रसन्न मनाने मी घरी आले, बरेच दिवसानी आज शांत चित्ताने झोप येईल अशी आशा वाटत होती, पण कसचे काय, विद्यार्थी दशेतले दिवस आठवले,परीक्षेच्या दिवसात अभ्यासामुळे आणि पेपरच्या टेन्शन मुळे झोप पुरेशी मिळत नसे, तेव्हा वाटायचं परीक्षा संपली की मस्त पैकी ढाराढुर झोप काढायची, पण शेवटचा पेपर मस्त जाऊन सुद्धा कितीही शांत झोपायचं म्हटलं तरी सुद्धा त्या रात्री झोपच लागायची नाही. काहीशी तीच अवस्था आज माझी झाली होती. यश चा पेपर एकदम सोपा जाऊन, शंभर पैकी शंभर मार्क मिळण्याची खात्री असून सुद्धा मी रिलॅक्स होत नव्हते. त्याचे ते उमदे रूप डोळ्यां पुढून सरकतच नव्हते. माझ्या ‘स्मितहास्यावर’ त्याचे आणि त्याच्या ‘मिश्किल नजरेवर’ माझे मन फिदा होते. आज पार्टीत कोण काय बोलले, काय जोक्स झाले, डिनर ला मेनू काय होता, कशा कशातच माझे लक्ष नव्हते,पार्टी मस्त चालली होती माझ्या मनाला आनंदाची रुपेरी झालर होती, तरीही, का कळले नाही पण कल्पनेच्या नाराजीचे गालबोट त्या पार्टीला लागल्याची एक अस्पष्ट जाणीव मला झाली हे मात्र खरं. माझं सगळं चांगलं चाललेलं असलं की दृष्ट लागण्या सारखी अशी एखादी गोष्ट नेहमीच माझ्या आयुष्यात घडत आली आहे.
आज तरी असे ‘निगेटिव्ह थिंकिंग’ नको म्हणून ‘यश’ च्या आठवणींची मखमली चादर मनावर ओढत त्याच्याच स्वप्नात रंगायचे ठरवून बऱ्याच दिवसांनी खिडकीतून समोर दिसणाऱ्या माझ्या आवडत्या ‘अनुराधा ‘ नक्षत्रातील ताऱ्यांची, ‘स्वाती ‘ नक्षत्रातील ताऱ्यांशी तुलना करीत, यश पर्यंत पोहोचायला किती योजने लागतील, ह्या कल्पनेच्या विचारांचे गणित सोडवीत यश च्या गोड स्वप्नात शिरले…….
…………(१५)
कालचा दिवस उगवताना मनाच्या आकांक्षा फुलवत उजाडला, आणि मनाच्या क्षितिज्यावर गुलाबी रंगांची उधळण करीत मावळला. रात्र झाली तसा नयनांच्या पुढे भावी आयुष्याची गोड स्वप्ने रंगवत, हृदयाला रिझवत, निशेच्या अद्भुत महालात वास्तव्याला घेऊन गेला.एकंदरीत दिवस मस्तच गेला आणि रात्रही छानच रंगली.
सकाळी प्रसन्न मनाने जागे झाले, शांतादुर्गेचे नामस्मरण करताना, मनाच्या मैदानावर ‘यश ‘च्या आठवणींची घोडदौड सुरू झाली. ….काय कमाल आहे बघा, करायचे होते देवीचे ध्यान, आणि माझे हे “ध्यान” मात्र त्याच्या पायाशी लोळण घेत होते. प्रेमाचे विचार हे हृदयातुन मनाच्या आरश्यात परावर्तित होत असावेत. आपलं सर्व जीवन, आचार, विचार ह्या मनाच्या चक्रव्यूहात अडकलेले असावेत. आपण केलेली सर्व कर्मे, मग ती कायिक, वाचिक अथवा मानसिक असोत,ह्या सगळ्यांना आपले हे मनच कारणीभूत आणि साक्षीदारही असते.आपण सर्व जगाला फसवू शकू, पण आपल्या मनाला फसवता येणे शक्यच नाही.
आपण बोललेलं असत्य, केलेला गुन्हा, बाह्य जगापासून लपविणे एकवेळ जमेल पण मनाच्या आरशात त्याची प्रतिबिंबे उमटतात आणि आपल्याला सदैव बेचैन करतात. ”काँशन्स आल्वेझ बाईट्स” आपल्याला हवी असलेली, मनासारखी गोष्ट घडली, की आपण आनंदी होतो,प्रसन्न होतो,मनाला बरं वाटत,आणि आपण सुखी होतो,ह्या उलट मनाविरुद्ध काहीही घडलं,अपेक्षा भंग झाला की, मन नाराज होऊन आपण दुःखी होतो.प्रत्येक मनुष्याच्या जीवनात हे असंच एक मोहाचे जाळं पसरलेले आहे, ज्यात हा मानवी जीव अडकून, त्यातून बाहेर पडण्यासाठी सदैव धडपडत असतो. सुखात त्याला त्यातून बाहेर पडावे असं वाटतच नाही, पण दुःखाचे काटे त्याला रुतायला लागल्यावर मात्र सुटके साठी जीवाचा आकांत सुरू होतो. पण ज्याला ‘सच्चिदानंद ‘ म्हणतात, ज्यात त्याच्या आनंदाला कधीही ओहोटी लागत नाही, जो तसूभरही कमी न होता ‘चिरत्काल’
टिकतो तो फक्त परमेश्वराने त्याच्या नामस्मरणातच जपून ठेवला असावा.सुखदुःखाच्या ह्या जाळ्यातून बाहेर पडावं, असं मलाही सदैव वाटतं.
यश ला पाहिल्यापासून, त्याच्या मोहात पडल्यापासून, अपेक्षांच्या ह्या लपंडावात माझे मन देवीच्या आराधने पासून थोडे दुरावत चालल्याची जाणीव मनाला किंचित टोचत होती.एकीकडे ” यश ” च्या थोडे जवळ जाण्यात ‘यश’ मिळूनही, देवी पासून थोडे दूर तर जात नाही ना, अशी पुसटशी शंका ही मनात घर करीत होती.
हे जीवन जगतांना, कर्म करीत असताना, मनुष्याने परमेश्वराच्या ध्यानात राहूनच फळाची अपेक्षा न धरिताच ते निरपेक्ष बुद्धीने करावं हेच खरं……
“ताई, अजून झोपलीच आहेस का? “….. विभाच्या आवाजाने मी तंद्रीतून जागी झाले………
…………(१६)
विभाने माझ्या उशिरा उठण्यावरून सुद्धा नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. तसे पाहता मी सकाळी लवकर उठून नेहमी पूजा करून झाली की विभाला उठवायची. पण आताशा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नसायचा त्यामुळे सकाळी उठायला उशीर व्हायचा,तिचा हा सगळा राग माझी तब्बेत बिघडू नये म्हणूनच असायचा. यश शी ओळख झाल्यापासून माझ्या मानसिक, आणि शारीरिक अवस्थेतील बदल तिच्या लक्षात येत होते,आपली मनाने खमकी असलेली ताई, सध्या फार हळवी झाल्याची तिला झालेली जाणीव ती बोलून दाखवायची,तसेच माझ्या प्रकृतीतील चढ उतार बघून ती सर्व दोष ‘यश’ च्या माथीच मारीत होती. आमचं हे जवळ येणं, तिला आणि का कुणास ठाऊक कल्पनाला सुद्धा मान्य नव्हतं……
मला मात्र त्याच्याशिवाय काहीच करमत नव्हतं. आणि आज तो भेटणार म्हणूंन मन प्रसन्न आणि अधीर झालं होतं.
आज भेटता क्षणीच, मला त्याच्याबद्धल इतकी अनामिक ओढ का वाटते. असा प्रश्न त्याच्या पुढे टाकला……
तर त्यावर नेहमीप्रमाणेच मिश्किल हसत, त्यानेच उलटा ‘तोच’ प्रश्न मला विचारला. वर प्रति प्रश्न हाच की, “तू इतकी सुंदर,सोज्वळ,सालस, आणि तुझ्या प्रेमासाठी इतके चांगले चांगले लोक, तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असतांना, उलट तू माझीच कशी निवड केलीस? “
आपली प्रशंसा केलेली कोणालाही सहसा आवडतेच, स्रियांना तर नक्कीच,आणि पुरुषांना तेही नक्कीच ठाऊक असतं. आणि त्यात ” त्या” फसण्याचीही शक्यता असते.पण मी स्वतःलाही जाणून होते,म्हणून त्याने कधी मला फसवू नये म्हणून मीच त्याला म्हणाली “यश, स्त्रियांवर फिदा होणारे बरेच पुरुष असतात पण तुझ्यासारखा एखादाच खरा “मर्द” असतो, जो कधीही स्त्रीचा विश्वासघात करून तिला फसवणार नाही,तुझ्या बद्धल चा ‘हा विश्वासच ‘मला तुझ्या प्रेमात पार पागल करून गेलाय. “
त्यालाही, मी त्याच्यावरील दाखविलेल्या विश्वासाची जाण असल्याचे, त्याच्या नजरेतील आत्मविश्वासाने मी सुद्धा जाणले.
‘दो दिल एक जान’………
…………(१७)
तसं पाहता यश शी ओळख होऊन दोन ते तीन महिन्याचाच काळ होऊन गेला होता, पण त्याच्या सहवासात, प्रेमात, आणि स्वप्नात, तो जन्मोजन्मीचा माझा जोडीदार असल्याची भावना निर्माण झाली होती. आपल्या आयुष्यात बरेच जण येत असतात, पण काही जणांबद्धलच आपल्याला ओढ वाटते,आपुलकी वाटून आपण त्यांच्या प्रेमात राहावे, सहवासात असावे असे आपल्या मनाला वाटण्यात काही तरी पूर्वजन्मीचे संस्कार असावेत ह्या पक्क्या मताची मी झाले होते,कदाचित ह्या माझ्या मतात, मला असलेलं गूढ गोष्टींचं आकर्षण,त्यावरील पुस्तकांचं खूप वाचनही कारणीभूत असावे. ब्रायन वेस,रोंडा ब्रायन,रेमंड मूडी, डोलॉरेस कॅनॉन,दीपक चोप्रा,विद्याधर ओक, एन. डी. श्रीमाळी, ह्या सुप्रसिद्ध लेखकांची बरीच पुस्तके,आणि गीतेची प्रवचने माझ्या वाचनात होती. आपल्या मागील जन्माचे रहस्य,पुनर्जन्म, ह्या विषयां बद्धल मला बरीच ओढ वाटायची. त्यामुळे, मी त्या विषयाची मिळतील ती पुस्तके वाचून काढली होती,ग्रह, तारे नक्षत्र तसेच भविष्य ह्या बद्धलही मनात कुतूहल असायचे, एमिली ब्रॉंते ची ‘वूदरिंग हाईट्स ‘ही कादंबरी आणि त्यावरील सिनेमा सुद्धा मला फार आवडला होता.
यश बद्धलची ओढ,आणि आकर्षण ह्यांचा काहीतरी संबंध आमच्या गेल्या काही जन्मांशी असावा असं वाटत आलंय.
यशच्या सहवासात सदैव राहावं, असं मलाच नव्हे तर त्याला सुद्धा वाटत असणार,आणि म्हणूनच काहीतरी कारण काढून एकमेकांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो. आमचं हे प्रेम,आमची संगत सदैव राहावी ह्या साठी परमेश्वराकडे माझी प्रार्थना सुद्धा असायची.आम्ही ह्याच जन्मी नाही, तर पुढील मिळणाऱ्या सर्व जन्मात अकमेकांचेच असावे, असं आताशा आम्हाला वाटू लागलं होतं………..
…………(१८)
यश ने वाढदिवसाची पार्टी ‘प्रीतम’ हॉटेल ला दिली, त्या पार्टीतच ‘अतुलनेही’ त्याच्या थोड्याच दिवसानी येणाऱ्या वाढदिवसाला आम्हाला त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते.
अतुल माझा आतेभाऊ, माझी आते ‘केंकरें’ कडे दिली होती, ते “श्री मंगेशा” चे महाजन आणि उपासक,आमची आई सुद्धा पूर्वाश्रमीची ‘रांगणेकर ‘ आणि ती सुद्धा मंगेशकरच, शक्यतो शेणवी सारस्वतात, शेणवी उपसकांमध्येच लग्न करण्याची परंपरा कायम असते त्याचा मुख्य उद्धेश हाच की, गोव्याच्या आमच्या कुलदैवतांच्या देवळात,कवळे येथील ‘श्री शांतादुर्गा’, मंगेशीच्या ‘श्री मंगेश’, आणि बांदीवडे येथिल ‘श्री महालक्ष्मी’, ह्या मुख्य देवळांत स्वतःला गाभाऱ्यात बसून अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र इत्यादी पूजा विनासायास करता याव्यात हाच आहे. पर जातीत विवाह केल्यास,ह्या देवळांमध्ये, गाभाऱ्यात प्रवेश करून स्वतः ला देवांची यथासांग पूजा करण्यास मिळणे वर्ज असते,आणि पुरोहितांच्या द्वारेच पूजा करावि लागते. त्यामुळे शक्यतोवर परजातीतील विवाह टाळले जातात., माझी पहिल्या पासून, “श्री मंगेशाच्या” उपासकाशीच लग्न करण्याची मनोकामना होती,योगायोगाने यश,हा ‘नाडकर्णी’, आणि त्यांचे कुलदैवतही ‘श्रीमंगेश ‘ असल्यामुळे मी मनोमन शांतादुर्गेची ऋणीच होते.
शांतादुर्गा पार्वती, आणि मंगेश हा शंकर, त्यामुळे लहानपणापासूनच मला वाटायचं की माझ्या लग्नानंतर मला ह्या दोन्ही देवस्थानात गाभाऱ्यात बसुन आम्हा उभयतांना पूजा करण्याचा ‘हक्क’ मिळावा, देवाच्या कृपेने आता यश जीवनात आलाय तेव्हा माझी ती इच्छा भावी आयुष्यात पूर्ण होणार म्हणून मी मनोमन प्रसन्न असायची, परमेश्वर कृपेने आमची जोडी कायम राहावी,एक ‘उत्तम दाम्पत्य’ म्हणून आम्ही नावाजले जावे, यश ने मला कधीही अंतर देऊ नये म्हणून मी सदैव देवीची करुणा भाकायची. आमच्यात लग्नानंतर लगेच देवाची सेवा करायला, पूजाअर्चा करायला गोव्याला जाण्याची प्रथाच आहे,मी सुद्धा यश ला तशी विनंती करणार आहे,तो माझ्या ह्या विनंतीचा नक्कीच स्वीकार करून माझी मनोकामना पूर्ण करेल ह्यात कोणतीच शंका नाही………
…………(१९)
आज १४ फेब्रुवारी, अतुल चा वाढदिवस, विभा येणार नव्हती, म्हणून कल्पना आणि मी दोघेच अतुल च्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेलो. 6 वाजे पर्यंत यश आला नाही, तसं मन बेचैन झालं, पण त्यांनी मध्यंतरी मला दिलेल्या त्याच्या ऑफिस च्या फोन नंबर वर, मी तो आज इथे नक्की येणार हे कन्फर्म केल्यामुळे, तो येईलच यात शंका नव्हती.
आज अतुल च्या आग्रहाखातर, त्याने ‘संगम’ सिनेमातील ‘मुकेश’ चेच ‘ओ मेहेबुबा, तेरे दिलके पास ही, है मेरी ‘. …
हे गाणं अतिशय ‘ सुरेल ‘ आणि सुरेख म्हटलं,पण माझ्यावर रोखलेली त्याची नजर आणि चेहेऱ्यावरचे भाव, अतुलच्याही नजरेतून सुटले नाहीत, आणि अतुल च्या नजरेत ह्या वेळी मला ‘नाराजीचा’ सूर दिसून तो “बेसूर” झाल्या सारखा वाटला.
मला हेच कळत नव्हतं की,पहिल्यांदा विभा,मग कल्पा आणि आता अतुल, एकापाठोपाठ एक, एक व्यक्ती माझ्या आणि यश च्या जुळणाऱ्या संबंधावर नाराजी का व्यक्त करतात. माझ्या मते, देवाच्या कृपेने “यश”, इतका सुंदर, सुशील,
देखणा, आणि माझ्यासाठी ‘सुटेबल’ असतांना, ह्यांच्या नजरेत नाराजी कश्यासाठी?
काहिहो असो, काहीही होवो, आम्ही दोघे एकमेकांचे होऊच, ह्यात तिळमात्र शंका नाही.
मला कधी एकदा आम्हा दोघांना एकांत मिळून, खूप मनसोक्त गप्पा मारायला मिळतील असं वाटायला लागलं,आणि नेमकं यश च्या नजरेतही, कधी ह्या सर्वांच्या नजरा चुकवून, त्याला माझ्याकडेच मनसोक्त बघायला, बोलायला मिळतंय, अशी त्याची झालेली अवस्था त्याने मला नजरेतून व्यक्त केली.मनाला मनाची खूणगाठ पटली.
आज अतुल च्या सर्कल मधले त्याचे डॉक्टर्स मित्र, मैत्रिणी, सुद्धा पार्टी ला हजर होते.त्यामुळे त्यांच्या मध्ये सुद्धा तो बिझी होता.
निघायची वेळ आली तेव्हा, यश त्याच्या घरी जाताना, वाटेवर मलाही माझ्या घरी ड्रॉप करणार आहे, असं जेव्हा मला समजलं तेव्हा तर मी खूषच झाले.
आज पहिल्यांदाच आम्ही दोघे थोडा वेळ का होईना, एकत्र असणार ह्या कल्पनेने,आणि नेहमी प्रमाणे ‘कल्पना’ आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करायला नसणार, म्हणूनही मी सुखावले.
“टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड” टॅक्सी त त्याने माझा हात हातात घेतला, माझ्या हृदयाची धडधड त्याला हाताच्या कंपना वरून जाणवली असावी,मला धीर देत म्हणाला ” रिलॅक्स स्मित” अग अशी घाबरतेस काय, प्लीज, पुढच्या शनिवारी आपण दोघेच बाहेर कुठे भेटूया का? “…….
त्याच्या त्या विनंती वजा आव्हानातून, आणि माझ्यावर रोखलेल्या नजरेतून, माझ्या नजरेला सुटका करून घेण्याची हिम्मतच झाली नाही…. “हो, चालेल” म्हणण्या शिवाय पर्यायच नव्हता…….
…………(२०)
यश नि घराजवळ सोडलं आणि तीच टॅक्सी घेऊन तो पुढे घरी जाणार होता. मी ‘प्लाझा’ सिनेमा जवळ उतरतांना शनिवारी इथेच तो मला 4 वाजता ‘पिकअप’ करेल असं म्हणून निघाला,माझं मन त्याला सोडायला तयारच नव्हतं,खरं तर घर जवळ येत चाललं तसं त्याच्या बरोबरचा हा प्रवास कधीही संपूच नये असं मला सारखं वाटू लागलं. माहीम पासून दादरचे आमच्या घराचे अंतर फारसे लांब नाही, तरी सुद्धा त्याच्या बरोबर असल्यामुळे ते एका क्षणात आल्याचा मला भास झाला. असंच होत असावं, आपल्या आवडत्या माणसांबरोबर काळ क्षणात उडून जातो.आणि यश सारखी व्यक्ती प्रवासाला बरोबर असेल तर काळाने थांबावे, प्रवास कधीही संपूच नये असं वाटलं तर त्यात वावगं असं काहीच नाही, शेवटी “नॉट धी डेस्टिनेशन,बट जर्नी म्याटर्स”……
घरी आल्यावर माझा मूड बघून विभा काय समजायचे ते समजलीच.
बिछान्यावर पहुडले, त्याच्या आठवणींच्या मयूराने पिसारा फुलवताच, पिसाऱ्यावरील प्रत्येक पिसात, मला मुकुटावर ‘माझ्याच’ रूपाचे मोरपीस धारण केलेली ‘यशचि’ बांसुरी वाजवणारी आणि गालात गोड मिश्किल हसणारी मूर्ती चहूकडे दिसु लागली.
राधेला आपल्या गोड बांसुरी ने वेड लावणारा श्रीकृष्ण,आणि माझ्या डोळ्यांपुढील यश ची मूर्ती काही केल्या हटता हटेना. पुढील दोन तीन दिवस रोज सकाळी मी नेहमी पेक्षा बरीच उशिरा उठू लागली.
उद्याच्या शनिवारी यश ला भेटण्या बद्धल विभाला सांगावे की न सांगावे ह्याच विचारात होते. पण बहुतेक शनिवारी आम्ही समाजात एकत्र जात असू, माझे न येण्याचे कारण तिला सांगावेच लागणार होते.तशात आज ना उद्धया तिला कळणारच. एकदा खोटं बोलले तर पुढे ते लपवायला दहा वेळा खोटं बोलावे लागेलच, आणि माझं जर त्याच्यावर खरे प्रेम आहे, तर मला कोणाची भीती आणि कशाचीच आडकाठी का?. …
सारासार विचार करून तिला “उद्धया मी यश ला भेटायला जाणार आहे, तेव्हा समाजात येऊ शकणार नाही” असे सांगितले मात्र, तिने बरेंच आकांड तांडव केले,माझ्या ढासळणाऱ्या प्रकृती वर लेक्चरही दिले, शेवटी म्हणाली “आई ची शपथ घे ताई” तू त्याला भेटणार नाहीस…….
मी शपथ घेतली नाही,पण आईच्या आठवणींनी मन भरून आलं आणि रडूच कोसळलं, इतकं की ढसढसा रडले, मला काही करून रडू आवरेचना,तिलाही ते जिव्हारी लागलं असावं,दुपारी मी जेवले नाही, संध्याकाळचा चहा सुद्धा घेण्याची इच्छा नव्हती. रात्री तिनेच पुन्हा आईची शप्पथ घालून, मला जेवायला भाग पाडले. कसेबसे दोन घास खाल्ले. रात्र खायला उठली, झोप येणे शक्यच नव्हते, उद्धया यश ला भेटायला मिळावे म्हणून देवीची प्रार्थना करून, तिच्या नामःस्मरणात कधी ‘पहाट’ झाली, ते कळलंच नाही…….
…………(२१)
आजचा दिवस उगवलाच मुळी ‘कृष्णाच्या’ गोड आणि मोहक चेहेऱ्यावरील आनंदाच्या किरणांनी, माझ्या आयुष्यात सुखाच्या सोनेरी क्षणांची उधळण करीत.
रात्र भराची माझी झालेली ‘जल बिन मछली” ची अवस्था, बहुदा विभाच्या लक्षात आली असावी. तिनेच चहाचा कप पुढे केला,गंगा आज उलटी वाहत होती. “ताई तू सदैव सुखी राहाविस, म्हणूनच मी तुला काल इतके बोलले. तू हुशार आहेस,शहाणी आहेस,जो निर्णय घेशील, तो योग्यच घेशील, आणि तो मला मान्य असेल” इतकं पटकन बोलून, माझ्या हातात चहाचा कप देऊन तोंड लपवून ती किचन मध्ये पळाली. तिचे डोळे सुजल्या सारखे दिसले,ती ही बरीच रडली असावी, आणि झोपही पूर्ण झाली नसावी.कालचा दिवस आणि रात्रही बहुदा अमावास्येची होती.
दुपारी ४ वाजता मी ठरलेल्या जागी, ‘प्लाझाच्या मेन गेट’ कडे यायला आणि यश दिसायला एकच गाठ पडली. तो सुद्धा टाइमाचा पक्का असावा.अगोदरच ठरल्याप्रमाणे आम्ही आज ‘फाईव्ह गार्डन्स ‘ ला आलो.टॅक्सी तच त्याने माझे आभार मानले. वास्तविक मला सुद्धा त्याचा सहवास हवाच होता, मी सुद्धा तत्परतेने त्याचे मनापासून आभार मानले.
ह्याच्या आधी कॉलेज मध्ये असतांना आम्ही मैत्रिणी, गप्पा मारायला इथे येत असू, मला कल्पनाची आठवण आली. तिला जर मी यश बरोबर इथे आल्याचं कळलं तर माझी खैर नाही. यश बरोबर असताना ‘कल्पा’ चा विचार मनात येणे,किव्वा तिचा विषय काढणं योग्य नव्हतं.ती माझी जिवलग मैत्रीण असली, तरी त्याची मामेबहिण होती हे मी विसरू शकत नव्हती.
आयुष्यात पहिल्यांदाच मी, ही अशी कोणा पुरुषा बरोबर घरा बाहेर पडली होती.पण यश बरोबर असताना मनाला तशी टोचणी नव्हती.
यश चा हात आणि त्याची साथ ह्यामुळे मी निर्धास्त होते. का कुणास ठाऊक पण मला त्याच्या बरोबर कुठेही ‘नवखेपण’ जाणवले नाही. आम्ही एकमेकांना डोळे भरून पाहत होतो. तो किती देखणा आहे, हे मला आज जाणवलं,ह्या आधी मी पाहिलेला यश, आणि आत्ताचा “माझा यश ” ह्यात नक्कीच अंतर होते. गम्मत बघा, आपलेपणा आला की माणसं अधिक सुंदर दिसू लागतात.एखादी वस्तू, गोष्ट,स्थळं ही पाहाणाऱ्याच्या नजरेवर आणि त्या, त्या, वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असावि. ‘ब्युटी लाईज इन धी आईज ऑफ बीहोल्डर’. यश तसा मितभाषी वाटला, माझीच बडबड चालली होती. तो फक्त एकटक माझ्याकडे पाहत होता. एक दोनदा त्याला मान वळवून दुसरी कडे पहा म्हटलं, तरी त्याचं माझ्याकडे बघणं चालूच होतं. त्याच्या अश्या बघण्यानी माझ्या काळजाचा ठोका चुकण्याची शक्यता होती.मीच मग हलकेच त्याच्या भक्कम खांद्यावर विसावली. त्यालाही त्याच्या वरच्या माझ्या ह्या विश्वासाचे अप्रूप वाटले असावे.माझ्या माने भोवती आपला हात ठेऊन त्याने आधाराला धीर दिला. काळ थांबला असावा…….. मनाला मनाची ओढ जाणवत होती…………
…………(२२)
त्याच्या खांद्यावर विसावून स्वप्नात रंगलेली मी, तंद्री तुन बाहेर आली तेव्हा यश माझ्या कानात काही गुणगुणत मला काही विचारतोय, ह्या झालेल्या भासानेच. वास्तविक तो काही विचारत नव्हता तर माझ्या डोक्यावर, काना भोवतालच्या केसात, वरून, बाजूच्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवरून पडलेल्या, आणि केसात अडकलेल्या एका ‘मोहोराच्या’ छोट्या डहाळी ला तो हळुवार बोटांनी बाजूला करीत होता. कानाच्या पाकळीला झालेल्या बोटांच्या त्या मखमली स्पर्शानेच बहुदा माझी तंद्री भंग पावली असावी.त्या ‘अनाहूत स्पर्शाने’ मी सुद्धा मोहोरले. पण हा ‘मोहोर’ सुद्धा असाच कधी गळून पडेल काय, अशी पुसटशी शंकाही मनात येऊन गेली.शंका बाजूला ठेवीत मी म्हणाले, “यश, अरे तू काहीच बोलत नाहीस” ह्या वर तो हसत म्हणाला “स्मित,तुला काही विचारायचंय, बरेच काही प्रश्न आहेत.पण,ते सर्व तुला विचारायची काहीच गरज नाही,तू हुशार आहेस, शहाणी आहेस,समंजस आहेस, तुझ्याकडे त्या सर्वांची उत्तरेही नक्कीच असतील ह्यात शंका नाही.तेव्हा तूच ओळख बघू” असे म्हणून मिश्किल नजरेने माझ्याकडे पाहतच राहिला. मी काय उत्तर देणार, ‘पुरुषांना’ बरेच प्रश्न पडत असतात, आणि त्या सर्वांची उत्तरे, त्यांना स्त्रियांनी त्यांचे प्रश्न सोडवून द्यायची असतात, हे मला पक्के ठाऊक आहे.आता तो ‘प्रेमाने’ एकटक माझ्या कडे पाहू लागला. त्याच्या नजरेतील ह्या ‘मोहक प्रश्नानि’, माझ्या काळजाचा ठाव घ्यायला सुरुवात करताच, त्याला अपेक्षित उत्तर न देता, मीच त्याला लाडिक स्वरात म्हणाले, ” माझ्या राजा,बरेच प्रश्न असे असतात, त्यांची उत्तरे तुला वेळ आली की मी देईनच.तो पर्यंत तुला थोडं थांबावं लागेल”. आता पर्यंत मितभाषी वाटणारा माझा हा ‘राजा’, त्यानंतर प्रेम म्हणजे काय असतं, वैगेरे मला एखाद्या प्रॉफेसर ने, त्याच्या आवडत्या विद्यार्थीनिचा ‘स्पेशल आणि प्रायव्हेट’ क्लास घेऊन समजवावे तसा समजावत होता. फर्स्ट लव्ह, प्युबर्टी लव्ह,ऍडॉल्हेसंट लव्ह, म्याचुअर्ड लव्ह, प्लेटोनिक लव्ह, आणि पर्व्हरटेड लव्ह ह्या सर्वांवर तो उस्फुर्त पणे बोलत होता, मी ते एखाद्या लहान बाळबोध मुलीसारखं ऐकून घेतलं, त्याची ओघवती भाषा,समजावून सांगण्याची पद्धत, मला आवडली, खरं तर, त्याने प्रोफेसर व्हायला हवं होतं.आज त्याने बहुदा माझी ‘शाळाच’ घेण्याचे ठरविले होते. पण शेवटी मला त्याची गम्मत करीत, त्याच्या सारखंच मिश्किल हसत सांगावं लागलं, “माय लॉर्ड” मी सुद्धा M.A. विथ सायकॉलॉजी, असल्यामुळे ‘सिगमंड फ्रॉइड’ पूर्ण वाचला आहे”. त्यावर तो थोडा ओशाळला…….
खरंतर ‘त्याच्याप्रमाणेच’ मला सुद्धा फक्त थिअरीच माहीत आहे. ….
पण खरी सुख दुःख भोगतांना हवा असतो तो मायेचा उबदार स्पर्श, आणि आतून उचंबळून येणाऱ्या भावनांचा उद्वेग. पुढे प्रत्यक्ष संसारात आणि त्याच्या सहवासात ते कळेलच म्हणा……..
…………(२३)
यश बरोबरचे दिवस मस्त मजेत चालले होते. विभा ला जरी माझे त्याच्या बरोबरीचे संबंध पसंत नव्हते, तरी हल्ली ती मला उलटून काही बोलत नसे.कल्पनाला जेव्हा आमच्या संबंधाची कल्पना आली, तेव्हा पासून तिने माझ्याजवळ चे संबंध कमी करायला सुरुवात केली.नाहीतरी हल्ली मी समाजात पण जाणे कमी केले होते.शनिवारी मी समाजात तिच्याबरोबर जात नाही म्हटल्यावर, तिने विभाशी सख्य वाढवून आमच्याबद्धल च्या संबंधाची माहिती मिळवून,समाजात पण सर्वांपुढे त्यावर चर्चा करू लागली. त्यामुळे बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळी हळूहळू दुरावू लागली. जे ओळखीचे लोक होते, ते उलट सुलट बोलू लागले त्याचा विभालाही त्रास होऊ लागला.
यश चे नि माझे फोनवर ह्या संबंधीत बोलणे व्हायचे,मी ‘नाराज’आहे म्हटल्यावर तो विषय बदलून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून माझी गाडी रुळावर आणायचा. “लोकांकडे आपण जास्त लक्ष देऊ नये, त्याचा आपल्यालाच जास्त त्रास होतो” असं सांगून मला लोकांपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त व्हायला मदत करायचा.
ह्या शनिवारी आम्ही पवई आणि ‘विहार लेक’ ला गेलो होतो.
हा परिसर एकदम रम्य आहे, सगळीकडे हिरवळच हिरवळ, रंगी बेरंगी फुलांची बाग, नारळाची, ताडाची, आणि गुलमोहोराची सुंदर सुंदर झाडे,लेक मध्ये विहरणारी छोटी छोटी बदके, ‘बोटिंग’ च्या नक्षीकाम केलेल्या छोट्या छोट्या होड्या, हे सर्व मनाला खूप आल्हाददायक असं वातावरण बघून यश ला कंठ फुटायचा, आणि मला आवडतात म्हणून जुनी गाणी, त्यातल्यात्यात ‘मुकेश ‘ ची तो गुणगुणायचा.
मला लेकच्या काठी, आमच्या आवडत्या गुलमोहोराच्या झाडाखाली बसून, यश शी आध्यात्मिक चर्चा करायला खूप आवडायचे. त्याला देव,देवतांची तशी फारशी माहिती नव्हती,ह्या उलट आमच्याकडे वडील असे पर्यंत कुलदेवतेची नेहमी पूजा असायची.आजवर शांतादुर्गेची ‘पंचमी’ तर आम्ही नेहमीच उपास करून, पूजा करून पाळतो. यशची आई पूर्वाश्रमीच्या ‘कुलकर्णी’, त्यांचे माहेरचं दैवतही ‘श्री शांतादुर्गा’ च, पण त्या साईबाबांच्या’ भक्त होत्या, त्यामुळे गोव्याला यशचे कुलदैवत श्री मंगेशासाठी सुद्धा जाण येणं होत नसे.
माझे आध्यत्मिक बोलणे तो अगदी मन लावून ऐकायचा, पण त्याच वेळी माझा उजवा हात, आपल्या डाव्या हातावर ठेऊन, माझ्या हाताच्या तळहातावर ‘माझेच’ नांव त्याच्या अनामिकेने कोरायचा प्रयत्न करायचा. अश्यावेळी वास्तविक त्याने त्याचे नांव, माझ्या तळहातावर कोरून मला “यश” मय करावे, असे मला वाटायचे. त्याचे कान माझ्या बोलण्याकडे,नजरेने एकटक माझा चेहेरा न्याहाळत, आणि त्याचवेळी, अनामिकेने माझे नाव हातावर कोरायचा,अशी ‘तीन्ही’ कामे तो एकाच वेळी करायचा. मला त्याच्या ‘कॉन्सनट्रेशन ‘ चे कौतुक वाटायचे.यश कानात हळुवार गाणं गुणगुणायला लागला की माझेही देहभान हरपायचे, आणि आम्ही भविष्याच्या सुखी स्वप्नात रमायचो……….
…………(२४)
गेले दोन तीन दिवस मला बारीकसा ताप होता, थकवा खूप जाणवत होता, म्हणून विभाच्या आग्रहाखातर आमचे फॅमिली डॉक्टर ‘नाबर’ ना भेटलो.त्यांनी तपासून ‘ब्लड टेस्ट’ साठी चिट्ठीही दिली,दुसऱ्या दिवशी त्याचे रिपोर्ट्स ‘लॅब’ परस्पर त्यांना पाठवून देणार होती. त्यांनी दिलेली औषधें,गोळ्या ह्यांनी ताप गेला पण विकनेस होताच, म्हणून ह्या आठवड्यात यश च्या फोन वर त्याला विभाबरोबर खरेदीला जाण्याचे कारण सांगून, पुढील शनिवारी नक्की भेटण्याचे पक्के केले. त्यालाही मला भेटल्याशिवाय करमत नसायचे.तो कदाचित घरी येईल काय? एक क्षण मनात भीती वाटली, पण विभाला तो घरी आलेला बिलकुल आवडत नसे,हे त्याला ठाऊक असल्यामुळे, आणि तसा तो मानी आहे, कोणी काही बोललेलं त्याला खपत नसल्यानें, शक्यतोवर घरी येणार नसल्यामुळे मी थोडी निश्चिन्त झाले.
मी त्याला आता आठ दिवस तरी भेटणार नाही ह्या विचारांनी मला कसेसेच झाले,कधी एकदा बरी होऊन त्याला भेटते असे झाले होते. मध्ये थोडे बरे वाटल्यावर, न राहवून मीच त्याला ऑफिस मध्ये फोन करून त्याच्याशी गप्पा मारल्या, तेव्हा कल्पनाचे लग्न ठरल्याचे कळले आणि मी चाटच पडले.तिने मला काहीच कसे सांगितले नाही ह्याचं वाईट वाटलं. विभाला विचारल्यावर, तिला थोडीफार कल्पना असल्याचे, पण नक्की काही माहीत नसल्याचे ती म्हणाली.काय कमाल आहे, माझी एवढी जिवलग वाटणारी मैत्रीण, पण एवढी महत्वाची बातमी तिने माझ्या कानावर का नाही घातली, ह्याच राहून राहून वाईट वाटलं.
दुसऱ्याच दिवशी ती घरी आली. मी मध्यंतरी ग्रुप मध्ये जाण्याचे बंद केले, तेव्हा त्यांच्या घरी तिच्या साठी चांगले स्थळ आले होते,पण दोनच दिवसांपूर्वी फिक्स झाल्याने तिने कोणाला सांगितले नव्हते. काहीही कारण असो,पण मला ते खटकलेच.
थोड्याच दिवसात होणाऱ्या तिच्या लग्नाला, आम्ही आलच पाहिजे असा आग्रह करुन ती गेली.पण मी बहुदा लग्नाला जाईन, असे काही वाटत नाही. माझं दुखावलेले मन त्या निर्णयाला दुजोरा देत होते.
कल्पनाच्या ह्या अश्या वागण्याने आंतर मनावर जास्त दाबाचा, आणि आता बाहेरच्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, एकाएकीं काहींच्या काही उकडायला लागलं, हल्ली कधी, कोण, आणि काय बदलेल सांगता येणं कठीण झालय.
रात्र काही फारशी चांगली गेली नाही.माझं असंच आहे,मनासारखं झालं नाही की मी ‘डिस्टर्ब’ होते.
काल कल्पना येऊन गेल्यापासून, मन गढूळ झाल्यासारखे झाले होते.यश ला भेटायला अजून दोन दिवस शिल्लक होते,यश च्या आठवणींनी मन भरून येत होतं. ह्या दिवसात पाऊस कधीच पडत नाही,पण हल्ली माणसांप्रमाणे, निसर्गाचेही काही खरं नाही, दुपारपासूनच वातावरण ढगाळलेलं होतं. संध्याकाळ झाली तसं बाहेर आभाळ भरून आलं,आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली, आणि मनात यश च्या आठवणींच्या सरींनी, गारवा निर्माण झाला. यश सारखाच मलाही पाऊस खूप आवडतो.आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत.पावसाने जोर धरला आणि मी त्याच्या ऑफिस मध्ये फोन लावला. तो आज ऑफिस च्या कामा साठी लवकरच निघून गेल्याच कळलं.पावसाने प्रफुल्लीत झालेले मन थोडं हिरमुसलं.बाहेर चक्क वीजही चमकून गेली आणि अंगावर काटा उभा राहिला. अश्या ह्या रिमझिम पावसात यश बरोबर किती मजा येईल….. ..शरीरावर रोमांच उभे राहिले. मन यश साठी व्याकुळ होऊन त्याला साद घालू लागले……..
…………(२५)
उद्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे चार ला ठरलेल्या जागी तो मला ‘पिकअप ‘ करण्याचे आज फोनवर निश्चित झाले. मधला आठवडा भेट झाली नव्हती, त्यामुळे आम्ही कधी भेटतो असं दोघांनाही झालं होतं.
‘ऑन डॉट’ आम्ही भेटलो. आज जुहू बीच च्या ‘सी व्युव ‘ हॉटेल ला गेलो, बीच वर च्या ह्या हॉटेल चे ‘लोकेशन’ खूप छान आहे. तेथे बसून संध्याकाळी समोर चा सूर्यास्त बघण्यात एक निराळीच गम्मत आहे. समोर अथांग पसरलेला सागर, मावळतीच्या वेळचे क्षितिज्यावर दिसणारे पिवळसर, तांबूस रंगाचे आकाश आणि खूप मोठ्ठा भासणारा, पण आपल्या पासून दूर दूर परदेशी जाणारा तो सुर्यमित्र.दूर जाणाऱ्या त्या सूर्याला देखील आपल्या सारखेच विरहाचे दुःख होत असेल काय? असा बाळबोध प्रश्न मला लहान पणापासून पडत आला आहे. मावळतीच्या सूर्याला बघताना तो पण विरहाच्या विचाराने नाराज होत असेल,म्हणूनच त्याचे ते तळपणारे तेज शांत होऊन,आपला निरोप घेत असावे. आता समोर अस्ताला जाणारा सूर्य असला तरी माझ्या साथीला यश चा भरभक्कम आधार होता. त्याच्या विशाल छातीवर विसावून, समोर मावळतीच्या सूर्याचे अथांग सागरा वरील दर्शन मला नेहमीच लुभावीत आले आहे.सूर्यास्तानंतर आम्ही हॉटेल च्या पुढील भागातील छोट्या पायऱ्या उतरून बीचवर येऊन हॉटेलच्याच फेंसिंग वॉल ला टेकून बसलो. भरतीला सुरवात झाल्याने समुद्राची गाज मनाला भुरळ घालीत होती. आता शुक्राची चांदणीही हळू हळू प्रकाशत होती. आम्ही गप्पात रंगलो, यश चे बालपण,त्याचे शिक्षण, त्याची पायाने अधू असूनही, आईच्या पशच्यात स्वतः लग्न न करता त्या दोन लहान भावांचे आईच्याच मायेने तिने केलेले संगोपन, ह्यावर यश भर भरून बोलला.
त्याच्या ‘ताई ‘ बद्धल चा त्याचा आदर बघून आपणही पुढेमागे तिला कधीही अंतर द्यायचे नाही, हे मी मनाशी पक्के केले. यशने चिकाटीने अभ्यास करून आपले शिक्षण पुरे करून, पुढे धाकट्या भावाचेही शिक्षण पूर्ण केले होते.मला त्याचा खूप आदर वाटू लागला. तो तसा मानीही आहे. पटकन चिडतोही,पण सृजनशीलही आहे. माझी निवड योग्यच आहे, ह्याचा किंचित अभिमान आणि त्याचबरोबर देवीची माझ्यावर कृपा आहे, हे सुद्धा मी मनोमन जाणलं.
सभोवताली अंधार दाटू लागला तसे आजूबाजुच्या स्टॉल वरचे, हॉटेल्स चे, आणि लॅम्पपोस्ट चे दिवे हळू हळू लागू लागल्याने, ‘आता निघायला हवं’ ह्या जाणिवेने मनाला घेरायाला सुरवात केली. अंगाला झोंबणारा भरतीचा गार वारा, ‘शुक्राच्या’ चांदणीचे मनावर गाजणारे आधिपत्य, आणि यशचा मोहक, गोड सहवास बंड पुकारत होता. तरीही “आता निघायला हवं” ह्या माझ्या सुचनेवर त्याने दुर्लक्ष करून “भिण्याचं कारण नाही स्मित , मी आहे ना, अंधाराला काय भियायचं” म्हणत, मला आणखीनच जवळ ओढलं.
“नको, निघुया आता” मी म्हणाले. ह्या ‘ वेड्या पोराला ‘ मी कसं समजावणार, ” की अरे बाबा, मी अंधाराला नाही रे घाबरत, घाबरते ते फक्त ‘तुलाच ‘,आणि भावी आयुष्याला ” त्याने मला धीर देण्यासाठी प्रेमाच्या भरतीत जवळ ओढले असले, तरी माझा स्वतःच्या मनावर ताबा नसल्याने, मी त्या प्रेमाच्या लाटांमध्ये हेलकावत वाहत जाण्याची शक्यता, आणि त्याच्या आकर्षणात आमच्या हातून नको ते घडून, त्यात मी घुसमटून डुबून जाऊ नये, म्हणूनच पुन्हा त्याला निघण्याचा आग्रह करू लागले. आणि उठून निघाले………
…………(२६)
आयुष्यात माझ्या हातून काही विपरीत घडू नये, माझ्यावर विभाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये, आणि आई बाबांनीं केलेले संस्कार ह्यांना स्मरत, मनाला आणि शरीराला आवरले. हया रमणीय अश्या मनाला अत्यानंद देऊन लुभावणाऱ्या शुक्राच्या चांदणीच्या साक्षीने,आणि मला आवडीच्या ह्या अथांग सागरी किनाऱ्यावर असताना देखील, मी, माझे शरीर आणि मन यश च्या पौरुषी व्यक्तिमत्वावर झोकून न देता, महत्प्रयासाने त्यावर विजय मिळवीत, आणि यश च्या मनाला दुखावण्याचीही शक्यता असूनदेखील, त्या क्षणी तेथून निघण्याचा निर्णय घेऊन उठले. खरंतर मन पण ‘यश ‘वर अविश्वास दाखवायला तयार होईना, तो ही म्हणाला…. “स्मित, इतकं सुंदर वातावरण, आणि त्यात तुझा असा गोड सहवास असताना, तू निघण्याची जी घाई करते आहेस, त्यामुळे मनाला बरं वाटत नाही. अगं, आपण एकमेकांचेच तर आहोत, असं असतांना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही….एक क्षण थांबून म्हणाला, “तुला, माझ्यावर विश्वास नाही का? ” त्याचे हे शेवटचे “माझ्यावर विश्वास नाही का” हे वाक्य, हा प्रश्न, त्याने ज्या काकूळतीने आणि ज्या खर्ज्यातल्या स्वरात विचारला ते त्याच्या हृदयातून निघालेले शब्द, माझ्या जिव्हारी लागले. माझा त्याच्या व्यक्तिमत्वावर पूर्ण भरोसा, आणि विश्वास होता. पण ह्या मोहाच्या क्षणी मनाला आवर घालणेही तितकेच महत्वाचे होते. त्याला वाईट वाटलेले बघून मीच शेवटी त्याला म्हटले “यश, गैरसमज करून घेऊ नकोस,मी तुझीच,आणि तू सुद्धा माझाच आहेस” थांबते मी आणखीन थोडा वेळ,असे म्हणून मीच त्याचा हात हातात घेऊन, आम्ही बीचवर पुढे चालत निघालो. त्याच्या हातातली स्पंदनं, माझ्या हृदयाला जाणवत होती, यश सारखा उमदा, देखणा पुरुष साथीला असतांना कोणती स्त्री त्याच्यावर जीव ओवाळून टाकणार नाही, आम्ही वेड्यासारखे हातात हात घालून एकमेकांना आधार देत किनाऱ्यावर फिरत होतो,वाळूत रुतणारे पाय, आणि पायाला लाटांचा होणारा गार स्पर्श मनालाही हेलकावत होता.यश च्या मनातही बहुदा भावी आयुष्याच्या सुखद संसाराचे आणि आमच्या प्रेमाच्या अतूट बंधनाचेच विचार असावेत. माझ्या कानाला गार वारा झोंबत होता म्हणून मी डोक्यावरुन पदर घेऊन झाकलेल्या कानात,पदर बाजूला सरकवीत तो मुकेश चेच गीत हलकेच गुणगुणला,त्याला माझ्या मनानेही तोच प्रतिसाद देत,प्रेमाची रंगत आणखीनच वाढवली………..
…………(२७)
त्याच्या सानिध्यात रात्रीचे आठ कधी वाजले कळलंच नाही. नेहमी “सातच्या आत घरात ” ही आईची शिकवण हल्ली मोडीत निघाली होती. पण आज मात्र घरी पोहोचायला लेटच होणार होता. मी सारखं घडाळ्याकडे बघत होती आणि घरी पोहोचायला बराच उशीर होईल, ही मनाला लागलेली अपराधाची जाणीव माझ्या चेहऱ्यावर पाहून यश ने बरोब्बर ओळखून, “तसा उशिर झालाच आहे, तेव्हा आपण जेऊनच घरी जाऊ ” असे मला सजेस्ट केले. विभाने काळजी करायला नको, म्हणून आम्ही पुन्हा त्याच हॉटेल मध्ये जाऊन मी विभाला लगेच फोन करून
“आज मी जेऊनच येईन, तू वाट पाहू नको, जेऊन घे, काळजी करू नकोस, थोडा लेटच होईल” असं सांगितलं. विभासुद्धा परचेसिंग करून आत्ताच घरी आली होती. त्यामुळे आता दोघांचे जेवण बनविण्याचा प्रश्नच नव्हता.हॉटेल मध्ये “रवी” ने आमचे पुन्हा स्वागत केले, ह्या आमच्या टेबल मॅनेजर ला यश चांगली टीप द्यायचा, त्यामुळे तो खुशीने आम्हाला चांगली सर्व्हिस द्यायचा.
यश ने मेनू कार्ड माझ्या समोर सरकवत “बोला बाईसाहेब,युवर चॉईस” म्हणत नेहमीचे ‘स्माईल’ दिले. खरतर जेवणापेक्षा त्याच्या सहवासानेच माझे पोट भरले होते.आम्ही आमच्या नेहमीच्या टेबल वरच होतो. माझे लक्ष, जेवणाकडे कमी आणि त्याच्याकडे जास्त, आणि समोर चंद्र प्रकाशात मद्धेच चमकणाऱ्या लाटांवरही होते.गार वारा सुटला होता.आता समोर बीच वर तशी वर्दळही कमी झाली होती. शुक्राची चांदणी सुद्धा मावळली होती. यश जवळ असूनही उगाच एक उदासीनतेची लहर मनातून उभारून आली. सगळं चांगलं चाललेलं असतांना हे मध्येच मला असं उदासीन वाटतं, जेवून झालं, पण मी गप्पच होते.यश मिळाला मी भरून पावले होते.त्याचा सहवास कधीच संपू नये, समोरच्या अथांग सागरा पलीकडे दूर दूर, जिथे माझ्यापासून यशला कोणी हिरावून नेणार नाही,तिथं त्याच्याबरोबर आत्ता जावंसं वाटत होतं. मला असं विचारात हरवलेलं बघून तो ही एकदम गप्प झाला. आता माझ्या खांद्यावर तो विसावला.शांतता खायाला उठली.त्याचा मूड यावा म्हणून मी त्याच्याकडे त्याला आवडणाऱ्या माझ्या ‘ स्मित हास्याने’ त्याच्या नजरेत सामावली, “यश प्लीज बोलनारे, असा गप्प नको बसुस”.
“बोलो बोलो कुछ तो बोलो”………….