– अनंत नारायण संझगिरी
🙏🏻*मनोगत*🙏🏻
मित्रहो ……
मी “मुकेश” च्या गीतांचे एक सदर तयार केले आहे. ही एक “वैफल्य ग्रस्त नायकाची” प्रेमकथा आहे, आणि त्यातील गाणी ही त्या त्या वेळच्या त्याच्या मनःस्तिथीत त्याला आठवलेली, हृदयाला भिडलेली आणि “त्याच्या नायिकेला” आवडणाऱ्या तिच्या “मुकेश” च्या गीतांच्या यादीतील आहेत.
वास्तविक मला सुद्धा मुकेश ची गाणी आवडतात आणिआवाजातील “दर्द” हृदयाला भिडतो …पण…बहुतेक गाण्यातील आशय साधारण सारखा असल्याने, माझ्या ह्या कथा नायकाची सुद्धा, अवस्था, बिकट झाली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आपण ही कथा आणि गाणी संग्रही ठेऊन, एकत्र पणे ऐकल्यास जास्त आनंद मिळू शकेल असं मला वाटतं.
***********************
…………(०१)
आज….आयुष्याच्या मावळतीला, अश्याच एका आभाळ भरून आलेल्या संध्याछायेत, मनाच्या क्षितिजावर जाणवतायत “गत आयुष्याच्या” प्रांगणातील, “नियतीने” आपल्या परीने फासे टाकून “आयुष्याच्या पटावर” खेळवलेले… आणि अजाणता मला हरवून, “तीने” माझ्यापासून हिरावलेले… ते माझे जिवलग, प्राणप्रिय सखे सवंगडी. आणि मनःपटलावर आता हिंदकळणाऱ्या त्या “स्मृतींच्या” अजस्त्र लाटांच्या आघातात….. ह्या निर्जन, एकाकी हृदयाच्या किनारी उठतेय एक जीवघेणी ओढ…. तुझ्या दर्शनाची…भेटीची…सहवासाची….
…………(०२)
तू हृदयाच्या गाभाऱ्यात आहेस, पण तुझी प्रत्यक्ष साथ आता नाही… आहेत त्या फक्त तुझ्या कधीही न पुसून टाकल्या जाणाऱ्या जीवघेण्या आठवणी, शांत मनाला अशांत करणाऱ्या आणि तरीही हव्या हव्याश्या वाटणाऱ्या, अजूनही उगाच वाटत असतं… तू कधीतरी दिसशील, भेटशील, परत येशील, आणि मनाला पुन्हा उभारी येईल, पण ह्या अश्या आशेच्या किरणांवर जगण्यात काय अर्थ? आहे तो आशेचा नुसता कवडसा… फक्त एक मायावी मृगजळ…. वाटतं नुसत्या आठवणींवर जगण्या पेक्षा प्रत्यक्ष जीवनात तू साथीला असतीस, तर जीवन अधिक सुसह्य झालं असतं……
…………(०३)
पण ह्या जर… तर च्या गोष्टी… त्या वेळी प्रकर्षाने वाटायचं, परमेश्वराने तुझी निर्मिती फक्त माझ्यासाठीच केली असावी, तुझं ते सालस आणि लोभसवाणे रूप, बोलके डोळे, काळजाला भिडणारी नजर, नाजुक चाफे कळी सारखं नाक, लांबसडक काळेभोर केस, आणि तुझ्या बोलण्यातला गोडवा आजही स्पष्टपणे डोळ्यासमोर आहे……
…………(०४)
तुला पाहावं, भेटावं, तुझ्याशी बोलायला मिळावं, म्हणून मीच नाही, तर असे अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करायचे. “आपल्यावर”, तुझी “एक नजर” तरी पडावी म्हणून प्रत्येकजण तुला न्ह्याहाळत असे, तुझ्या पुढे पुढे करीत असे… त्यावेळी मला मात्र सारखं वाटायचं की… नाही… “तू फक्त माझ्याकडेच बघावं, माझ्याशीच बोलावं.”… आणि तू फक्त “माझीच” व्हायला हवी असा निग्रह मी मनामद्धे केला, परमेश्वराने तसे घडवावे, ह्या साठी त्याला साकडे सुद्धा घातले होते, तुला आवडेल अशी वस्तू ज्या ज्या वेळी चान्स मिळेल, तशी प्रेझेंट देण्याचा प्रयत्न करीत होतो. तुझ्या एका वाढदिवसाला तुझ्या बद्धल च्या माझ्या भावना मी माझ्या कवितेतून व्यक्त केल्या आणि तुझ्या आग्रहाखातर, त्या दिवशी तुला मुकेशची गाणि आवडतात, म्हणून मी म्हटलेलं ते गीत आजही स्पष्ट माझ्या ओठावर आहे……
…………(०५)
तुझं ते लाडिक हसणं, माझ्याकडे चोरून बघणं,माझ्या मनाला सुखावत होतं. कुठेतरी माझ्या “अंतरीची आस” तुला जाणवू लागल्याचं तुझ्या बोलक्या डोळ्यात मी टिपत होतो. न बोलताच ही तुझ्या नजरेतली माझ्या बद्धलची ओढ, मनाला जाणवून माझ्या हृदयापर्यंत पोहोचली होती. अशी साधी, सुंदर, सुशील जोडीदार मला लाभावी, असं मनोमन वाटत होतं. जगातली सर्व सुख “जिच्या पायाशी” अर्पण करावी ती तूच आहेस, ह्याची खूणगाठ मनाने पक्की केली होती. आपल्या समाजाच्या ग्रुप मध्ये मी व्यक्त केलेल्या माझ्या मतांवर, विनोदांवर, तुझा उस्फुर्त प्रतिसाद बघून, आणि एखादेवेळी, मी ग्रुप मध्ये नसताना, तुझ्या जीवाची होणारी घालमेल बघून, आपल्या मधील ओढीची इतरांनाही चांगलीच कल्पना आली होती…….
…………(०६)
मला तुझ्या बद्धल वाटणारे “आकर्षण” हे त्या वयात मुलामुलीं ना एकमेकां बद्धल जे शारीरिक आकर्षण असते “त्या” प्रमाणेच होते का? आजही विचार केला तरी, माझे मन, बुद्धी, आणि शरीर तसं मानायला तयार नाही. शरीराचे प्रदर्शन करून पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करायचं तुझ्या व्यक्तिमत्वातही नव्हतं, तुझं सालस, सुशील वागणं, हेच मला तुझ्याकडे आकर्षित कारायला पुरेसं होतं. रूप सुंदर होतच, पण त्या पेक्षाही स्वभावातील हळवेपणा, आणि एखाद्याला समजून घेण्याची तुझी वृत्ती, तुझा हा समंजसपणाच, माझ्या मनाला भावला होता. कुठल्याही पुरुषाला स्त्रीच्या शारीरिक “सौंदर्यापेक्षा” तिच्या मनाच्या “औदार्याचे” आणि तीने आपल्याला समजून घेऊन, निस्सीम प्रेमाने, आयुष्य भर साथ द्यावी हीच तर माफक अपेक्षा असते, म्हणूनच त्या ओढीने ते एखाद्या “पतंगा” सारखे प्राणाची पर्वा न करता, त्या “ज्योती” वर झेपावतात……
…………(०७)
तुझ्या चेहेऱ्या वरचे निष्पाप भाव, तुझा निटनेटकेपणा त्यामुळे साध्या वेशभूषेतही तू उठून दिसायचीस, भडकपणाचा लवलेशही कधी तुला शिवला नव्हता. तू उच्चशिक्षित असूनही नम्र, साधी, सालस आणि सुशील होतीस म्हणूनच माझ्या नजरेत भरलीस आणि हृदयात कायमची विसावलीस. तुझं निर्व्याज, निरागस, खळखळ हसणं, वाहत्या स्वच्छ झऱ्या सारखं मनाला आल्हाद दायक भासायचं. आणि चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देतांना चेहेऱ्या वरचं विलक्षण “स्मित” हास्य तुझ्या नावाला साजेसच होतं. एखादी गोष्ट तुझ्या मनाला भावली, पटली, आणि तुझा एखादा मुद्दा, जेव्हा, तुला दुसर्यांना पटवायचा असला, की पटकन तू… तुझ्या मानेवरील काळ्याभोर, लांबसडक, वेणीचा शेपटा डाव्या खांद्यावरून अलगद पुढे छातीवर सरकवून, मुठीत धरून पंख्याचा वारा घेतात, तसा गोल फिरवत,उजव्या हाताच्या अनामिकेने त्या मुद्द्यांवर तू ठाम आहेस ते पटवायचीस, ह्या तुझ्या लाजवाब लकबित, अजूनही माझे मन गुंतून आहे.आणि मग त्यानंतर लगेचच “हो की नाही” हा उच्चार, ज्या लाडिक स्वरात आणि दिमाखाने तू विचारायचीस, तेव्हा तुझ्या हो… ला….”हो”… म्हणण्या शिवाय त्या नंतर गत्यंतरच नसायचे……
…………(०८)
योगायोगाने आपण वारंवार भेटायचा प्रयत्न करायचो, ह्यात खरंतर योगा योग कमी आणि भेटी साठी मुद्धाम ठरवून काढलेली निमित्त ह्यांचाच भरणा जास्त होता. सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात त्याचा प्रत्यय येत होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी दिलेल्या संध्याकाळच्या पार्टीत तुझ्याकडून “प्रेझेंट काय देऊ” ह्या तुझ्या, मला “अपेक्षित” असलेल्या आणि आतुरतेने वाट पाहत असलेल्या प्रश्नाला, मी लगेच तुझ्या नजरेला नजर देऊन नजरेतूनच “तूच मला सर्वस्वी हवी आहेस” हे दाखवून, उत्तर दिलं… तरी पुन्हा “यश”… “प्लीज सांग ना… काय गिफ्ट देऊ? प्ली…ज” हा तोच प्रश्न, तू ज्या लाडिक पणे, चेहेऱ्यावर अलौकिक भाव आणि नजरेतील विलक्षण ओढीने विचारल्यावर, मी सुद्धा त्याच ओढीने पुन्हा नजरेतून आणि हळुवार शब्दांनी, “तू स्वतःच मला गिफ्ट म्हणून हवी आहेस” हे तुझ्या कानात सांगताच, तू शुभेच्छा देण्यासाठी पुढे केलेला तुझा हात माझ्या हातात देऊन, शेवटी त्या थरथरलेल्या हाताने “यश, मी तुझीच आहे” असे म्हणून मला स्वीकारल्याची ग्वाही दिलीस… “येस.”… मी जिंकलो होतो… परमेश्वराने माझ्या हाकेला ओ देऊन, प्रार्थना सफल केल्याची आणि आजच्या माझ्या वाढदिवसाचे “अनमोल गिफ्ट” दिल्याची प्रचिती आली………..
…………(०९)
तु माझी झाली होतीस, पण माझ्या वाढदिवासानंतर, आपण दोघेचं “एकत्र” भेटलो नव्हतो, तुझा प्रत्यक्ष सहवास लाभावा, म्हणून माझं मन “अधीर” झालं होतं. “१४ फेब्रुवारी” च्या शनिवारी, “अतुल ” ने त्याच्या घरी दिलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत, मी माझे नशीब आजमावयाच ठरविले होते.पार्टीत माझे सर्व लक्ष तुझ्यावरच केंद्रित होतं,माझ्या प्रेमाला तू नक्कीच प्रतिसाद देशील ह्याची खात्री तुझ्या नजरेने, माझ्या हृदयाला देताच, तुला घरी ड्रॉप करण्याची संधी “मी” जुळवून आणली. मी घरी जाताना तुला ड्रॉप करिन ह्या माझ्या प्रपोजल ला अतुल ने ही होकार दिला.तू सुद्धा माझ्याबरोबर येण्यास तयार झालिस,आज “काही करून तुझा होकार मिळवून, तुला जिंकायचच” हा मनाचा निश्चय मला पूर्णत्वाला न्यायचा होता. टॅक्सीतच तुझा हात, माझ्या हातात घेऊन, आपण दोघे “बाहेर भेटुया” का? ह्या माझ्या प्रश्नावर, तु सुद्धा नजरेने, आणि माझ्या हाताला ग्वाही देत, पूर्ण “प्रतिसाद” दिलास. त्या वेळच्या तुझ्या “स्मितहास्यानेच” मी सुखावलो.”यश” च्या गालावर आता “स्मित” आणि “स्मित” च्या हृदयाला “यश” ची साथ पक्की झाली. मी जिंकलो होतो. नशिबाने माझ्या बाजूने कौल दिला होता. नेहमी प्रमाणेच मी “यश”स्वी ठरलो. मनोमन देवाचे “आभार” मानले, माझ्या भावनांची कदर तू केलीस, आणि मना सारखा जोडीदार मला लाभला म्हणून, “स्वप्नातील” माझ्या ह्या “परीचे” सुद्धा मी मनःपूर्वक आभार मानले “,आनंदाला परिवार उरला नव्हता, खरतर आज पर्यंत “व्हॅलेंटाईन” वाटणाऱ्या “अतुल” ची जागा मीच पटकावल्या सारखे वाटले. माझ्या ह्या विजयापुढे मला आकाशही ठेंगणे वाटले. आणि आपण पुढील शनिवारी “फाईव्ह गार्डन्स” ला भेटायचं नक्की करून त्या आनंदात तुझा निरोप घेतला……
…………(१०)
माझ्या त्या वाढदिवासानंतर माझं जीवनच बदलून गेलं.मनावर आता तुझंच साम्राज्य होतं, आणि मी सुद्धा “सम्राट” असल्याचं मला जाणवत होतं.तुला वारंवार भेटायला मी उत्सुक आणि आतुर होतो. मी भेटल्यावर तू सुद्धा खूप सुखावत होतीस. वेळात वेळ काढून आपण एकमेकांना जाणून, समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. हृदयाला हृदयाची ओळख पटत होती, मनाला मनाची ओढ होतीच, एकमेकांना कधी भेटतो असं व्हायचं, प्रफुल्लित होऊन, अनिवार ओढीने एकमेकांना भेटणं हाच एकमेव उपक्रम त्या वेळी होता. एखादं दिवशी जरी आपण भेटलो नाही तरी जीव कासाविस व्हायचा. तू फार हळवी होतीस त्यामुळे काही कारणास्तव भेट झाली नाही, तर तू रुसायचीस. तुला खरोखरीच फार वाईट वाटलेलं असायचं, अगदी रडवेली व्हायचीस, आणि तुझी समजूत काढून झाल्यावर, माझ्या खांद्यावर विसावून तू अश्रूंना वाट मोकळी करून ध्यायचीस. तुझ्या नाजूक हृदयाला “प्रजक्ताच्या” फुला प्रमाणे जपावे म्हणून माझं हृदयही शक्यतोवर तुला नेहमी भेटायला आतुर असायचं………
…………(११)
तू आता माझी झालीस ह्या एकाच विचाराने, दिवस रात्र, उठता बसता, खाता पिता, तूच नजरे समोर असायचीस, तुझ्या शिवाय, तुझ्या वाचून, मला काहीच करमत नव्हतं, वारंवार तुला भेटत होतो. तुझं रूप डोळ्यात साठवित होतो. आपण निरनिराळ्या ठिकाणी फिरायला जायचो. पण प्रत्येक नव्या ठिकाणी मला तुझं ‘नवच’ रूप दिसायचं. तुझ्यातला हळुवार पणा, तुला आवडणारा निसर्ग, त्याच्या छटांप्रमाणे तुझ्याही मूड मद्धे होणारा बदल, मनाला सुखावत होता. तुला ‘मोरपिशी रंग’ उठून दिसायचा, आणि म्हणून ‘ह्याच’ रंगाचा शालू, माझ्या आग्रहाखातर नेसून, तू तुझी “खास मैत्रीण” आणि माझी “मामे बहीण” “कल्पना” च्या लग्नाला आली होतीस. त्या वेळी माझ्यासकट सर्वांच्याच नजरा तुझ्यावर खिळल्या होत्या. त्या वेळेचं तुझं ते सालस, सुशील, खानदानी, असं हृदयावर कोरलं गेलेलं रूप, अजूनही नजरेत साठवून आहे.तुझ्या समोर, तुझ्या पुढे, मी किती थीटा आहे असं त्यावेळी मला जाणवलं. दिवसेंदिवस आपण मनाने खूप जवळ येत होतो. तुझी समजूतदार वृत्ती, समंजसपणा, एखाद्या बद्धलची कणव, आणि “आध्यात्मिक” प्रगल्भ विचार, तुझा परमेश्वरावरचा दृढ विश्वास, तुझ्या “कुलदैवत” “शांतादुर्गेची” तू दिलेली “माहिती” आणि सांगितलेली “महती”, ह्याने मी फार भारावून गेलो होतो. वास्तविक माझ्या आईचेही ‘ते’ माहेरचे कुलदैवत, पण “श्रीशांतादुर्गेची” सोडाच, आमच्या कुलदेवाची “श्री मंगेशाची” ही महती मला कधी कळली नव्हती. एकंदरीत, तुझ्या सर्वच गुणांवर मी फिदा होतो.ऑफिसमध्ये काम करतांना, मित्रांमध्ये असतांना सुद्धा, ध्यानी मनी, तूच असायचीस. माझं हे तुझ्याच विचारात गुंतलेले मन, आणि हरवलेली नजर बघून मी तुझा “आशिक “आहे आणि तुझ्यासाठी “दिवाना” झालोय असं सर्व म्हणायचे, तुझ्याच नावाने, मला चिडवायचे……
…………(१२)
आपलं नातं दृढ झालं. एकेकाळी तू ‘माझी व्हाविस’ ह्या साठी मी ‘सर्वस्व’ पणाला लावलं होतं. तुझ्या वर बरेच फिदा होते, पण ह्या सर्वात तू माझी निवड केलीस. आपण एकमेकांचे झालो, ह्यात खर तर देवाचे खूप आभार मानायला हवेत. कदाचित हे “जन्मोजन्मीचं दोन आत्म्यांच” मिलन असावं. तुझ्यासारखी सहचारिणी मिळायला खूप भाग्य लागतं. तू सर्वांग सुंदर होतीस, पण फार हळवी होतीस, त्यामुळे तुझे मूड मी कसोशीने सांभाळत असे, तूझी कांती सोनचाफ्या प्रमाणे नितळ, व्यक्तिमत्वात सुरंगीच्या फुलांची मोहकता, पण प्रकृती प्राजक्ता सारखी नाजूक. मागे दोन वर्षांपूर्वी, तुझी तब्बेत ही बिघडली होती, कधी काय होईल आणि तू रुसशील, नर्व्हस होशील, म्हणून मी तुला जपतही होतो. असेच एकदा तुझ्या बरोबर समुद्रकिनारी आपण गप्पांमध्ये रंगलेलो असतांना, आणि तुझ्या आवडत्या “आध्यात्मिक’ विषयावर चर्चा चालू असताना, “मावळत्या सूर्याला” पाहून मनाला होणारा आनंद एकीकडे उल्हासित करत असतानाच, तू अचानक, एकाएकी गंभीर झालीस, आणि खिन्न मनाने, त्या मावळत्या सूर्याला एकटक पाहू लागलीस, माझ्या खांद्यावर विसावलेले तुझे डोके आणि हात बाजूला करून, कोणत्या तरी गहन विचारात गढून गेलीस. असं तुला एकाएकी का व्हावं असा प्रश्न मला पडला, आणि आपला आनंद क्षणभंगुर टिकला… आपल्या प्रेमाचा तळपणारा सूर्यही असाच “अस्ताला” जाईल का? ह्या विचारांनी माझं मन चलबिचल झालं……
…………(१३)
मला, तिला भेटल्याशिवाय चैनच पडत नसे. पण मध्यंतरीच्या काळात, का कुणास ठाऊक ती मला टाळतेय, असं उगाच मला वाटायला लागलं, तिला त्याचं कारण विचारावं म्हणून, “विहार लेक” ला “लमोहोराच्या” सानिध्यात असतांना, मी न राहवून… ती दुखावली जाणार नाही, अश्या तर्हेने विचारण्याचा प्रयत्न केला. उसनं अवसान आणून तिने मला “निरुत्तर” केले. मी सुद्धा विषयांतर करून, तिला बरं वाटावं म्हणून, तिच्या आवडीच्या विषयावर, “अध्यात्मावर” गाडी नेली.पण ह्या वेळी मात्र तिनेच डोळ्यात पाणी काढून मला विचारलं “यश, समजा मी तुला सोडून गेले, भेटलेच नाही, तुझ्यापासून दूर कुठेतरी एकांतात राहायला गेले, तर तू काय करशील?” तिच्या नजरेतले ते जीवघेणे भाव बघून, मी हादरलो…., ह्या वेळी मनाच्या गुलमोहोरावर, बहुदा पुन्हा पाल चुकचुकली, म्हणजे, माझ्या मनाला जे वाटत होते, ते खरच तसे घडणार का? भविष्याचे हे संकेत असावे का?……. “छे, तू असं करण शक्यच नाही, माझ्या शिवाय तू आणि तुझ्या शिवाय मी राहूच शकणार नाही” “स्मित” जर तू मला दुरावलीस तर, विरहाच्या वाळवंटात माझं मन, तुझ्या एका दृष्टिक्षेपासाठी, तुला शोधत वण वण भटकेल, प्रत्येक मृगजळ पार करत, तुला प्रत्यक्ष भेटूनच हा जीव, तुझ्या भेटीची तहान भागवेल. जिथे तू नाहीस तो स्वर्ग ही नरकच असेल, जीवनावरची आसक्तीच हरपेल, हे जगच मला पारख होईल, तेव्हा प्लीज “राणी” असा विचार सुद्धा मनात येऊ देऊ नकोस.” अस म्हणून तिला कवेत ओढले… हुंदक्यावर हुंदके देत, बराच वेळ ती तशीच अश्रूंना वाट मोकळी करून देत एखाद्या लहान मुली सारखी मला बिलगून राहीली.बहुदा माझ्याही तप्त अश्रूंच्या धकीने, सोनचाफा कोमेजण्याच्या मार्गावर होता,सोनेरी रंगाच्या तिच्या कांतीच्या छटांवर तांबूस झलक जाणवायला लागली.आम्ही दोघेही निरव शांततेच्या विश्वात हरवलो होतो…….
…………(१४)
सगळं सुरळीत चाललं असतांना मध्येच असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हत,मनात राहून राहून प्रश्न होता, ती मला का टाळतअसेल?….. कळायला काहीच मार्ग नव्हता, एकाएकी तिने माझ्या पासून दुरावण्याची भाषा का आरंभली, तेच कळत नव्हतं. माझं कशातच लक्ष लागत नव्हतं, रात्रंदिवस झोप उडाली होती. माझ्या नशिबी पुढे काय वाढून ठेवलंय कोण जाणे, तिच्या मनांत असे विचार का यावे…, तिला मी हवा तर आहेच, तिच्या नजरेत तर तसंच दिसतं, मग ती टाळाटाळ का करतेय,असं कोणतं कारण, तिला माझ्या जवळ येण्यापासून…, मला भेटण्या पासून अडवतय?… का कोणी मुद्धाम आमच्या मार्गात काटे पेरतय? हे, आणि असे अनेक प्रश्न सारखे मला भेडसावत होते. ती माझ्या शिवाय राहू शकेल? पण ‘ह्या प्रश्ना पेक्षा सुद्धा, मीच तिच्या शिवाय राहू शकेन काय’? तिच्या शिवाय जीवन सुसह्य होईल? मला भीती वाटत होती, खरोखरीच ती मला सोडून जाईल? मनात शंकांचे काहूर उठलं होतं, तिला पुनः प्रत्येक्ष भेटायला हवंच, मी बेचैन झालो होतो, परमेश्वराने आमच्यात दुरावा आणू नये म्हणून प्रार्थना ही करीत होतो………
…………(१५)
आमचे हे असे वारंवार भेटणे ग्रुप मधील बऱ्याच मंडळींना खुपत असे, वास्तविक आम्ही एकमेकांना अनुरूप होतो. आणि मी ही सुशिक्षित असून चांगल्या नावाजलेल्या कंपनी मद्धे चांगल्या हुद्यावर अधिकारी, त्यामुळे आमच्या लग्नाला तशी कोणाची हरकत असण्याची गरजच नव्हती. पण मध्यंतरीच्या काळात ती जी मला भेटायला टाळाटाळ करीत होती, ते कदाचित, मी तिच्याशी लग्न करिन की नाही? ह्या बद्धल, कोणीतरी तिचं मन भरवलं असेल म्हणूनही असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय, ह्या बद्धल तिला शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं. एकमेकांना हृदयाची ओळख पटल्यावर, अश्या शंकेला मनात जागाच राहत नाही. आम्ही एकमेकांना मनोमन वरलेच होते. आणि तिच्या सानिध्यात भविष्याची सुंदर, सुरेल स्वप्नही पाहिली होती. आता तिच्या मनाला “पुन्हा एकदा” हळुवार पणे थोपटून, रिझवून, मला पहिल्यांदा तिला पाहिल्या पासून, आजवर चे माझे “मनोगत”, आणि, “लग्नाच्या आश्वासनाची,” “गोड अंगाई” गाऊन तिला निर्भय करून, शांतपणे भविष्याच्या स्वप्नात घेऊन जाण्याचे ठरविले, मला वाटणाऱ्या तिच्या बद्धल च्या प्रेमाचे, तिच्यासाठी किती आणि कसे झिजतोय, हे पुन्हा एकदा पटवून, तिला निश्चिन्त करावे, त्यामुळे ती मला अव्हेरणार नाही, भेटायला टाळाटाळ करणार नाही, असा ठाम विश्वास मनात बाळगून, तीला लगेच पुन्हा भेटायला बोलवायचे निश्चित करून मनाला निश्चिन्त केले……….
…………(१६)
तिने भेटायला यायला थोडे आढेवेढे घेतले, पण आमच्या नेहमीच्या “सी व्यूव हॉटेल” मध्ये ठरलेल्या वेळी माझ्या बरोबर येण्याचे मान्य केले. नेहमी प्रमाणेच मी तिला “पीक अप” केले.पण आज तिचे माझ्या वाटेकडे डोळे नव्हते, तिला “पाठमोरी”, उभी बघून, मनही नाराजले, तरी साद घातली. साध्या साडीत आणि पाठमोरी सुद्धा, ती मनाला खूप भावली. तिचा तो नीटनेटके पणा, साधी राहणी आणि उच्च विचार सरणी तिच्या जीवनाचा एक “अविभाज्य” भागच बनून गेला होता. आम्ही जुहू बीच ला पोहोचलो. ह्या आमच्या ठरलेल्या बीच हॉटेल च्या, ठराविक सीट वरून, अथांग सागराचे विलोभनीय दर्शन होते, संध्या समयी तर सूर्यास्त ही मनमोहक दिसतो. ती बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे, मन उल्हसित होते, आज मी “लग्नाची ग्वाही” देऊन तिला निश्चिन्त करायचे, भारावून टाकायचे,आणि तिच्या मागच्या भेटीतील कोमेजलेल्या मनाला, हमखास “पुन्हा उभारी” देण्याचे ठाम केले होते. ती सुद्धा आज प्रसन्न दिसत होती, गेले काही दिवस आपण “उगाचच नको ते विचार” करीत होतो असे वाटले. तिने नेहमी प्रमाणेच “ब्लॅक कॉफी” पसंत केली. आजचा दिवस महत्वाचा, आणि “निर्णायक” ठरणार होता… मी लग्नाचा माझा प्लान…, कधी… कसं… आणि कश्या प्रकारे लग्न करायचे, वैगेरे स्पष्ट केले. पण हे सर्व ऐकताना ती मात्र गप्पच होती, कुठल्याश्या गहन विचारात होती, बऱ्याच वेळाने माझ्या “नजरेला नजर न देता,” मावळत्या सूर्याकडे बघत फक्त इतकंच म्हणाली… “व्हेरी…सॉरी”… यश, माझा नाईलाज आहे ” मी अवाक होऊन पाहतच राहिलो……
…………(१७)
तीच्या चेहेऱ्यावर सदैव “स्मितहास्य” असायचं, आणि ते “आजन्म” राहावं म्हणून काहीही करण्यास माझी तयारी होती. पण आज दैवाने आम्हा दोघांकडेही पाठ फिरविली. ती खूष राहावी, प्रफुल्लित राहावी म्हणून “लग्नाचा प्रस्ताव” सुद्धा मी तिच्यापुढे मांडला होता, पण नियतीने “हुकुमाच्या राणीने” हात सर करून, डाव माझ्यावर उलटवला. तिचा “अस्पष्ट”…पण “नकारच” माझ्या पदरी पडला. डाव तिने जिंकला आणि मी नक्की हरलो, असं मला एक क्षण वाटलं खरं,पण त्या तिच्या नकारानंतर, माझ्या काळवंडलेल्या चेहेऱ्यावरचे भाव बहुदा तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेले असावे. तिच्या नावातील “स्मित ” तिच्या चेहेऱ्याच्या क्षितिज्यावरून, त्या मावळतीच्या सुर्या पाठोपाठ, ‘अंतरीच्या’ खोल सागरात लुप्त झाले. तिची आवडती “ब्लॅक कॉफी” कपात तशीच “काळी ठिक्कर” होऊन पडली होती. तिला नेहमी प्रमाणे घरापर्यंत टॉक्सितून सोडायला गेलो. खळखळणारा स्मित हास्याचा झरा आमच्यातील दुराव्याला वाकुल्या दाखवीत कधीच आटला होता. टॉक्सितून उतरताना तिच्या “केविलवाण्या” नजरेने क्षणभर का होईना, आता माझ्या काळजाचा ठोका चुकविला., आणि पाठमोरी, ती दिसेनाशी होईपर्यंत, ज्या जाडजूड काळ्याभोर लांबसडक केसांवर मी जीव ओवाळून टाकायचो,आज त्या नागिणीने “शेपटीनेही” डंख केल्याचा भास झाला………
…………(१८)
उराशी बाळगलेल्या ‘स्वप्नांची’ राखरांगोळी होण्याची चिन्ह नजरेसमोर स्पष्ट दिसत होती. भावनांच्या बाजारात माझ्या पदरी “दिवाळखोरी” शिवाय हाती काहीही शिल्लक राहिलेले दिसत नव्हतं, तिला घरी सोडून परत माघारी वळलो खरा, पण मन अजूनही तिच्या त्या “केविलवाण्या” नजरेतच बंदीस्त होतं, परतीचा मार्ग डोळ्यासमोर धुरकट दिसत होता, काही सुचत नव्हतं,अश्या हतब्बल अवस्थेत घरी जाण्याच बल शरीरात शिल्लक नव्हतं, एकाकी….एकटा…. पडलो होतो, ‘पौर्णिमेच्या’ चंद्राचा उदय व्हायला अजून बराच वेळ असावा, निराशेच्या ढगाआड तो बहुदा लपला असावा. माझ्या “आईला” मी शपथेवर दिलेल्या, आणि आजपर्यंत कटाक्षाने पाळलेल्या, वचनांचा चुराडा होण्याची वेळ आली होती. माझी पावलं “ऋषी बार अँड रेस्टॉरंट” कडे आपसूकच वळली. “मदीराक्षीच्या” नजरेतील नशा उतरे उतरे पर्यंतच, “मदिरेच्या” नशेकडे ह्या निराश, खजील, मनाने, लगेचच धाव घ्यावी ह्याच नवलही वाटलं, खूप वर्षे पाळलेली पथ्ये, वचने, दिलेले शब्द, आणाभाका, दुराव्याच्या एका झंझावाताने, पालापाचोळ्या सारखे भविष्याच्या मार्गावर ‘नियतीने’ उडवून दिले.रेस्टॉरंट च्या गेट वरील “गार्ड” ने सलाम ठोकला, आणि माझे मन ‘थाऱ्यावर’ आले. नजरे समोरील तिचे “स्मितहास्य” आणि केविलवाणी नजर, माझी वाट अडवून, आता इथून ‘माघारी वळण्याची’ विनंती करू लागले. आता “बार” मध्ये “आत” जाण्याची गरजच भासली नाही, तृप्त होईस्तोवर “ती नजर” आणि ते “स्मित” ह्याचीच “किक” चढली होती. आणि “तिच्या किक” नेच, मला आई ला दिलेल्या “वचन पूर्ती” च्या मार्गाकडे वळवलं. मी तिच्या आठवणींच्या नशेतच, घरापर्यंत कसा काय पोहोचलो कुणास ठाऊक……
…………(१९)
त्यानंतर दोन दिवस मी ऑफिस ला गेलोच नाही. बिछ्यान्यावर पडलो की सारखी तिचीच आठवण यायची, तिची सुद्धा आता काय अवस्था असेल?…. माझ्या सारखाच तिलाही ह्या दुराव्याचा, तितकाच त्रास होत असेल?… असं काय झालं असेल की ज्या मूळे तिने, मला नकार दिला? असे अनेक प्रश्नः मला भेडसावत होते. त्या भेटीत, तिला असे प्रश्न विचारायच्या मनस्थितीत मी नव्हतो, अनपेक्षितपणे नकार मिळाला आणि मी हादरलो होतो, पायाखालचा’ तिच्या आधाराचा’ भक्कम दगड निसटून, मी अपेक्षा भंगाच्या खाईत लोटला गेल्या सारखी माझी गत झाली होती, ती सुद्धा त्या क्षणी, काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. सारखं तिला भेटावं असच वाटत होतं. मनाची अवस्था बिकट झाली होती, एकले पणाच्या आगीत मी होरपळत होतो. तिचं जवळ असणं गरजेचं होतं. प्रेमात दोघेजण असतात, मायेचं अतूट “बंधन” असतं आणि त्यात समाधान असतं, मनाला भरारी असते…, आता एकटाच आहे पण स्वतंत्र नाही, आठवणींच्या साखळदंडांनी, जखडल्या सारखं आणि अपेक्षा भंगाच्या अंधार कोठडीत “बंदीस्त” केल्या सारखं वाटतंय. पंखात तिच्यापर्यंत पोहोचण्याची भरारी घेण्या इतपत बळ नाही… मानसिक छळ काय असतो, त्याची प्रचिती आली….पण तरीही मी तिला पुन्हा भेटेनच………
…………(२०)
तिला भेटून, आठ दिवस होऊन गेले, तिचा फोन येईल अशी आशा वाटत होती. मी ऑफिस ला नसतांना कदाचित तिचा फोन येऊन गेला असेल, म्हणून सगळ्यांना विचारूनही झालं, माझ्या “खोटया आशेवर” आणखीन पंधरा वीस दिवसांचा अवधी लोटून गेला, पण व्यर्थ. ह्या काळात, मी स्वतःहून, बरेच वेळा, तिच्या घरी फोन केले होते, पण फोन बराच वेळ नुसता वाजून जायचा, बहुदा घरात कोणीच नसावं. मी आज पुन्हा घरी “ब्लॅंक कॉल” देऊन पहावा म्हणून फोन केला, बराच वाजल्यावर, फोन तिने उचलला आणि मी “हॅलो” म्हणताच “माझा आवाज” ऐकून कॉल कट केला. खरं तर तिने असं केल्यामुळे, मी थोडा दुखावलो, दुराव्याच्या दरीची खोली आणखीनच वाढली. तरीही पुनःपुन्हा फोन करीत राहिलो, पण कोणीच अटेंड करत नव्हतं. माझ्या एका कॉल साठी सदैव आतुर असलेली, माझा आवाज ऐकायला आसुसलेली, मी ठरल्याप्रमाणे स्वतः फोन केला नाही तर, दोन दोन दिवस रुसवा, फुगवा करणारी “माय स्वीट लिटल डॉल” आज मात्र…… माझ्या पापण्यांच्या ओलावलेल्या कडांनवरून मला हुलकावण्या देत, दिसेनाशी झाली. माझ्या आवाजाला प्रत्यत्तर न देता माझ्या “ओ” ला “ओ” देण्यात कसर करून माझ्या “अश्रूंच्या” साहाय्याने माझ्या गालावरचे “स्मित” ओझरून, माझ्या छातीवर विसावली…. छातीवर दोन्ही बाजूनी हेलकवणाऱ्या अश्रूंच्या, ह्या चमकणाऱ्या मोत्यांच्या माळेतल्या, ‘हृदयाकृती’ इवल्याश्या “लॉकेट” मध्ये तिची “स्मित प्रतिमा” मी बंदीस्त करून घेतली, मी तीला अंतर देऊ इच्छित नव्हतो, मी कॉन्टॅक्ट करीत राहणार…, भेटण्याचा प्रयत्न करीत राहणार, आज नाही तर उद्धया… परवा… कधीतरी का होईना, माझ्या ‘आर्त हाकेला’ ती साद देईलच……….
…………(२१)
माझं कामातील लक्ष पार उडून गेलं होतं, माझं डोकं ठिकाणावर नव्हतं… वर वर माझं काहीच बिनसलं नाही, असं जरी मी सहकाऱ्यांना, मित्रांना, घरातल्यांना, नातेवाईकांना दाखवण्याचा प्रयत्न करीत होतो तरी खचलेल्या मनावर आनंदाची इमारत कशी काय उभी राहणार? मला वेड तर नाही ना लागलय? असा दाट संशय जिवलगांना येऊ लागल्याचं, त्यांच्याच बोलण्यावरून मला जाणवायला लागलं होतं, मला जर तिची इतकी ओढ वाटतेय, तर तिला काहीच का वाटत नाही? मी वारंवार फोन करायचा प्रयत्न करून थकलो, माझ्या भावनांना, प्रेमाला, तिच्या बद्धलच्या ओढीला, काहीच किंमत उरली नाही का? माझ्या दुखावलेल्या हृदयाची तीला काहीच तमा कशी काय वाटत नाही? तस जर असेल तर तो दोष तिचाच म्हणावा लागेल. ह्या ठेचाळलेल्या हृदयाला तिचीच ओढ आहे, त्यातील प्रेमाच्या झऱ्याला तिच्या मनाचीच ओढ आहे, हा झरा त्या “स्मितहास्या” च्या नदीतच विसावा घ्यायला,त्यात सामावून, एकरूप होऊन जायला हवा. अंतरीची ही आंस, आणि विरहाच्या आगीत होरपळणारे, हे ठेचाळलेलं मन असंच करपून गेलं तर पुढे जगण्यात तरी काय अर्थ, आणि जर ती मला भेटणारच नसेल तर तर जगण्यापेक्षा मेलेलंच बरं…….
…………(२२)
तिला भेटता येत नव्हतं, आणि आठवणीं माझी पाठ सोडायला तयार नव्हत्या, किती विसरायचे म्हटले तरी शक्य होत नव्हते. काय करावं, कसं भेटावं?… तिने मला भेटायला यावं, निदान फोनवर तरी बोलावं असं सारखं वाटत होतं. जे क्षण तिच्या सोबत घालविले, त्या आठवणी मना भोवती फेर घालून नाचत होत्या, त्यांच्या त्या वारंवार गोल गोल फेर घालण्या मुळे, मला गरगरल्या सारखे होत होते. जेथे जेथे आम्ही जात असू, एकत्र बसत असू, तासन तास बोलत असू ती सर्व ठिकाणं डोळ्यांपुढे सारखी येत होती, ती जवळ नाही, पण तिच्या आठवणींना बरोबर घेऊन मी आज “बीच हॉटेल” ला निघालो. आत ‘एकट्यानेच’ शिरतांना जीवावर आलं,… मला एकट्यालाच आलेलं पाहून तेथिल, आम्हाला नेहमी अटेंड करणाऱ्या “रवी” लाही अचंबा वाटला… “साब आज आप अकेले च” मी भानावर आलो. तोंड फिरवून, नेहमीच्या सोफ्यावर जाऊन बसलो, समोर भरतीला सुरवात होऊन, मनात आठवणींना ‘उधाण’ आलं होतं. एक एक लाट हृदयाच्या किनाऱ्यावर येऊन थडकत होती. रवी ने नेहमीची माझी “स्वीट लाईम सोड्या” ची ऑर्डर पुढ्यात ठेवली….. आठवणींचा एक एक बुडबुडा ग्लास च्या तळातून वर वर येऊन मस्तकात जाऊन फुटत होता. आज समोर आकाश ही ढगाळलेलं होतं, सुर्यदेवही आज नाराज होऊन रुसून ढगामागे दडले होते. समुद्राला उधाण होते पण आज बाजूची सीट मोकळी होती, त्यामुळे मनाला उभारी नव्हती. रित्या मनाने, आणि आठवणीनि तिचाच ध्यास घेतला होता. बाजूच्या रित्या सीट नेही बहुदा तिला साद घातली असावी, “तिलाही” राहून राहून माझ्या मनासारखच एकाकी वाटत असावं… “प्लीज ये…. राणी….. हा गुलाम, डाव हरायला तयार आहे…. ये एकदा तरी ये, हा किनाराही आज तुझ्याशिवाय ओस पडलाय… ये…” परत येऊन ह्या अस्ताला जाणाऱ्या भावनांना तुझ्या हृदयाच्या क्षितिजावर थारा दे… तुझ्या सोनेरी सहवासाने, अश्या संध्यासमयी, माझ्या हृदयाच्या गालिच्यावर, पुन्हा एकदा न्याहाळू दे मला ते तुझं “गुलाबी स्मित हास्य.”…….
…………(२३)
ती जर आपणहून फोन करीत नाही, भेटत नाही तर तिला भेटायचे निरनिराळे पर्याय मी शोधत होतो. आपण तडक तिच्या घरीच जावे काय, असा विचार माझ्या मनात रुंजी घालत होता. पण तिच्या ‘धाकट्या बहिणीला’ मी आवडत नसे, तिच्या मनात माझ्या बद्धल कटुता होती, त्यामुळे ती आमचा द्वेष करायची, घरी डायरेक्ट गेलो तर ती सुद्धा माझा अपमान करेल ही मनात भीती होती. मला एकदम तिच्या आते भावाची “अतुल” ची आठवण झाली, आम्ही ‘रुपारेल कॉलेज’ मध्ये चांगले जिवलग मित्र होतो, तो हुशार होता, त्यामुळे इंटर नंतर, त्यांने मेडिकल ला ऍडमिशन घेऊन, पुढे M.S. ही केले. आणि मी M.Sc. करून नंतर M.B.A केले. तो आमच्या ग्रुप मध्ये होताच, आणि “तिच्याही मर्जितला” होता. माहीम ला “शितला देवी टेंपल” च्या जवळ रहात होता, आणि “माहीम कॉजवे” जवळ त्याची कॅन्सलटिंग रूमही होती. त्याला आमच्या दोघांचे संबंध बऱ्या पैकी ठाऊक होते. नाईलाजाने मी त्याला सध्याची माझी सर्व परिस्तिथी सांगून, “प्लीज” तिने मला एकदा तरी भेटावे अशी गळ घातली, त्याच्या… “जरूर प्रयत्न करिन” ह्या ‘प्रॉमिस’ मुळे मी निर्धास्त झालो. बऱ्याच दिवसांनी मनाला उभारी आली. माझ्या मनाच्या ह्या निराशमय, अंधाऱ्या रात्रीत ‘अतुल’ मुळे आशेचा किरण दिसला. तिच्या येण्याने, भेटण्यांने दुराव्याची ही रात्र सरून पुन्हा प्रेमाच्या सहवासाची पहाट उजाडेल, ह्या कल्पनेने मी सुखावलो. तिच्या कडून फार काही अपेक्षा आता राहिल्या नव्हत्या. पण मला “अव्हेरण्याचे” कारणही कळले नव्हते. त्यामुळे मन आणखीनच बेचैन होते. आरोप, प्रत्यारोप तर शक्यच नव्हते. उलट मला माझीच, माझ्या ‘नशिबाची’ आणि ह्या दुर्दैवी परिस्तिथीची कीव आली……..
…………(२४)
परमेश्वराच्या कृपेनेच अतुल भेटला, आणि त्याने “प्रॉमिसही” केले, त्यामुळे मी बराच खुशीत होतो. त्याला भेटून आठवडा निघून गेला, तसा मी “अन इझी” झालो. अतुल ला पुन्हा फोन केला, “ते आज ऑपरेशन मध्ये बिझी आहेत, मी नक्की मेसेज देईन” असं “रीसेपशनिस्ट” ने सांगितलं, त्या मुळे आता धीर धरण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. रात्रीचे साडे दहा वाजले होते, बिछ्यान्यावर आडवा झालो…… खिडकी च्या चौकटीतून समोर “व्याधाची” चांदणी चमकताना दिसत होती, वर मृग नक्षत्राची, “बो अँड ऍरोव”, आकृती बघून मला तिची प्रकर्षाने आठवण झाली. एकदा माझ्या बरोबर “झू” मध्ये फिरायला गेलो असताना, समोर एका ‘हरीणीच्या पाडसाला’ बघून, आणि तेव्हा तिचा हात माझ्या हातात असून सुद्धा, “भेदरलेल्या हरिणी” च्या नजरेने, ती मला न्याहाळत होती, तिच्या हाताचा कंप मला जाणवत होता, म्हणून “स्मित” असे कोणते विचार, आणि भय तुझ्या मनात आहे… ह्या माझ्या प्रश्नावर… “ “व्याधाची”, आठवण आली” असं ती म्हणाली होती. पण माझ्या मनाला “व्याधाचा” आणि “मृगयेचा” विचार कधीही शिवला नव्हता. “तिचा” विचार मनामध्ये यायला आणि ‘अतुल’ चा फोन यायला एकच गाठ पडली…..”पुढच्या आठवड्यात, ती तुला नक्की फोन करील” असं म्हणाला,… आणि निरभ्र आकाशात आता समोर मला “गुरू” ही स्पष्ट दिसू लागला, आता माझ्या इच्छा तोच पुऱ्या करेल ही आशा सुद्धा दृढावली, आता ती नक्की भेटलेच ही आशा द्विगुणित झाली होती. माझ्या प्रेमा पोटी, माझ्या हाकेला, माझ्या विनंतीला तिला होकार देऊन यावच लागेल… माझं मनच मला तशी ग्वाही देत होतं. अतुल ने माझं काम केलं होतं, “इच्छा असेल तर मार्ग दिसेल”, ह्याची प्रचिती आली. ह्या वेळी “विहार लेक” ला नेहमीच्या रम्य ठिकाणी ती भेटावी असं मला वाटत होतं…….
…………(२५)
अतुल ने संगीतल्यापासून मी रोजच तिच्या फोन च्या आशेवर होतो. टेबल वर फोन खणखणला की वाटायचं “तिचाच” असणार, पण अपेक्षा भंग व्हायचा, “क्लायंट” ला कसे तरी पटवून, पुन्हा तिच्याच आठवणीत रमायचो. आठवडा संपत आला, तशी मी तिच्या फोन ची आशाच सोडली. पण आपल्या “दिलेल्या शब्दाला ती नेहमीच जागायची”. अतुल ला तिने तसा मेसज मला कळवायला सांगितलं ही होतं, म्हणजे ती फोन करेलच. आज शनिवार, तिचा आवडता वार, बरेच वीकएंड आम्ही एकत्र घालविले होते, वास्तविक “न कर्त्याचा वार शनिवार” असं म्हणतात, पण आम्ही फिरायला जायचो, पिक्चर ला, हॉटेल मध्ये डिनर ला, आणि बऱ्याच पार्ट्या ही बहुदा शनिवारीच फिक्स करीत असू, रविवारी सुट्टी असल्यामुळे रिलॅक्स होता यायचं… ती आजचा शनिवार फुकट दवडेल का?… विचार मनात आला, आणि तिचाच फोन आला. म्हणतात ना “शंभर वर्षे आयुष्य.” “आज भेटता येईल?” तिचा हा प्रश्न, मला पडत्या फळाची आज्ञाच होती.मी लगेच “ “हो,नक्कीच,” मी तुला पिक अप करेन” म्हणालो. आता ती भेटेल, मी अधीर झालो… कशी असेल? मला वाटते तितकीच ओढ तिला वाटत असेल काय? आज ती मला ‘जीवदान’ देऊन, माझ्या प्रेमाचा “पुन्हा” स्वीकार करून, झालं गेलं विसरून, “सर्वस्वी” माझीच होईल?… काहीही करून तिने आज पुन्हा माझा “मनोभंग” करू नये, “प्रेमभंग” होता काम नये, मला स्वीकारून तिने मला आज पुनर्जन्म द्यावा….. नशिबाने आज मला साथ द्यावी हीच त्या “विधात्या” कडे माझी कळकळीची प्रार्थना………
…………(२६)
नेहमी प्रमाणेच, दुपारी ४ वाजता ठरलेल्या जागी मी तिला “पिक अप” करायला गेलो. ती दिसली, तेच हास्य, पण ह्या वेळेस ती, न ओळखण्या इतपत खंगली होती. काय दशा करून घेतली हिने?… तिला बघून चाटच पडलो. मुळात ती सडपातळ बांध्याची, पण महिन्या, दोन महिन्यात एवढी डाऊन होईल असं वाटलं नव्हतं… मी चरकलो… काही मोठा आजार वैगेरे तर नसावा ना?… माझ्या ह्या प्रश्नाला तिने टॅक्सी बाहेर पाहत मानेनेच “नाही” म्हटलं. हातातल्या तिच्या हाताला तोच ओळखीचा कंप,… मनात विचार केला…. मग आमच्यातला दुरावा हे कारण? म्हणजे जे मी भोगतोय, त्याच अवस्थे मधून ती सुद्धा जात असेल का?… असेलही, मग आमच्या ह्या “अश्या अवस्थेला” तीच तर कारणीभूत नव्हे का?…. जाऊन दे… तिला दोष देण्याने ती आणखीनच दुखावली जाण्याची शक्यता होती… आम्ही “लेक फेसिंग” ला नेहमीच्या “गुलमोहोरा” खालीच बसलो. आज माझी नजर तिच्या चेहेऱ्यावरून हटतच नव्हती, मी न राहवून तिच्या हनुवटीला हलकेच वर करून, नजरेला नजर देत, खोलवर तिच्या हृदयात डोकावण्याचा, प्रयत्न करीत राहिलो. तिचं रूप डोळ्यात साठवत राहिलो. तिला ही भरून आलं, एकमेकांच्या डोळ्यातील “प्रतिमा” ही ओघळत्या अश्रुत वाहून गेल्या. नानापरीने, “नकाराचे” कारण तिच्या कडून वदवायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रश्नाला ति मानेनेच “नाही”…, आणि फक्त “छे, तस काहीच नाही” अशीच उत्तरे देत राहिली…, शेवटी काकुळतीला येऊन माझ्या खांद्यावर विसावत गहिवरून येत म्हणाली… “यश…प्लीज…नको…ना विचारू….मी तुला सुखी करू शकणार नाही.” असं म्हणत… ती हमसून हमसून रडायला लागली. एखाद्या लहान निरागस मुलीसारखी…. मी सुद्धा “बापाच्या मायेने” तिला थोपटत होतो… किती वेळ गेला, काही कळलंच नाही. शेवटी म्हणाली “मी तुला असं भेटण्या ने, तू आणखीनच दुःखी होशील,… प्लीज… आपण पुन्हा कधी भेटायचं नाही,… मला माफ कर,”… तिचे हे शब्द कानावर घण मारावे तसे आदळले, मी बधिर होऊन, पाणावलेल्या डोळ्यानि तिच्या हरवलेल्या नजरेतून, खोलवर तिच्या हृदयाच्या गाभाऱ्यात, माझे काही स्थान शिल्लक आहे का, ते एकटक पाहत होतो… माझ्या गळ्यातली तिची मिठी जड झाली…, भरल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या स्वरांनी शेवटी म्हणाली, “यश… यश… डियर, आय ऑलवेज वॉन्ट टु सी यु हॅपी”… आता ह्या क्षणी, पुढे काहीही बोलण्यात अर्थच नव्हता…. ह्या निरोपाच्या वेळी तिला आणखीन दुःख नको म्हणून मूक निरोप घेतला……..
…………(२७)
टॅक्सीत तिने माझा हात शेवटी घराकडे उतरेपर्यंत, तसाच घट्ट धरून ठेवला होता. तिच्या हृदयाची स्पंदन, माझ्या हातातून हृदया पर्यंत पोहोचत होती. ती उतरतांना मलाच राहवलं नाही, आणि मी तिच्या त्या “थंड पडलेल्या हाताचे” अधीरतेने चुंबन घेतले…. “टेक केअर”…. हवेतच शब्द विरून गेले. तिला कसंबसं घरापर्यंत सोडून जड पावलाने माघारी वळलो. हरलेल्या योध्याप्रमाणे. जी बाजी मी कधीच हरू नये, जी जिंकण्यासाठी आयुष्य पणाला लावायची ताकद हृदयात बाळगली, ती ‘नियतीच्या’ पुढे फोल ठरली. सहवासाचे दिवस ह्या पुढे कधीच मिळणार नाहीत, ती उत्सुकतेने वाट पाहण्यातली अधीरता, तो रुसवा फुगवा, आणि मिलनातली मजा ह्या सर्वांना मी क्षणात पोरका झालो होतो. तिच्या शिवाय मी सुखी होऊच कसा शकतो? मला तिच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती, फक्त हवी होती जीवन भर साथ, आणि निर्व्याज प्रेम. पण नियतीने माझं प्रेमभंग करून, घोर निराशा पदरी घातली. आजपर्यंत प्रत्येक बाबतीत माझीच ‘जित’ व्हायची, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझाच ‘विजय’ असायचा. नावातील “यश” विध्यात्यांने सतत पदरी टाकलं होतं, मित्र मंडळीत माझा शब्द प्रमाण मानला जायचा. आता पुढील आयुष्यात माझ्या भंग झालेल्या हृदयाच्या तुकड्यात, तिच्या प्रेमाची ‘प्रतिमा’ शोधण्यात… उर्वरित आयुष्य घालविण्या शिवाय पर्याय राहिला नाही. आवडत्या ‘शनिवारच्या’ दिवशीच आयुष्याला अशी साडेसाती लागावी ह्याचच नवल वाटतं………
…………(२८)
तीला घरी सोडून आलो, ह्या आधी असं बरेच वेळा घडलं होतं पण त्यावेळी घरी परतताना ‘पुन्हा’ तिला भेटणारच, ह्या कल्पनेने मनातला आनंद द्विगुणित व्हायचा, तिला “पिक अप,” आणि “ड्रॉप” करण्यात एक निराळाच आनंद होता, एकत्र असण्याची एक विलक्षण गोड भावना त्यात होती. ‘पीक अप’ च्या वेळी, ती आत्ता भेटणार आहे, सोबत करणार आहे, सहवासाच सुख देणार आहे…. आणि प्रेमाची, विचारांची देवाण घेवाण होईल…, ह्या कल्पनेनेच खूप बरं वाटायचं. पण आज हे सर्व सुख, मानसिक समाधान, जगण्यातील उत्साह सारं काही काळाच्या एका फटकाऱ्याने मनाला जमीनदोस्त करून गेलं. सर्व भावनांची राख रांगोळी झाली होती, भविष्याची रंगवलेली सुरेल स्वप्ने, काळाने सुखाच्या झोपेतुन अर्ध्यावरच खडबडून जागे केल्याने, अधुरी राहणार होती, आयुष्याच्या वेलीवरच्या कळ्या, फुलण्या आधीच, त्यांचा सुगंध दरवळण्या आधीच, अरसिक काळाच्या हातून खुडल्या गेल्या. आपलं माणूस परकं झालं. आता प्रेमाच्या सहवासा साठी मी कोणाला साद घालू.आयुष्याच्या मार्गावरील रस्त्यावरून, अर्ध्या वाटेवरच तिने साथ सोडली, आता समोर सगळीकडे अंधकार जाणवू लागलाय, तिने, असं मला सोडून जाणं, हे, ह्या एकाकी पडलेल्या “अंधाला”, त्याच्या हातातील आधाराची काठी हुसकावून, अडखळत, ठेचाळत, आयुष्याचा मार्ग… शोधायला सांगण्या सारखं झालंय. प्रेम आंधळं असत, पण “प्रेम भंग” जीवनात अंधकार आणीत असावा. ह्या अंधाऱ्या रात्रीत भविष्यानि डोळे मिटून सुद्धा, नजरेत “तिचच” रूप समावल्याने, डोळ्यावर झापड असूनही, मी पूर्ण रात्र जागून काढली………..
…………(२९)
तिच्या शिवाय जगणं जीवावर आलं होतं. आठवणी पाठ सोडत नव्हत्या. तिने अव्हेरलं होतं, आणि मला नकाराचं कारण शेवट पर्यंत न देता माझ्या भावनांना, भविष्याला, पाठ फिरवून, तशीच निघून गेली होती, हा विचारच, माझ्या मानगुटीवर एखादं पिशाच्च बसून, त्याने ते “झाड” सोडायला, “माझ्या आयुष्याचाच भक” मागावा, आणि तो पर्यंत त्रास द्यावा तसं झालं होतं. आताशा आमच्या ग्रुप मध्ये सुद्धा जाणं नकोस वाटत होतं, ती हल्ली तिथे येतच नाही म्हटल्यावर, जाण्यात स्वारस्यच उरलं नव्हतं. ती दिसायची, भेटायची, तिच्याशी बोलायला मिळायचं, म्हणून तर मी आमच्या समाजाच्या क्लब ची “मेम्बरशीप” चालू ठेवली होती. गेले कित्येक महिने ती आलीच नाही आणि सध्या “ती मुंबईत नाही”, हे कळल्यावर मी ‘मेम्बरशीप’ सुद्धा रद्द करून टाकली. तिच्या आठवणींनी मध्यंतरी मी खूप बेजार झालो होतो, तिची बहीण “विभा” ग्रुप मध्ये एकदा भेटली होती, मी तिच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न ही केला, पण तीने, उत्तर न देता, उगाच तुच्छ नजरेने माझ्याकडे बघत, मान वळवून निघून गेली होती, त्यामुळे तिच्या बद्धल काही कळत नव्हते. मी अतुल कडेही फोन वर विचारल्यावर त्यानेही… “प्लीज लिव्ह हर अलोन” म्हणून मला निरुत्तर केले होते, त्यामुळे तिच्या पर्यन्त पोहोचण्याचा एक एक दरवाजा बंद होत गेला. “कल्पनाच्या” लग्नात ती तिला भेटली, त्या नंतर त्यांची भेटच झाली नाही, असं कल्पना कडूनही कळलं. कोणीतरी साथीला असतं, तर जीवन इतकं रुक्ष झालं नसतं, माझ्यावर दिवस इतके खराब येतील, आणि जीवन इतकं असह्य होईल असं कधीच वाटलं नव्हतं. तिची “प्रेमाची साथ”, आवडतीच्या रूपाने हृदयाच्या एका कप्प्यात विराजमान होत असतानाच, नावडतीने “दुराव्याच्या” सवतीच्या रुपात, दुसऱ्या कप्यात प्रवेश करून, आमच्या प्रेमाच्या सुखी संसारात कलह करून, काडीमोड घ्यायला लावलं. तिने साथ अशी सोडायला नको होती……..
…………(३०)
तिला शेवटचं भेटून आता चार महिन्याचा काळ लोटला होता, ती इथे मुंबईत नव्हती, म्हणूनच तर विभाने “तिची” ग्रुप मेम्बरशीप, आणि पुढे मी पण माझी मेम्बरशीप रद्द केली होती. आणि आता ती कुठे आहे? ते कळायला मार्ग नव्हता, अतुलही ह्यावर “वाच्यता” करायला तयार नव्हता. एकाच व्यक्ती कडून,…”विभा”, कडूनच तिच्या बहिणी बद्धल, खरं काय ते कळू शकलं असतं, पण ती पहिल्या पासून माझ्याच नव्हे, तर आमच्या दोघांच्याही मतांशी, कधीच सहमत नव्हती, माझ्याशी तर बोलायलाही मागत नव्हती….आता बाहेर पाऊस कोसळत होता. वास्तविक “श्रावणात” ला पाऊस असा धो धो कधीच पडत नाही, माझं मन आता आठवणींच्या सरीत ओलेचिंब झाले होते. पाऊस मला फार आवडतो. हिरवा शालू नेसलेली धरती, ते ढगाळलेलं आकाश, मध्येच चमकणाऱ्या त्या विजा आणि मग तो मोठ्ठा गडगडाट होऊन, अवकाशातील एखादी “नवविवाहित विद्युलता” स्वच्छ सफेद भरजरी शालू नेसून, लगबगीने, धर्तीच्या जोडीदाराला आलिंगन देते. हे सर्व मनाला भावलय, आणि त्यातही श्रावणात दिसणारे निसर्गाचे ते विलोभनीय रूप, ते इंद्रधनुष्य, फळा फुलांनी बहरलेली वसुंधरा, आणि विशेषतः ह्याच दिवसात फुलणारी “सुरंगीच्या मोहक वासाची फुलं,” ह्या सर्वांनी लहानपणापासूनच माझ्या मनाला लुभावीत, वेडं केलं आहे. पण आता ते सर्व काही निर्जीव भासतंय, माझ्या चेहेऱ्यावर तो जिवंतपणा, ते “स्मित” आणायला आता हा निसर्गही असमर्थ आहे. निसर्ग आपल्या माणसांबरोबर जेव्हढा मनाला आल्हाददायक भासतो, तेव्हढाच आपलं माणूस जवळ नसतांना मनाचा छळवाद करतो. ढगाळलेल्या आकाशाने मला नेहमीच एका “अनामिक ओढीने” आकर्षित केले आहे. आज तीच ओढ मला माझ्या “स्मित” च्या स्पर्शाला, तिच्या दर्शनालाही वंचित करत्येय. तिच्यापासून दुरावलेल्या माझ्या सारख्या “अभाग्याच्या” पदरात हा सुंदर निसर्ग कसा आणि कोणतं दान टाकणार……..
…………(३१)
गेल्या सहा महिन्यात तिची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नव्हता. बाहेर सगळी कडे दिव्यांची रोषणाई, आणि रंगीबेरंगी आकाश कंदील लागले होते. माझ्या लहान पणा पासून मला ह्या ‘आकाश कंदीलांचे’ फार आकर्षण असायचे, आमच्या सर्व शेजार पाजाऱ्यांना दिवाळीत मीच असे सुंदर, सुंदर कंदील बनवून द्यायचो, माझे कंदील हे नेहमीच वाखाणण्याजोगे असायचे. त्यांचे विविध आकार बनविण्यात माझा हातखंडा होता. पण आज तेच कंदील आणि रोषणाई बघून मन हिरमुसले, ती सोबत असती तर… ‘आज’… ह्या नरकचतुर्दशीच्या दिवशी, आमचा पहिला दिवाळी सण असता. मे महिन्यात “आपण लग्न करू” हा माझा बेत मी त्या “सी व्यूव” बीच हॉटेल ला असताना तिला सांगितला होता, पण नियतीलाही ते मान्य नसावं. तिची प्रतिमा माझ्या हृदयात कोरली होती, तिच्या सहवासाच्या रांगोळीवर, नयनांच्या निरंजनात, प्रेमाची ज्योतही तेवत होती, पण दुराव्याच्या फोफाट्याच्या वादळी वाऱ्याने ती विझवून, एका क्षणात अमावास्येचा काळोख करून माझ्या जीवनात अंधःकार पसरवला. दिवाळीच्या आधीच माझ्या भावनांचं दिवाळं निघालं होतं. मला प्रकर्षाने मागच्या वर्षी दिवाळी पाडव्याला, तिला नववर्षाच्या शुभेच्छा द्यायला तिच्या घरी पाहिलेले तिचं ते नउवारी साडीतलं, नाकात नथ, आणि अंगावर दागदागिने घातलेले “लक्ष्मीचं रूप” आठवलं. ती आज असती तर…. तिच्या शिवाय दिवाळी, ही दिवाळी असूच शकत नाही, मी ती आता साजरी करण्याची कल्पनाही करू शकत नाही…….
…………(३२)
गेल्या वर्षीचे, श्रावणातले सगळे सण, गणपती, दिवाळी आणि ह्या वर्षी, आत्ताच झालेल्या “शिमग्याच्या” सणातही मी एकटे पणाच्या आगीत होरपळून निघाल्या मूळे जीवनात काही अर्थच राहिला नव्हता. तिचा, माझा आणि अतुल चा,… महिन्या भराच्या अंतरात येणारे, हे तिन्ही वाढदिवस तसेच साजरे न होता गेले होते. हे तीनही वाढदिवस गेल्या वर्षी नियतीने, मला तिची “गिफ्ट” देऊन. आमच्या गाठभेटी घडवून, आनंदाने साजरे केले होते. आणि ह्या वर्षी जणू ते आलेच नाहीत… कधी आले आणि कधी गेले, काही कळलेच नाही, म्हणतात ना “वक्त, वक्त की बात है।“…. ती माझ्या पासून दूर होऊन आता वर्ष लोटायला आलं, पण ना धड भेट, ना तिची खुशाली, फक्त ती आज भेटेल, उद्ध्या भेटेल, ह्या आशेवर, आणि तिच्या गोड आठवणींवर, रडत मरत, कसे तरी दिवस ढकलले. तिने मला कोणतेही कारण न सांगता नकार दिला, ह्या विचाराने मी बऱ्याच वेळा बेचैन होत असे. ह्या विचाराने मी झपाटलेला होतो, तरीही पण, अतुल ने सांगितल्यामुळे, तिला “डिस्टर्ब” करून दुःखी करू नये, म्हणूनच “एकांत वासात” राहिलो. सध्याचं माझं जीवन म्हणजे आयुष्याची जीवन ज्योत तर तेवतेय, पण भविष्य मात्र अंधकारात… अशावेळी आशेचा एक किरण म्हणून, अतुल कडे “प्रत्यक्ष” जाऊन भेटण्याचा… भले त्याला ते आवडो अथवा न आवडो, कारण, तसेही फोन वर “तिच्या संबंधी” बोलायला तो टाळतच असायचा, तेव्हा नाईलाजाने मी त्याला भेटण्याचं मनाशी पक्क केलं. मनाच्या एकले पणाची आग, कदाचित तोच आता शांत करेल ह्या अंधूक आशेवर……
…………(३३)
“आजच्या रात्रीत उद्ध्याचा उष: काल” व्हावा अशी जोरदार मनोकामना करीत अतुल च्या “कन्सलटिंग रूम” वर त्याला भेटायला गेलो, त्याची प्रॅक्टिस ही भरपूर चालायची, तसा तो बऱ्यापैकी नावाजलेला सर्जन गणला जायचा. मी पोहचलो तेव्हा शेवटचा पेशंट तो चेक करीत होता. रिसेप्शनिस्ट निघतच होती, तिने त्याला ‘इंटरकॉम’ वर सांगून ती निघून गेली. एका तऱ्हेने मला त्याच्याशी एकांतात व्यवस्थित बोलता येणार होतं… तो माझ्याशी बोलायला नाराज होता, पण माझ्या आग्रहाखातर त्यांनी जे सांगितलं ते पटण्यासारखे नव्हते. शेवटी जे काही ऐकलं, त्यांनी मनाला धक्काच बसला. “सध्या ती गोव्याला सेटल आहे, “प्लीज डोन्ट मीट, अँड डिस्टर्ब हर”, बहुदा लवकरच ती लग्नही करेल”… माझ्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास मला झाला. माझ्या पासून तिचं दूर जाणं मी समझु शकत होतो, पण त्याचे ते शेवटचे वाक्य हृदयाला भिडून एका क्षणात, सर्व शरीराला कंप सुटून, कोणीतरी खोल खाईत ढकलून दिल्याचा भास झाला. हे कसं शक्य आहे, माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाचा विचार तिच्या मनाला शिवलाच कसा? आठ दहा महिन्याच्या दुरीने, कोणी व्यक्ती, असं कोणापासून ‘आयुष्यभर’ दुरावू शकतो? ह्या वर्ष भरात एका शब्दानेही तिने मला हे सांगू नये? कोणाकडून साधा एक मेसेज सुद्धा देऊ नये? मला ‘गाफील’ ठेऊन तिने आणि पर्यायाने ‘नियतीनेही’, माझा चक्क घात केला होता. ती सोडून गेल्यापासून प्रत्येक क्षणाला, वर्षभर मी तिचाच विचार करीत असताना, माझा जरा सुद्धा विचार तिच्या मनाला शिवला नसेल? वर ती कोण्या “परक्याशी” लग्न करायला निघाली, हे सर्व आकलनाच्या पलीकडे होतं. विधात्यांने माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय काही उमगत नाही……
…………(३४)
कसाबसा घरी आलो. मला जेवायला नको असं “ताई” ला सांगून बेडरूम मध्ये शिरलो. जगण्यावरच मन उडालं होतं, जीवनात काही चांगलं, सुंदर, विश्वासपत्र, असू शकतं ह्या वरचा ‘विश्वासच पार उडून’ गेला. जिची मी पूजा केली, भावनांची कदर करीत, आठवणी सुद्धा जपल्या, त्या सर्व धुळीला मिळाल्या, माणसं इतकी बदलू शकतात? मला सोडून जातांना जे भाव मी तिच्या डोळ्यात वाचले होते, ते सर्व “फसवे” कसे असू शकतात? “मी सर्वस्वी, सदैव तुझीच आहे म्हणणारी, तुझ्या शिवाय मी राहूच शकत नाही, तुझ्या शिवाय मला करमत नाही, आणि फक्त तूच मला प्रिय आहेस.” असं मला नेहमी म्हणणारी, आतां मला पोरकं करून गेली होती. वास्तविक माझ्याशी “प्रतारणा” करणाऱ्यांपैकी ती नक्कीच नव्हती. मग अतुल जे काही म्हणाला ते खोटं असेल काय? पण अतुल माझ्याशी खोटं का बोलेल? असं खोटं बोलून त्याला थोडंच काही मिळणार आहे? तिच्या सारखी सालस, सरळ मनाची, मनाने हळवी आणि खानदानी व्यक्तीमत्वाची मुलगी माझ्या बरोबर असे ‘प्रेमाचे नाटक’ खेळली असेल? विचारांचं काहूर मनात उठलं होतं. तिला जर दुसऱ्या कोणाबरोबरच लग्न करायचं होतं, तर तिच्या प्रेमापोटी “मीच” ते मोठ्या मनाने लावून दिलं असतं. जिला माझ्या भावनांची आता कदरच उरलेली दिसत नाही, तर मी तरी तिच्यासाठी आता इतका का तळमळतोय, माझी अवस्था अशी पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशासरखी का व्हावी. आयुष्यभर तिची आठवण येत राहील, ह्यात शंकाच नाही, पण आता परिस्तिथी ने असे काही फासे टाकले आहेत की तिला विसरावच लागेल. जिच्यावर पूर्ण विश्वास टाकला तिनेच अशी पाठ फिरवीत मनाला धोका द्यावा? माझा विश्वास घात करावा? जी स्वप्न बघीतली त्याची अशी धूळधाण व्हावी?……..
…………(३५)
ती गोव्याला सेटल झाल्याचं कळल्यावर, मनात पहिल्यांदा प्रश्न उभा राहिला तो हाच की, हे सगळं सोडून तिने “गोव्यालाच” का जावे, आणि विचारांती माझ्या लक्षात आले की तिला ‘आध्यात्माची’ आवड आणि त्यात “सबनीसांच्या” “कुलदेवतेची” ”श्रीशांतादुर्गेची” ती निस्सीम भक्त, म्हणूनच कदाचित नेहमी देवीचं दर्शन व्हावं, पूजाआर्चा करता यावी, म्हणून तिने गोव्याचा मार्ग पत्करला असावा, तसं पाहता आमचे कुलदैवत ही गोव्याचा “श्री मंगेश”… मागे जुहूबीच वर आम्ही बसलो असतांना सुद्धा, त्या अथांग सागराला “वंदन” करून तिने मला गोव्याची आठवण काढीत, तेथिल ‘देवस्थानांची’ इत्यंभूत माहिती दिली होती. त्यांच्या घरी सुद्धा देवीची यथासांग पूजा तिचे वडील असेपर्यंत नेहमी होत असे. आजही त्या दोघी बहिणी “पंचमी” पाळतात आणि त्या दिवशी कडक उपास करतात. आई लवकर गेली. तसेच ह्या दोघींचं शिक्षण पूर्ण झाल्यावर वडीलही गेले, “आजोळची” परिस्तिथी अतिशय चांगली होती, धाकट्या “रांगणेकर” मामाचा आधार होता. आणि वडील सुद्धा कस्टम मध्ये चांगल्या हुद्यावर होते, त्यामुळे पैश्याची चणचण, ह्या दोघींना कधीही जाणवली नाही. आमच्या कडे देवाचं तसं प्रस्थ नव्हतं, त्यामुळे गोव्यात जाण्याचा तसा योग कधीच आला नव्हता. पण आज अचानक तिच्या आठवणीत मला माझा “मंगेश” देव आठवला. का कोणास ठाऊक, पण गोव्याला जाण्याची तीव्र ओढ लागली….. खरतरं लग्न झालं की आम्ही दोघे “कुलदेवतेला” पाया पडण्यासाठी जायचं मागे ठरवलं होतं. पण आता तिथे जाऊन “तिला” भेटण्यात काही स्वारस्य उरले नव्हते. जिच्या मूळे माझी अवस्था इतकी दिनवाणी झाली, दिलेली वचने, घेतलेल्या शपथा, विसरून जिने माझ्या भावी आयुष्यात दुःखाचे बी पेरलं, अश्या व्यक्ती ला जीव लावून आयुष्य “बरबाद” करण्यात काय अर्थ. ती मला विसरलीच आहे मी ही तिला विसारण्यात शहाणपणा आहे……
…………(३६)
“ठोकर” खाऊन पण माणसं, शहाणी होतातच असं नाही, ह्याचा प्रत्यय मला माझ्याच बाबतीत येत होता, हजारवेळा मनाला समजावूनही ते तिला विसरायला तयार नव्हते, पुन्हा पुन्हा जिथे आम्ही भेटत असू, तिथे तिथे जावंसं सारखं ह्या वेड्या मनाला वाटायचं, तिथे जाऊन ती थोडीच दिसणार होती? भेटणार होती, माझ्याशी बोलणार होती?… पण छे, ते ऐकायलाच तयार नव्हतं, तिला एकदा तरी डोळे भरून पाहावं, तिच्या कुशीत शिरून भावनांना… ह्या “अश्रूंना” वाट मोकळी करून द्यावी, असं सारखं वाटत होतं, कदाचित ती भेटेलही, ह्या खोट्या आशेवर, त्या सर्व ठिकाणी परत, परत एकटाच “वेड्यासारखा” जाऊनही आलो. पण व्यर्थ, म्हणतात ना “मरता क्या न करता” सर्व प्रयत्न केले, पण जे आपलं नाही, आपल्या नशिबातच नाही ते कितीही अट्टाहास केला तरी आपल्याला कसं मिळणार, हे मनाला समजावण्याचा फोल प्रयत्न करीत होतो. “बुडत्याचा पाय खोलात” तसा आणखीनच तिच्या आठवणीत, कोळ्याच्या जाळ्यातल्या माशी प्रमाणे अधिका, अधिक गुरफटत होतो. शेवटी “बुद्धीने” मनावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, हृदयातून तीच्या आठवणींना “तिलांजली” द्यायची,तिला विसरायचं, पुढ्यात दिसली तरी तिच्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही, तिने काकुळतीला येऊन जरी आपली माफी मागितली, कितीही आर्जव केलं तरी तिच्या त्या खोट्या प्रेमाला भुलायचं नाही, पुन्हा फसायचं नाही……
…………(३७)
अतुलला भेटून महिना लोटला होता. ह्या महिन्यात तिची कोणतीच खबर मिळाली नव्हती, तो मला टाळत होता, भेटण्याचे सोडाच,पण फोनही कट करीत होता. तेव्हा आपणच काही तरी पाऊलं उचलावी असा विचार केला, ती जर गोव्याला असेल तर तिथे तिचा काही शोध घ्यावा. भेट झाली की मला ‘अकारण का झिडकारले’ होते ह्याचा शहानिशा सुद्धा करायचा होताच. ह्या हेतूंनी, मी गोव्यातील आमच्या “क्लायंट” चे ऑफिसचे काम काढून “गोव्याची मिटिंग” अरेंज करवून घेतली. तिथे तिला भेटून, तीने मुंबई का सोडली, आणि आता लग्न कोणाशी करणार…. की आतापर्यंत तिचे लग्न होऊन, माझ्या शिवाय ती, खरोखरच सुखात आहे का? ते ही मला बघायचं होतं. आताशा माझ्या नातेवाईकांकडून मला बरीच “प्रपोजल” आली होती, मी लग्न करून मोकळा व्हावं अशी “ताईची” खूप इच्छा होती, तिचंही लग्न झालेलं नव्हतं, आणि आईच्या मागे आम्हा दोघा भावांना तिनेच मायेने मोठं केलं होतं, ती पायांनी अधू असूनसुद्धा आमच्या आयुष्यात तिने कधीच काही कमी पडू दिलं नव्हतं. माझ्या अश्या अवस्थे मधून मी लग्न करून मोकळा व्हावं, म्हणजेच मी सुखी होईन ह्या इच्छेने, माझ्या लग्नासाठी सारखी मागे लागली होती. गोव्याला “तिची” माहिती काढावी म्हणूनच मी आलो होतो, पण इथला निसर्ग, आणि पावसाळ्यातली ती हिरवाई, आणि रिमझिम पाऊसाने, पुन्हा तिच्या सहवासाच्या आठवणींची माझ्या तप्त हृदयात मशागत केली, तिच्या विरहाच्या वेलींनी माझ्या भावनांच्या खोडावर अलगद आपले पाश आवळायला सुरवात करून मला अगदी नकोसं करून सोडलं. सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्या ह्या हॉटेल मध्ये मी मात्र एकाकी आणि बेचैन होतो. आवडणारा पाऊस बाहेर कोसळत असूनही, आठवणींच्या गारांनी झोडपल्यामुळे मन उध्वस्त झालं होतं………
…………(३८)
गोव्यातील कालचा पहिला दिवस “क्लायंट” ला भेटण्यात आणि ऑफिस च्या कामात बिझी गेला होता. संध्याकाळी काम आटोपल्यावर “क्लायंट” च्या आग्रहाखातर, आज त्यांच्या घरीच “डिनर” चा बेत पक्का केल्याने, जाणं भाग होतं. खरंतर आज ह्या रम्य वातावरणात मला संध्याकाळी “मडगाव” च्या ह्या हॉटेल जवळील “कोलवा बीच” वर जाऊंन, निवांत पणे बसून, तिलाही आवडणारा तो “अथांग सागर आणि सनसेट” सध्या तिचं वास्तव्य असलेल्या ह्या गोव्यात, तिच्या आठवणीत रमत, अनुभवायचा होता. कोण जाणे कदाचित ती मला तिथेच दिसेल अशी आशाही वाटत होती. “साळगावकर” साहेबांनी आपल्या आलिशान कार ने माझ्या हॉटेल वर येऊन, मला त्यांच्या घरी नेण्यासाठी “पीक अप” केले. “पणजी” जवळील “मिरामार” बीच वर त्यांचा आलिशान बंगला होता. गोव्यात “साळगांवकर” एक “बडे प्रस्थ” होतं. त्यांचा पाहुणचार झाल्यावर त्यांच्या “शोफर” ने मला माझ्या हॉटेलवर “ड्रॉप” करण्या साठी गाडी बीच वरून, पुला जवळ घेत असताना अचानक समोर “अतुल आणि स्मिता” बीच वरूनच परततांना दिसले, एक क्षण माझ्या नजरे समोर अंधेरी आली, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, म्हणून शोफर ला गाडी पुन्हा ‘रिव्हर्स’ मध्ये घ्यायला सांगितली आणि त्या दोघांना बोलण्यात रमलेले पाहून, माझा जीव कासावीस झाला. अतुल ने तिचा हात आपल्या हातात घेऊन, तो तिला काहीतरी समजावत असावा. ती मानेनेच त्याला ‘होकार’ देतांना पाहून मला आमचे गतकालीन दिवस आठवले. बिछान्यावर पहुडलो पण माझी झोपच त्या दोघांनी उडविली होती. असं काय काम अतुल ने काढलं, की गोव्यात तेही रात्री दहाच्या दरम्यान, हे दोघे “मीरा मार” बीच वर मला एकत्र दिसावे. मला वाऱ्यावर सोडून, माझ्या भावनांची राख रांगोळी करून गेले एक, दीड, वर्ष एकले पणाच्या आगीत मला लोटलेल्या ह्या “प्रियतमेची” मला कीव आली. ताई च्या आग्रहाला तिच्या मायेपोटी “माझ्या लग्नाच्या” विनंतीला झिडकरणारा मी सुद्धा, स्मिता एवढाच आज क्षुद्र वाटलो. वास्तविक ते दोघे भाऊ बहीण, पण ह्या मानसिक धक्क्याने माझी सारासार विचार करण्याची क्षमताच हरवली, त्यांच्या बद्धल चे नको नको ते विचार माझी झोप उडवून गेले……..
…………(३९)
गोव्यात तिची भेट व्हावी, तिची विचारपूस करावी, त्यामुळे कदाचित तिला बरं वाटेल, काळाच्या एका तडाख्यात माझ्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाच्या बागेत पुन्हा एकदा बहर येऊन रमणीय दिवस दिसतील, ह्या आशेने इथवर पोहोचलेला मी, आता कधी एकदा माघारी फिरतोय, असं मला झालं होतं. उद्याच काम संपवून, परत मुंबईला जाण्याचे मी ठरवत होतो,पण इतके वर्षात आमच्या कुलदेवतेचे “श्री मंगेशा चे” साधे दर्शनही घेतले नव्हते, निघण्यापूर्वी निदान “मंगेशीला” जाऊन, त्याची “धूळभेट” घेण्याचे मी ठरविले. “मंगेशा” च्या दर्शनाने पुढील आयुष्यात बरे दिवस येतील असे मनात आले, पण देवळात गेलो आणि हात जोडून परत फिरतांना, माझे दीवस ‘आणखीनच’ फिरल्याची, येणारे दिवस आणखीनच खराब असल्याची खात्री, “स्मिता आणि अतुलला” ला पुन्हा “देवळात” एकत्र बघून झाली. दोघांच्याही गळ्यात ‘लग्नाचे हार’ होते. दोघेही ‘सोवळ्यात’ होते, अतुल च्या खांद्यावरून ओढलेल्या शेल्याने, स्मिताच्या पदराची “गाठवळ” केली होती, देवस्थानच्या पुरोहितांनी त्या दोघांना, देवाला पाया पडण्यासाठी आतल्या ‘गर्भगृहात’ नेताना पाहून मीच “अभागी” असल्याची स्पष्ट जाणीव मला झाली. आज पहिल्यांदा कुलदेवाला आवर्जून भेटायला आलेला ‘मी’ मात्र “ओवळा” ज्याला मंगेशाच्या गर्भगृहात, त्याच्या ‘दरबारात’ आत प्रवेश नाही, आणि ‘माझ्या पश्चात’ स्मिताचा जोडीदार झालेला अतुल मात्र “सोवळा” त्याचे स्थान मंगेशाच्या ‘गर्भगुढीत, त्याच्या कुशीत’. अगोदरच देवाबद्धल तशी फारशी ओढ नसलेला मी, आणखीनच त्याच्या पासून दुखावलेल्या अंतकरणाने दुरावलो होतो. ‘गाऱ्हाणे’ घालून ते बाहेर सभामंडपात आले, माझी आणि त्यांची पहिल्यांदाज नजरानजर झाली, ते ही चक्रावले, आणि मी जणू काही, मीच “बेस्ट मॅन” असल्यागत पुढे होऊन, त्यांना “भावी जीवनाच्या शुभेच्छा” देऊन, तोंड फिरवून निघालो. आणि “स्मिता” निस्तेज चेहेऱ्याने बहुदा त्याच्या खांद्यावर भोवळ येऊन कोसळली असावी……..
…………(४०)
जिच्या बरोबर मंगेशाच्या देवळात, त्याच्या गाभाऱ्यात पूजेला “मी” तिच्याबरोबर असायला हवा होतो, तिथे माझा एकेकाळचा दोस्त, आज दुश्मन बनून, माझ्या जिवलग प्रेयसीच्या ‘ताईतातला हिरा’ बनून, तिच्या हृदयावर विराजमान होऊन, मंगेशाच्या कृपेने, आणि त्याच्याच मर्जीने, तिच्या गळ्यात तेजस्वी “कौस्तुभा” प्रमाणे चमकत होता. अतुल, सुद्धा मंगेशाचाच महाजन, ह्या “केंकरे” फॅमिलीला… पिढीजात, मंगेशाचे जणू ‘वरदानच’ लाभले होते. मागे दिवाळीच्या पाडव्याला तिच्या घरी तिच्या, त्या नऊवारी साडीतल्या देखण्या रूपात, आणि आजच्या रूपात जमीन आस्मानाचा फरक मला जाणवला. ती फारच ओढल्या सारखी, आणि प्रकृतींनी खूप खालावलेली दिसली. ज्या अतुल कडे मी विश्वासाने माझे मन उघडं केलं होतं,तिच्यासाठी गोपनीय असे निरोप पोहोचवले होते, त्याचा विश्वासघात झाला होता. मला तांदळातल्या खड्यासारखे बाजूला सारून, आपण धुतल्या तांदळा सारखी “ती” स्वच्छ राहिली, पण “आते भावाशी” का होईना,… एका “बहिणीने” शेवटी आपल्या “भावाशीच” लग्न केले. हे मात्र खरे… “कल्पना” माझी मामे बहीण, तिला माझ्या मध्ये “इंटरेस्ट”, होता, माझ्या मामाचीही तशी इच्छा होती, तरीसुद्धा बहिणीशी लग्न करणे, भले ती “मामे बहीण” का होईना, मला रास्त वाटत नव्हतं, ह्यास्तव, आणि त्याच वेळी, माझा जीव “स्मिता” मध्ये गुंतल्यामुळेच, हे “स्थळ” मी अव्हेरलं, आणि “कल्पनालाही” त्यावेळी नाराज केले होते. पण आज, मी “सर्वस्वी” हरलो होतो, “माझं सर्वस्वच” आज अतुलच्या हाती होतं. माझी साथ सोडून भावनांच्या विश्वात मला ‘निर्धन’ केल्याने, एखाद्या ‘भिकाऱ्या गत’ फिरत फिरत, शेवटी, गोव्यापर्यंत भरकटलेला ‘मी’ आज तिने प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहीला होता. गोव्यात भेटल्यावर माझं दुःख, मी तिला सांगेन, ती दुरावल्या नंतर मी स्वतःशीच, तिच्या प्रतिमेला हृदयाच्या आरशात बघून मारलेल्या गप्पांबद्धल सांगायचे ठरविले होते. आणि तिच्या कुशीत शिरून ‘अश्रूंना’ वाट मोकळी करण्याचेही ठरविले होते…. पण, तसे घडायचेच नव्हते. आणि नियतीलाही ते मान्य नव्हते. ती माझी झाली नाही, निदान ‘त्याच्याशी’ तरी तीने मरेपर्यंत एकनिष्ठ राहावे, हेच गोवा सोडताना माझ्या मनात आले…….
…………(४१)
ज्या ‘आत्मीयतेने’ मी आमच्या कुलदेवते कडे, आमच्या “मंगेशा” कडे, त्यांनी मला पुन्हा सावरावे, माझ्या पाठीशी राहून आशीर्वादाने माझा भविष्यकाळ उज्वल करावा, ह्या साठी आयुष्यात ‘प्रथमच’, त्याच्या दाराशी, त्याच्या मंदिरात हाथ जोडले, “तिथेच” सर्वार्थाने मी “उद्ध्वस्त” झालो, तेव्हा आता, त्या देवाकडेही पाठ फिरविण्याशिवाय गत्यंतरच नव्हते, जिला आयुष्याची जोडीदार मानून “देवीच्या” रूपात पुजायची मनोकामना मी केली होती, त्या माझ्या “ह्या” देवीने माझ्या चेहेर्यावरचे स्मित तर आधीच हरपले होते, आणि आज तर माझ्या मनोमंदिराच्या गाभाऱ्यातील, त्या देवीच्या मूर्तीला, तडा घालविण्याचा कळस करून, ते मंनमंदिर साफ जमीनदोस्त करण्याचा ‘अक्षम गुन्हा’ सुद्धा केला होता. त्यामुळेच “मंगेशा” ला पाया पडून नंतर तिची कुलदेवता, “शांतादुर्गेची” भेट “कवळे” येथील मंदिरात जाऊन घेण्याचा माझा मानस साफ ढासळून गेला… आता “न देव, न देवी” कोणाचेही पाठबळ नाही, ह्या विचाऱ्याने गोव्यातील इतर “देवालयांकडे”, तशीच पाठ फिरवली, आणि तडक मुंबईला निघून आलो. आज मी तिला जेव्हढा प्रिय होतो, तेव्हढाच, किंबहुना थोडा जास्तच “अतुल” प्रिय झाला असावा, नाहीतर माझ्याशी लग्न न करता, “त्याला ‘आयुष्याचा जोडीदार’ तिने का बरं निवडावा, माझ्यात असं काय कमी होतं जे “अतुल्य” तिने त्याच्यात पाहिलं, मी जेव्हढा तिच्या प्रेमा साठी आसुसलेला होतो, व्याकुळ झालो होतो, तेव्हढि ओढ अतुल ला नक्कीच नसावी, पण तरीही तिचं मन जिंकण्यात तोच यशस्वी झाला होता. तिचं हे असं वागणं माझ्या आकलनाच्या पलीकडे होतं. आज दीड वर्षानंतर प्रत्येक दिवस तिच्यासाठी जीव आटवून सुद्धा, तिच्याशी बोलता येण्यासारखी परिस्तिथी राहिली नव्हती. माझं “भग्न मनमंदिर” तिने पुन्हा उभारावे अशी प्रत्यक्ष त्या विधात्याची, आणि माझ्या “मंगेशाची” सुद्धा इच्छा नक्कीच नसावी, नाहीतर त्याच्या देवळातच अशी वेळ माझ्यावर आली नसती. अशी वेळ माझ्यावर का यावी, इतकी वर्षे आमच्या घराण्यात “कुलदेवाची” पूजा होत नव्हती, ह्याचच हे ‘फळ’ तर नसावे ना? असा अस्पष्ट विचारही मनाला शिवला. त्या मंगेशा ची कृपा असती तर कदाचित अतुल पेक्षा मीच तिला प्रिय वाटून ती माझीच झाली असती…. पण ह्या जर, तर च्या गोष्टीं आता अर्थहीन आहेत. “आपल्या नशिबाचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात”, हे माझ्या वडिलांचे विचार आज पुन्हा माझ्या मनात आले……..
…………(४२)
मुबाईला आलो खरा, पण चार दिवसानंतरही मन अजून गोव्यातच रेंगाळले होते. त्यातून बाहेर कसं पडावं हे सुचत नव्हतं. तिथे त्यांचा “हनिमून” आणि इथे माझ्या मनात घोर निराशेची काळी कुट्ट अंधारी “अमावास्या”. ह्या चार दिवसात जे काही मी ‘भोगलय’ ते शब्दात कोणाला सांगणेही कठीण होते असाच आठवडा निघून गेला. “ताईला” माझी ही अवस्था बघवत नव्हती, “प्रसाद” ही बेचैन झाला होता. वयाने धाकटा असूनही, ह्या कठीण वेळी ‘वडीलकीच्या’ नात्या ने मला माझ्या फायद्याच्या चार गोष्टी, खूप चांगल्या शब्दात कौशल्याने सांगत होता. घरातले हे वातावरण सुधारावे म्हणून ताई, आणि प्रसाद ह्यांनी रोज संध्याकाळी “साईबाबांची” भजनेही म्हणायला सुरवात केली. आमच्या घरी कुलदेवतेची कधी पूजा झाली नाही, त्या बद्धल तशी फारशी माहितीही नव्हती, आई “साईबाबांची” भक्त होती, त्यामुळे ‘गुरुवारी’ फक्त फोटोला हार घालण्या पलीकडे मी देवाचं फारसं काही केलं नाही. “स्मिता” मुळे मला कुलदेवतेची महती कळली होती, लग्नानंतर आपण नेहमी “मंगेश शांतादुर्गेची” आराधना, पूजा आर्चा करूच, असं वचनही तिला दिलं होतं. आता कसला देव नि कसलं काय, मरण येत नाही आणि ‘आत्महत्या’ करण्याची हिंम्मत नाही म्हणून ह्या असल्या अवस्थेत नाईलाजाने जगायचं एव्हढच. पण त्या मंगेशाच्या मनात काही निराळंच असावं, अतुल चा “फोन” आला, स्मिता गोव्यालाच होती, अतिशय महत्वाचे काम होते म्हणून तो मुंबई ला आला होता. येतांना स्मिताचा काही महत्वाचा मेसेज आणि तिची, तिने माझ्या साठी लिहिलेली चिट्ठी आणल्याचे, आणि प्रत्यक्ष भेटीत ती देण्यासाठी, येत्या शनिवारी भेटण्या बद्धल त्यांनी सांगितले…… माझ्या बद्धल तिच्या मनात कणव असेल का? की मी देवळात त्यांना शुभेच्छा देऊन, एकही शब्द न बोलता निघून गेल्याचा राग तिला असावा? आता आणखीन कोणता त्रास, तिला मला ध्यायचाय ‘हा’ विचारही मनाला शिवला आणि “कम व्हॉट मे”, “आय विल फेस इट”…. काहीही असेल पण बहुदा “मंगेशा” नि मनाचे बंद झालेले दरवाजे उघडण्याचे ठरविलेले दिसतंय, असे अनेक प्रश्न क्षणात माझ्या मनात येऊन गेले. माझी घोर फसवणूक जरी झाली होती, मी उद्ध्वस्त झालो असलो तरी एके काळी ‘ती’ माझी होती, आणि मी सर्वस्व तिच्यावरून ओवाळून टाकलं होतं, त्यामुळे मी दुःखी असलो तरी ‘ती सुखी राहावी’ अस ‘मनोमन’ , नेहमीच वाटत आलं होतं……
…………(४३)
अतुल दोन दिवसांनी भेटणार होता, ते ‘दोन दिवस’ मला ‘दोन युगांसारखे’ वाटले. काय लिहिलं असेल चिट्ठीत, काय निरोप पाठवला असेल? अतुल ला भेटायला मी अधीर झालो होतो. शनिवारच्या संध्याकाळी आम्ही ‘माहीम कॉजवे’ ला भेटलो. त्याने भेटता क्षणीच माझी माफी मागितली, आणि तिची चिठ्ठी पुढे केली…. “ “स्मिता” नि सुद्धा हाथ जोडून माझी माफी मागून, मी तिला मोठ्या मनाने माफ करावं, आणि ती आयुष्यात कधीच लग्न करणार नव्हती, पण अतुल ने अट्टाहास केला म्हणूनच तिने “नाईलाजाने” होकार दिल्याचंही त्यात लिहिलं होतं. तिला “ब्लड कॅन्सर” आहे त्यामुळे आयुष्याची तशी खात्री नसल्याने, तिच्या मुळे कोणालाही त्रास होऊ नये, आणि माझं आयुष्य, वाया जाऊ नये, ह्या कारणास्तवच तिने मुंबई सोडून, गोव्याला देवीच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेतल्याचे, आणि तिच्या मुळे मला जो त्रास झाला, त्या बद्धल दिलगिरी व्यक्त करून, पुन्हा त्याबद्धल हाथ जोडून क्षमा मागून, माफ करण्याबद्धल कळकळीची विनंती केली होती. मी लग्न केल्याचे कळल्यावर, पुढे मागे ती मला प्रत्यक्ष भेटूनही हे सर्व सांगणार असल्याचं तिने लिहिलं होतं. माझ्याशी बरंच काही बोलायचे आहे, ते प्रत्यक्ष भेटीत, लवकरच मुंबईला आल्यावर बोलेल अस आश्वासनही दिलं होतं.”… चिठ्ठी कशीबशी वाचली आणि अतुल च्या खांद्यावर डोकं ठेऊन ढसढसा रडलो. अतुलनी सुद्धा आतापर्यंत धरून ठेवलेला हुंदका, आम्हा दोघांचही मन हेलकावून गेला. “ओह गॉड”… अतुलला एकच प्रश्न मी लहान मुला सारखा रडवेला होऊन परत परत विचारात होतो…. “इज धिस अ फॅक्ट”… आज पुन्हा “शनिवारच्या दिवशीच”, ही जीवघेणी बातमी कळली, आता डोळ्या समोर उसळलेला, तोच “अथांग सागर” पण आज मनाला भरती ऐवजी पूर्ण ओहोटी होती. आज ‘अष्टमीच्या भांगे’ मुळे तिच्या प्रेमाचे, सहवासाचे, तरु, मनाच्या किनाऱ्या पासून, खूप आत, आत, दूर वर, खोल खोल गर्तेत हेलकावे खात होते. पण, आता माझ्या डोळ्यातल्या हेलकवणाऱ्या लाटांवर “स्मित” च्या रूपातील हीच नांव हेलकावत होती. कधी ‘डूबेल’ सांगणं कठीण होतं. आता लाटा गालाच्या किनाऱ्यावर येऊन फुटत होत्या. सागराच पाणी हृदयाच्या पृष्ठभागावरील पाण्यापेक्षा कमी खारट असल्याचं, मला ‘आज’ जाणवलं…. त्या नंतर अतुल ने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण माझं मन अर्धवट गुंगीत होतं… घरी आलो, आता कितीही केलं तरी झोप येणं कठीण होतं, खिडकीतून समोर मला आवडीचं रांगोळीने भरलेलं आकाश दिसत होतं. आणि प्रत्येक चांदणी “स्मित” च्या रूपात चमकत आपणही “शुक्राची” आहोत, असं भासवीत होती. पण आज ती “व्याधाची”, चांदणी शोधूनही सापडली नाही…. अर्धी रात्र केव्हाच उलटून गेली होती. “स्मित” साद घालत असावी. “जो प्रश्न”, मी त्या वेळी विचारूनही “तिने” मला “उत्तर” देऊन सोडवायला हवा होता त्या…. “माझ्याशी लग्न का केलं नाही” ह्या माझ्या मानगुटीवर हडळी प्रमाणे बसलेल्या, आणि माझा पिच्छा पुरवलेला प्रश्न, तिने आज ‘निकालात’ काढून…. “मला मात्र” “विश्वासाच्या परीक्षेत” शून्य मार्क देऊन, सपशेल नापास केलं होतं……….
…………(४४)
त्या दोघांना ते लग्न करणार आहेत, ते कोणालाच कळवायाचे नव्हते, आणि म्हणूनच “देवा ब्राह्मणांच्या” साक्षीने त्यांनी देवळातच “लग्नाचा विधी” उरकून घेतला होता. मी देवळात अचानक, अकल्पित पणे भेटलो, आणि शुभेच्छा देऊन पुढे एकही शब्द न बोलता निघून गेलो, तेव्हा तीला खरोखरीच देवळात चक्कर आली होती. असं अतुल कडून कळलं. तेव्हा खूप वाईट वाटलं. आणि येत्या “मंगळवार” च्या पहाटेच्या फ्लाईट ने ते दोघे “युनाइटेड स्टेट्स” ला ट्रीटमेंट साठी जाणार ह्याची पूर्ण तयारी त्यांनी अगोदरच केली होती, आणि त्यामुळे ती आजच गोव्याहून सकाळच्या फ्लाईट ने, अतुल च्या “रिसेप्शनिस्ट” सोबत येणार होती, जाण्यापूर्वी मला ती अतुल कडे “भेटणारच” होती. बऱ्याच गोष्टींचा शहानिशा मला करायचा होता, मला विश्वासात का घेतलं नाही, माझ्या शिवाय, आणि जर स्वतः इतकी आजारी होती, तर ते दिवस तिने तेथे ‘एकटीने’ कसे काय काढले असतील? हे माझ्या आकलना बाहेर असलेले प्रश्न तीच सोडवणार होती. मी धडधाकट होतो, जॉबमध्ये होतो, पण ती बिचारी तिथे एकटी आणि त्यात आजारी….. का आपल्यावर ओढवून घेतलं तिने असं जीवन? अतुल तिच्या संपर्कात होता, ही त्यातल्यात्यात उजवी बाजू, पण तिने किती सहन केलं असेल? आता पर्यंत माझच दुःख मला पर्वता एव्हढं मोठं वाटत होतं, पण तिने खूप सहन केलं, मला दुःख नको, माझं भलं व्हावं,दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करून मी सुखी व्हावं, म्हणून तिने आपल्या भावनांना तीलांजली दिली होती. आजही मला तिच्या समोर मी किती क्षुल्लक, आणि शूद्र आहे, ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. “शांतादुर्गेच्या” पायाला हात लावून नमस्कार करायची ती राहिलेली इच्छा, मी तिला भेटल्यावर माझ्या “ह्या देवीच्या” पायाला हात लावून पूर्ण करणार आहे…. अतुल चा फोन आला, बहुदा “त्या दोघी” आतापर्यंत घरी पोहोचल्या असतील…….
“यश, ताबडतोब एअरपोर्ट ला ये. प्लेन लँडिंग च्या वेळी “क्रॅश” झालय.” शब्द कानावर पडले आणि शुद्ध हरपायची फक्त शिल्लक राहिली, पण मन घट्ट करून मी लगेच निघालो……
…………(४५)
माझ्याच नव्हे, तर ह्या वेळी नियतीने अतुल वर पण आपली तलवार उगारून, त्याच्याही “भावनांच्या विश्वाचा” शिरच्छेद केला होता, त्या दोघांच्या “बॉडीज” तश्या चांगल्या कंडिशन मध्ये नव्हत्या, सर्व “फॉरमॅलिटीस” पुऱ्या करून, आम्ही त्या ताब्यात घेतल्या, आजपर्यंत ज्या “विभावारी” ने आमचा द्वेष केला होता, आज तिच्या “ताई” साठी मात्र ती बरीच खचल्या सारखी दिसली, तिचा तो ताठा बिलकुल दिसला नाही, ती खूपच रडली. आपली व्यक्ती जिवंत असे पर्यंत, आपल्याला त्यांची किंमत वाटत नाही, गेल्या नंतर मात्र त्यांच्या आठवणीत आपण रमतो हेच खरं. माझ्यावर आकाशच कोसळले होते, “स्मित” ला भेटण्याची, तिची खरी विचारपूस करायची, आणि तिच्या दुःखात सामील व्हायची वेळ, माझ्या जवळ आली असतानाच, नियतींनी आपला डाव साधला, अतुल च्या प्रयत्नांना सुद्धा यश येऊन “ती” कदाचित बरी सुद्धा झाली असती, तो ही बिचारा “अभागी” ठरला. आम्हा दोघांनाही पोरकं करून ती निघून गेली, अश्या मार्गावर, जिथून परत फिरणे आज पर्यंत कोणालाही शक्य झालेले नाही. दैवा पुढे आम्ही दोघेही आज हतब्बल झालो. आयुष्यभरचे दुःख आमच्या पदरी टाकून परमेश्वराने, आमच्या संचित कर्माची आम्हाला आठवण करून दिली. आपले हे “भोग” बहुदा विध्यात्यांने, “आपल्या” पूर्व जन्मीच्या ‘कर्माचा’ बरोब्बर हिशोब करूनच, “संचित कर्म” भोगायला म्हणून आपल्याला जन्माला घातले असावे. ह्याची जणीव होऊंन ‘त्याच्या’ अधिकाराची खात्री पटली. “आपले कर्म, आपले भाग्य” ह्या विषयावर ‘ती’ अधिकार वाणीने बोलायची, आध्यात्मिक विषयांवर, देव देवतांवर, खूप बोलायची, “देवावर आणि दैवावर” फार विश्वास, सारखं देव, देव करायची, पण शेवटी तिच्या नशिबी तरी काय आले ???…
शेवटी “तिच्या पायांना” स्पर्श करून, त्यावर डोकं ठेऊन तिची माफी मागितली. “श्री शांतादुर्गेवर”, करायचा राहीलेला अभिषेक, त्या “आई भवानीने” ह्या वेळी माझ्या हाता ऐवजी माझ्या डोळ्यांनी, माझ्या “ह्या देवीच्या” थंड पडलेल्या चरणावर करवून घेतला. एरव्ही देवीच्या गाभाऱ्यात अभिषेकाच्या वेळी, होणाऱ्या मंत्रोपाठणात भक्तांच्या भक्तीने भरलेला गाभारा “ह्या” देवीवर, माझ्याकडून झालेल्या आताच्या अभिषेकाच्या वेळी, पूर्णपणे शांतीत रिता झाला. “मी” रागाने, ‘देवीचं दर्शन’ न घेताच, त्या दिवशी गोव्याहून “त्या देवतांकडे” पाठ फिरवून, गोवे सोडून मुंबईला यायला नको होते, असं चटकन माझ्या मनात आले…. एकदा तरी तिने परत यावं, डोळे उघडून माझ्याकडे पाहावं, ते कधीही न विसरता येणार तिचं ते “स्मितहास्य” करून, पुढील आयुष्य जगण्याची हिम्मत माझ्यात द्यावी, म्हणून बऱ्याच काळा नंतर, आज प्रथमच दिसणाऱ्या, तिच्या त्या “मोहक आणि तेजपुंज” चेहेऱ्याला सतत आव्हान करीत होतो. ह्या जन्मी नाही, पण निदान पुढच्या जन्मी तरी “सर्वस्वाने” माझ्या अंता पर्यंत तिने माझी साथ करावी, ही माझ्या “ह्या देवीला” आणि तिच्या त्या आवडत्या “कुलदेवी श्री शांतादुर्गेची” आर्जव करीत, तिला शेवटचा निरोप दिला…
ती गेली पण तिच्या आठवणींची शिदोरी आमच्या साठी मागे ठेऊन गेली, आता त्या “आठवणींच्याच आधारावर” उर्वरित आयुष्य काढणे क्रमप्राप्त आहे………
…………(४६)
काय पण ह्या ‘नियतीचा’ हा ‘अजब न्याय’. आम्ही दोघेही एकटे पणाच्या आगीत आपापल्या परीने जवानिच्या ऐन उमेदीच्या काळात “ज्योती” प्रमाणे जळलो, पण ज्योत स्वतःजळते तेव्हा इतरांना मात्र प्रकाश देत असते. जरी तिच्या ठायी मात्र अंधारच असतो, म्हणतात ना “दीपक तले अंधेरा” पण आमच्या दोघांच्या नशिबी फक्त जळणच असावं, एकमेकां साठी फक्त जळत राहिलो, पण एकमेकांना ‘प्रकाश’ आम्ही देऊ शकलो नाही. आम्ही सुशिक्षित होतो, सधन होतो, ति सुस्वरूप, सालस, सोज्वळ असूनही लग्नाच सुख, आणि संसार तिला मिळाला नाही, माझही तेच झालं, देखणेपण, कर्तृत्व, असूनही मी “एकटाच” राहिलो. आम्हा दोघांनाही समोर पंचपकवानांचे ताट “कर्माने” वाढून ठवले, पण नियतीने ते “भाग्यात” उपभोगायला देण्यात, कसर केली. माझे वडील नेहमी म्हणायचे “जो तो आपापल्या कर्माचा आणि भाग्याचा धनी असतो, पण “प्राक्तन” तो वरचाच ठरवितो” हेच खरं, काही काही गोष्टी “भाग्यातच” असायला लागतात…. “अतुल” चा जेव्हा विचार मनात येतो, तेव्हा तो “अतुल्य” होता हे मला मान्य करावे लागेल. कारण त्याला आमचे संबंध माहीत होते, तसेच तिची “प्रकृती” दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, ह्याची पुरेपूर कल्पना होती, माझ्या सुखासाठी तिने माझ्या आयुष्यातून बाजूला होऊन, देवीच्या आराधानेत ती दिवस रात्र असायची हे ही त्याला ठाऊक होते, तरीही “तिच्यासाठी” त्याने आपला पैसा, वेळ, कशाचीही पर्वा केली नाही. “खरंतर त्यालाही पहिल्यापासून “ती” आवडायची, तिच्या बद्धल ओढही होती.” ‘ती’ त्याची “मामेबहीण” पडते म्हटल्यावर त्यांच्या लग्नालाही घरून कोणाची आडकाठी नव्हती. उलट फूस होती. पण तिचे आणि माझे संबंध “जुळतायत” म्हटल्यावर त्यांनी आपल्या भावनांना आमच्या जुन्या मैत्री पोटी,आणि तिच्या प्रेमासाठी, आवर घातला. पुढे तिने मला भेटावं, ह्या साठीही तो प्रयत्न करीत राहिला. पण ती आपल्या मतांवर ठाम आहे हे कळल्यावर, शेवटी “अमेरिकेला उपचारासाठी” ती तशीच त्याच्याबरोबर यायला तयार होईना, तेव्हा त्याने तिला लग्नाची मागणी घातली, अट्टाहासाने, शपथ घालून, गळ घालून, “बायको” म्हणून तिला उपचारासाठी त्याच्याबरोबर येण्यास भाग पाडले. उदार अंतकरणाने आपला काहीही फायदा नसतांना, तिला सुख लाभावे म्हणून, आणि आपल्याला लोकं काय म्हणतील, ह्याची परवा न करता, “पतंगाने प्रेमासाठी ज्योती कडे झेपावे”, तसा स्वतःचा नाश करून घेतला. एकेकाळी त्यांच्या बद्धल, त्यांच्यावर नकोते संशय घेतलेल्या “माझ्या मनाला”, “शिक्षा”, द्यावी, तसेच ह्या जन्मी, कोणाही चांगल्या मुलीशी, लग्न करणे हे त्या स्त्रीची फसवणूक करण्या सारखे तर होईलच, आणि “स्मित” च्या आठवणीत, संसाराला “न्याय” देणे कठीण होईल, आणि जर “अविवाहित” राहिलो तरच मी “तिला” न्याय देऊ शकेन, त्यामुळे, माझ्यावर “दया” दाखवून निदान पुढच्या जन्मीतरी “स्मित” माझी व्हायला “श्री मंगेश” आणि “श्री शांतादुर्गेची” माझ्यावर कृपा होईल, असा सारासार विचार करून, मी आजन्म “अविवाहित” राहण्याचा निर्णय घेतला….. तसेही नाहीतरी आपण आयुष्यभर “एकटेच” असतो.
“स्मित” च्याच म्हणण्या प्रमाणे:
“आये भी अकेला, जाये भी अकेला…
दो दिनकी जिंदगी है, दो दिन का मेला……”
❣️”समाप्त”❣️
***********************