– अनंत नारायण संझगिरी
🙏🏻*मनोगत*🙏🏻
मित्रहो ……
मला शक्यतोवर जुनी गाणी आवडतात. ती गाणी आपल्याला पाठविताना एखादी ‘कल्पित’ कथा रचून त्यातील नायकाच्या आणि नायिकेच्या……त्या त्या मनःस्थितीला अनुसरून त्याला साजेसे एखादे गाणे मिळाल्यास ते आपल्याला पाठविण्याचा माझा प्रयत्न असतो…
ह्या आधी खालील ५ कथां मधून मी हा प्रयत्न केला होता:
१) माझ्या आठवणीतील मुकेशची गाणी (मुकेशची सोलो हिंदी गाणी)
२) तिच्या आठवणीतील गाणी (हिंदी मिक्स गाणी)
३) आमच्या आठवणीतील गाणी (मराठी गाणी)
४) अतृप्ता (हिंदी मिक्स गाणी)
५) आठवणींच्या पलीकडे (मुकेशची गैर फिल्मी गाणी)
आता “सुमित्रा” ह्या नव्या काल्पनिक कथेतून “रफी साहेबांची” काही जुनी गाणी पाठविण्याचा एक प्रयत्न मी करीत आहे.
‘व्हाट्सएपच्या’ माध्यमातून एका वेळी, जास्त गाणी आणि कथा पाठविणे शक्य होणार नाही, म्हणून रोज कथेचा काही भाग, आणि गाणी पाठवीत आहे.
आपण ती कथा आणि गाणी ‘संग्रही’ ठेऊन ऐकल्यास जास्त आनंद मिळेल अशी आशा वाटते.
……ह्या माझ्या प्रयत्नात बऱ्याच त्रुटी असू शकतील. आपण त्या मला कळविल्यास मी आपला आभारी राहीन.
***********************
……सुमित्रा…..(०१)
“काही गोड फुले सदा विहरती, स्वर्गांगनांच्या शिरी.
काही ठेवितसे कुणी रसिकही, स्वच्छंद हृंमंदिरी.
काही जाऊन बैसती प्रभूपदी, पापा पदा वारीते.
एखादे फुटके नशीब म्हणुनी, प्रेतास शृंगारिते”
सुप्रसिद्ध नाटककार “कै. बाळ कोल्हटकर” ह्यांच्या गाजलेल्या” एखाद्याचे नशीब” ह्या नाटकातील आणि कवी ‘गोविंदाग्रज ‘उर्फ नाटककार कै. ‘राम गणेश गडकरी ‘ह्यांच्या काव्याच्या ह्या चार ओळी आज राहून राहून माझ्या डोक्यात घोळत राहून काही केल्या हटायला तयार नव्हत्या. शेवटी नयनांच्या निरांजनाना अश्रुंच्या तुपाची धार मिळाली, आणि मनाच्या आधाराने हृदयाच्या खोल गाभाऱ्यात त्याचा लख्ख प्रकाश तेवला, आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.डोक्यात झिणझिण्या उठल्या आणि शरीराला कंपने देत, शेवटी त्या मोहक गुलाबांच्या गुलाबी रंगाच्या हाराने हृदयातील रक्ताचे पाणी केले.थरथरत्या हाताने कसातरी तो हार मी “सुमित्रा” च्या त्या निष्प्राण देहावर वाहिला…. ह्या फुलांचा हार मी अत्यानंदाने एके काळी तिच्या गळ्यात घालायला हवा होता. ओंजळीतील ही रंगीत सुवासिक फुले,त्याचा गजरा,अथवा सटावरची वेणी करून तिच्या लांबसडक काळ्याभोर केसाच्या आंबाड्यात माळायला हवी होती.पण… माझी ती इच्छा, नियतीने आपला कठोर चाबूक उगारून माझ्याकडून हिसकावून घेतली होती.आता हातातील ओंजळीने तीच्या त्या एकेकाळच्या गुलाबी पाया ऐवजी,आज तेजोहिन अश्या पायावर वाहण्यास आता मला भाग पाडले. ज्या ओंजळीत तिची प्रतिमा मी आयुष्यभर बघत आलो होतो,ती माझी ओंजळ नियतीने आज रीती केली. नियती किती निष्ठुर होऊ शकते.आपण केलेल्या कर्माची, ह्या जन्मातील, किंवा मागील कित्येक जन्मातील केलेल्या कर्मांची परत फेड आपल्याला ह्या जन्मात भोगायला लावते, ह्याचा मला ह्या क्षणी अनुभव आला… माझ्या खांद्याला धरून श्री ने मला उठवित तिच्या पासून आणि त्या गर्दीतून दूर करून एका कोपऱ्यात नेऊन बसवित तो माझे सांत्वन करू पाहत होता.सुमित्रा आणि माझ्या प्रेमातील जाण असलेला तोच एक दुवा आता माझ्या जवळ आणि माझ्या आयुष्यात शिल्लक होता. माझ्या मनाची खरी जाण, मला तीची असलेली ओढ. तिच्या बद्धल ची आसक्ती आणि प्रेम, तसेच तीच्याबद्धलची वाटणारी सहानुभूती आणि आत्ताची माझी ही अवस्था समजू शकेल असा माझा जिवा भावाचा तोच काय तो इतक्या वर्षांचा साक्षीदार आता माझ्या बरोबर होता…श्री ची खूप इच्छा होती मी तिच्या अंत्य यात्रेत त्या सर्वांबरोबर सहभागी व्हावं पण तिच्या अंत्य दर्शनानेच मि हेलावून गेलो होतो आणि पुढे ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं तिचे दहनविधी करणे, ते सर्व बघणे, आता मला सहन झाले नसते. मी श्री ला विनंती केली माझ्या वतीने त्यानेच पुढे जाउन शेवटी अंत्यक्षणी माझा निरोप मनोभावे तिला पोहोचवावा…… मी एकटा…. एकटाच… हरलेल्या मनाने शुन्यावस्थेत दिग्मुढ होऊन तसाच तेथे बसून राहिलो………(२)
***********************
……सुमित्रा…..(०२)
श्री ने मला दंडाला धरून तिच्या अंत्यदर्शना साठी आलेल्या नातेवाईक आणि आप्तेष्ट मंडळी ज्या कॉरिडॉर मध्ये बसली होती,तेथे शेवटच्या रांगेत कोपऱ्यातील खुर्चीवर आणून बसवले. तिच्या त्या शेवटच्या कार्यात पुढील मदतीसाठी म्हणून मीच त्याला तिच्या बरोबरीने राहावे म्हणून पुढे जायला भाग पाडले. मला आता तिथे एकट्याला ठेऊन जायचे त्याच्या जीवावर आले होते पण तो माझ्या शब्दाबाहेर नव्हता…. श्री निघून गेला तसा मी एकाकी पडलो. माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली होती,डोकं जड झालं होतं, छातीवर दडपण आल्यासारखं झालं होत.समोर आणि आजूबाजूला बसलेली माणसे, दोन दोन, तीन तीन दिसत होती. ह्यातल्या कोणाला मी ओळखत होतो की तेच अनोळखी होते,काहीच समजत नव्हतं. आजू बाजूचा एक एक जण उठून तिच्या यात्रेत त्या पसरलेल्या कोमल फुलांच्या मार्गावरून त्या कोमल फुलांना तुडवीत, सहभागी होऊन निघून गेला… आता मात्र मी सर्वस्वी एकटाच पडल्याची जबरदस्त जाणीव होऊन माझ्या दोन्ही डोळ्यांच्या कडांचा बांध फोडून, तप्त अश्रूंनी माझ्या छातीवर केलेल्या अभिषेकाचा आता संपूर्ण ‘हार’ झाला होता. आठवणींच्या फुलांचा माझ्या हृदयावरील तो हार मी मनोमनी हातात घेऊन, त्या प्रेमाच्या तप्त अश्रूंनी तयार झालेल्या कोमल फुलांचा हार, मगाशी, मीच तिच्या निष्प्राण कलेवर घातलेल्या गुलाबी हाराला बाजूला सारत, हळूवार पणाने तिच्या त्या बोलक्या डोळ्यात पाहत तिच्या गळ्यात घातला….. मागे तिच्या गळ्यात ‘वरमाला’ घालायची माझी काळाने हिरावून घेतलेली उत्कट इच्छा, माझ्या अंतर्मनाने ह्या अश्या अवेळी,अशुभ मुहूर्तावर आणि अनामिक कातर वेळी पूर्ण करून घेतली…. संध्या छायेने आता काळी शाल पांघरायला सुरुवात केली, तसा मनात आणि बाहेर चहूकडे अंधार दाटू लागला. दिवे लागणी ची वेळ झाली. ज्योतिवर झेपावणाऱ्या आणि स्वतः च्या सर्वांगाची होळी करून प्रेमाची पावती देणाऱ्या पतंगाची प्रखरतेने आठवण झाली तसा मि उठून, तिच्या मार्गावर उधळलेल्या त्या फुलांच्या गालिच्यावरून, हरवलेल्या अवस्थेत, एकाकी हृदयाने आणि निर्दय तेने त्या कोमल फुलांना पायदळी तुडवत, वाट मिळेल तसा एकटाच निघालो… काय गंमत असते पाहा, कोणत्या फुलाने कधी उमलावे,कधी कोमेजून जावे, त्यांचा आकार, रूप, रंग, गंध, हे सर्व त्या विधात्याने अगोदरच ठरवून ठेवलेले असावेत. कुठल्या फुलाने त्याच्या मुकुटा वर विराजमान व्हावे आणि भक्ताने कोणते फुल त्याच्या चरणावर ठेवावे हे देखील तोच ठरवतो. काही सुवासिक फुलांना एकाद्या सुवासिनीच्या केसात मानाने खुलवितो तर एखादी सुवासिक आणि कोमल असलेली कळी देखील माझ्यासारख्याच्या पायाखाली आता अशी चुरडून जावी ही सुध्दा त्याचीच इच्छा….आपल्या प्रत्येकाचं प्राक्तन आणि नशिबही त्या कर्त्या करवित्यानेच घडवले असावे. आपण फक्त एकाद्या ‘कठपुतली’ प्रमाणे त्याच्या तालावर नाचायचं एवढंच आपल्या हाती असावं. कुठे तरी अवकाशी, ढगात लपून बसून तो आपली गंमत बघत असावा….. सहज दूरवर असीम सागराच्या पलीकडील क्षितिजावर माझी नजर गेली. एक प्रखर तेजस्वी चांदणी माझ्या पासून आता दूर दूर अनंताच्या पलीकडे झेपावल्याचं मी कितीतरी वेळ तसाच पाहात होतो… ती प्रत्यक्ष ‘सुमित्राच’ आहे ह्यात मला तिळमात्र शंका नाही. मी अनेक वेळा अथांग सागराच्या किनाऱ्यावर तिच्याबरोबर असताना,तिचा हात हातात घेऊन “सुमित्रा” हे तिचे गोड नाव किनाऱ्यावरील वाळूत कोरायचो तसेच आत्ताही, पण फक्त एकट्यानेच कोरले…… नियतीने सुमित्राला आज माझ्यापासून कायमचे दुरावलेच पण आता ह्या अचानकपणें पुढे आलेल्या समुद्राच्या निर्दयी लाटेने तिचे नावही माझ्यापासून हिरावले आणि ती परतली……..(०३)
***********************
……सुमित्रा…..(०३)
नियतीने ह्या आधीच सुमित्राला माझ्या पासून कायमची दुरावली असली,आणि आत्ता ह्या निर्दयी लाटेने तिचे नावही माझ्या पासून हिरावून घेऊन ती मागच्या मागे फिरली असली, तरी जे माझ्या नसानसात आहे, आणि हृदयावर कोरले गेलेले आहे, ते पुसून टाकायची ताकद मात्र ह्या विशाल आणि अथांग सागरात सुध्दा नक्कीच नाही… आज काळाने जरी तिला माझ्या पासून कायमचेच त्या दूर दूर अनंतात विलीन केले असले, तरी तिच्या बद्दल ची माझी ओढ आणि वाटणारी आसक्ती काळाच्या ओघात किंचितही कमी झाली नाही. तीच्य बद्दल जे प्रेम यौवनाच्या उंबरठ्यावर, आणि तिच्या सहवासात असातांना वाटले होते,आजही ते तसेच अबाधित आहे. तिच्या बद्दल ‘प्रथम दर्शनी’ ज्याला ‘लव्ह ॲट फर्स्ट साईट’ म्हणतात… की जे सौंदर्य मनाला भिडते आणि हृदयावर कोरले जाऊन,कायमचे तेथेच वास्तव्य करते.आणि त्याची जागा पुढे कुठलेही प्रेम घेऊच शकत नाही, अश्या त्या पहिल्या प्रेमाची तीव्रता आजही माझ्या हृदयी तशीच कायम आहे… असं म्हणतात की “फर्स्ट लव्ह इज धी ओन्ली लव्ह, बाय धी सेकंड, धी हाईयेस्ट सेन्स ऑफ लव्ह इज ऑलरेडी लॉस्ट” हेच खरं. सुमित्रा माझी प्रेयसीच नव्हती तर कालांतराने ती माझी एक जिवलग मैत्रीण सुद्धा झाली होती…. बरेच वेळा मी “सुमित्रा” ऐवजी तिला लाडाने “मित्रा” असे देखील संबोधित असे. जवानीच्या जोश्यात आपण स्वतःला जरी खूप ताकदवान आणि मर्द समजत असलो. यौवनात अंगात असलेल्या रग आणि मस्तीत, तसेच पाठीशी असलेल्या संपत्तीच्या जोरावर काहीही करून दाखवण्याची हौस आणि जिद्ध आपल्यात असली तरी त्या कर्ता करवित्याने आपल्या भाळी, आपल्या ललाटी लिहिलेले पुसायची ताकद मात्र आपल्यात कधीच नसते. मी काहीही करायचे ठरविले, आणि तसे कर्म जरी केले तरी त्या कर्माला भाग्याची जोड तोच देऊ शकतो आणि म्हणूनच बहुधा गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसाव्या श्लोकात त्याने आपल्याला “फक्त निष्काम कर्म करण्याचा अधिकार दिलाय, पण फलाची आसक्ती धरू नकोस.”असा उपदेश देखील केला असावा…. सुमित्राच्या त्या अखेरच्या यात्रेत मी सहभागी झालो नाही.आणि वाट फुटेल, वाट मिळेल तसा भरकटत आलो, तरीही आम्ही दोघे ह्या जुहूच्या समुद्र किनारी भेटायचो,नेमका तिथेच जाऊन कसा धडकलो ह्याचच मला नवल वाटतं…. ती अशी मला एकट्याला सोडून ह्या जगातून निघून जाईल आणि आता खरोखरच गेली आहे, ही कल्पनाच भयंकर आहे… तिच्या लग्नानंतर ,माझ्यापासून शरीरानी जरी ती दूर होती. तरी मला मात्र ती सतत माझ्या जवळच आहे. माझ्या हृदयात आणि श्र्वासातही तीच आहे ह्याची प्रचिती मी अनेकदा घेतली होती…. “मी तिला विसरावं, तिचा नाद सोडून द्यावा,त्यातच माझं कल्याण आहे. तिला विसरलो तरच मी माझं जीवन शांतपणे आणि सुखाने जगू शकतो…. मी तिला विसरून एकाध्या सुंदर, सुशील मुलीशी लग्न करून संसारात मग्न व्हावं म्हणून “श्री” मला तशी गळही घालायचा. माझ्या भरकटलेल्या जीवन नौकेला पुन्हा किनाऱ्यावर आणण्यासाठी, आणि मी सुखी व्हावं ह्या इच्छेपोटी माझा जिवलग मित्र म्हणून तो आपल्या परीने कर्तव्य करीत राहिला…. पण ह्या मित्रा शिवायही, माझी “मित्रा” च माझ्या हृदयात आणि नसानसात वास्तव्याला असताना, मी कुठल्याही अन्य स्त्रीचा विचार करूच शकत नव्हतो… इतर स्त्रिया आयुष्यात येण्याचे योगही भरपूर आले, आणले गेले, पण मी कधीही त्या जाळ्यात गुंतलो गेलो नाही आणि माझ्या जीवाभावाच्या ह्या गोड सुमित्राने सुद्धा माझ्या मनाची, माझ्या हृदयाची साथ कधीही सोडली नाही. वेड्यासारखं का होईना मी सदैव तिचाच राहिलो. तिच्या लग्नानंतर माझ्या आयुष्यातील एकही दिवस असा गेला नाही की मी तिची आठवण काढली नाही. मुळात आठवण यायला मी थोडाच तिला विसरलो होतो म्हणा… पण आज ह्या अश्या अथांग सागर किनारी क्षितीजाच्या पलीकडे दूर दूर अनंतात विलीन होण्याची घाई करीत असलेली ती प्रखर चांदणी हळू हळू शांत शांत होत निष्प्रभ, निष्प्राण होण्या आधी मला तिला पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी, माझ्या कवेत, माझ्या हृदयाशी कवटाळून, माझ्या श्वासात तिचा श्वास मिसळत, आणि माझ्याच पंचप्राणात तिला विलीन करण्यासाठी मी त्या परतीच्या लाटेला मागे मागे पाडीत आणि पुन्हा जोर करीत किनाऱ्याकडे धावणाऱ्या त्या अजस्त्र लाटांच्या ताकदीची तमा न बाळगता,माझं सर्वस्व पणाला लाऊन क्षितिजाकडे, आणि माझ्या पासून दूर दूर जाणाऱ्या माझ्या चांदणी कडे प्रकर्षाने धाव घेतली………..(०४)
***********************
……सुमित्रा…..(०४)
आपल्याला सोडून, हे जग सोडून गेलेल्या आपल्या प्रिय व्यक्ती,ह्या अंतरीक्षातील तारका आहेत ह्यावर माझा विश्वास आहे. माझे पप्पा लहानपणी मला सोडून देवाघरी गेले तेव्हा माझ्या बालपणीच्या त्या वेळेच्या “पप्पा कुठे आहेत, ते कधी येणार?” ह्या माझ्या आईला विचारलेल्या प्रश्नावर, माझ्या बाळबोध मनाची समजूत काढताना आई म्हणायची की, “ते देवाघरी गेलेत आणि तेथे जाऊन ते आपल्या प्रेमापोटी, या आकाशातून ताऱ्याच्या रुपात राहून, देवलोकातून ते आपल्या कडे पहात असतात. आपला सांभाळ करतात.” आणि आईने बालपणी काढलेली माझी समजूत, मनावर इतकी बिंबली होती की पुढे मोठेपणी आई गेल्यावर सुध्दा,एका सुंदर, आणि सतत चमकत राहणाऱ्या, तेजस्वी आणि सर्व तारकांपेक्षा निराळीच भासणारी ‘ती तारका माझी आईच आहे’ ह्या विश्वासाने रात्री, अपरात्री मनोमन मी तिच्याशी बोलताना पाहून कित्येक भावनाशून्य लोकांनी मला वेड्यात काढले होते. तरल भावनांचे पण एक विश्व आहे, तसे विश्व असते, मुके प्राणी, पक्षी, मुंग्या, कीटक, फुले, पाने ह्यांना पण भावना असतात, ते आपल्याशी संवाद साधतात, ह्यावर आत्ता कुठे संशोधनाला सुरवात व्हायला लागली आहे…. ती प्रखर चांदणी नक्कीच सुमित्रा आहे ह्याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली. माझे दोन्ही हाथ पसरून क्षितिजावर दूरवर दिसणाऱ्या त्या अतिशय चमकणाऱ्या शुभ्र चांदणी कडे झेपावत होतो. “मित्रा” स्वतःही आपले दोन्ही हाथ पसरून माझ्याकडे बघून स्मित करीत होती. आता मला आलिंगन देऊ पाहणाऱ्या माझ्या लाडक्या “मित्रा” साठी जीवाचे रान करीत, अंगावर उसळणाऱ्या त्या महाकाय लाटांना तुडवीत, जीवाची पर्वा न करता,हात उंचावीत मी तिच्या जवळ पोहोचण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण तिचा हात मात्र काही माझ्या हातात मिळत नव्हता…. “सुधीर… सुधीर” म्हणून आक्रोश करणाऱ्या सुमित्राचा आवाज आता माझ्या कानात घुमत होता…. ती सुध्दा मला डोळ्यांनी खुणावत, आणि माझा हात हातात घेण्यासाठी धडपडत होती. आता तीच पुढे पुढे सरकत सरकत अलगद त्या चंद्र प्रकाशात किरणांच्या झुल्याचा आधार घेत माझ्या डोळ्या समोरील ‘शिडाच्या नावेत’ एखाद्या परी प्रमाणे अलगद उतरली. शेवटी एकदाचा मी तिच्या अगदी जवळ पोहोचलो.तिने मला आधारासाठी दोन्ही हात पुढे केले. आणि हातात हात मिळवे पर्यंत उसळलेल्या लाटेच्या तडाख्यात सापडून मी गटांगळ्या खाऊ लागलो. प्राणांतिक ओढीने पुन्हा हात उंचावत होतो.पुन्हा लाटे सरशी दूर फेकला जाऊन बुडत होतो. शेवटी तिनेच वाकून मला वरती नावेत घेतले. जिवाच्या ओढीने, तिला कवेत घेऊन हृदयाशी कवटाळण्याची माझी इच्छा आणि आता तिने दिलेला प्रतिसाद अवर्णनीय होता. आम्हा दोघांनाही लाभलेला एकमेकांचा सहवास स्वर्ग सुखाहूनही अधिक असावा… ढगा आढ लपंडाव खेळणारा चंद्र, उसळणाऱ्या लाटा, शिडात शिरलेला वारा, दूरवर दिसणारी ती किनाऱ्याच्या सभोवतालची झाडी. आणि त्या शीतल चंद्र प्रकाशात अतिशय सुंदर दिसणारे तिचे ते मोतिया कलरच्या साडीतील आणि मला आवडते म्हणून बंद गळ्याचा आणि कोपरापर्यंत बाही असलेला,पदराला म्याचींग राणी कलरच्या रंगाचा ब्लाऊझ घातलेले ते मोहक रूप.अप्सरेला सुद्धा लाजवित होते… नावेच्या हेलकाव्या सरशी पडता पडता मी तिला सावरले. “मित्रा”… कित्येक महिन्या नंतर मी हलकेच तिच्या कानाला अधरानी स्पर्श करीत तिला जवळ केले. नियतीने दुरावलेले जीव आज एकमेकांचे पुन्हा एकदा झाले होते. कधी काळी एकमेकांच्या सानिध्यात समुद्र किनारी चंद्राच्या साक्षीने गुणगुणलेले गीत दोघांच्याही ओठावर होते.एकमेकांच्या बाहुपाशात रात्र कधी आणि कशी सरली कळलेच नाही….. आता पूर्वेला वर शुक्राची चांदणी चमकताना दिसत होती. मंद वाऱ्याच्या झुळकेसरशी तिच्या मांडी वरून हलकेच उठत तिचे ते तेजस्वी आणि समाधानी मुखकमल माझ्या ओंजळीत घेऊन आणि ते गोड रूप माझ्या डोळ्यात साठवित पुन्हा एकदा तिला माझ्या प्रेमाची ग्वाही देत असतानाच, हळू हळू डोळ्यापुढे अंधारी आली आणि तिचे ते रूप माझ्या डोळ्यांना दिसेनासे होत असल्याची जाणीव होऊन माझी शुद्ध हरपत असल्याचा मला भास झाला….. “मित्रा… मित्रा”… म्हणून ओठावर आलेले शब्द बहुधा हवेतच विरले असावे ………….(०५)
***********************
……सुमित्रा…..(०५)
माझ्या हाताच्या ओंजळीतील “मित्रा” च्या त्या समाधानी चेहेऱ्यावर तिच्या नजरेतील माझी प्रतिमा अस्पष्ट होऊ लागली. वाऱ्यावर हेलकावे खाणाऱ्या नावेत आता डोळ्या पुढे अंधारी आली. पूर्वेला क्षितिजावर दिसणारी ती तेजःपुंज शुक्राची चांदणी क्षीण झाली. भर सागरातील समोरून उठणाऱ्या लाटांच्या तडाख्याने आम्हाला पूर्णपणे भिजवून एकमेकांपासून आता दूर केलं होतं. माझी शुद्ध हरपत असल्याचा मला भास होत होता. आंतरिक ओढीने “मित्रा” म्हणून तिला जोरात घातलेली. ‘प्रेमाची साद’ हवेतल्या हवेत विरत,त्या डोलणाऱ्या नावेत माझ्या मनाला आठवणींच्या हिंदोळ्यावर डोलावत मित्राला भेटायला उत्सुक झाली…….. आज ३० जानेवारी “श्रीकांत” चा २५ व्वा वाढदिवस “सिल्व्हर जुबीली बर्थ डे” आहे. आणि त्या आधी ३ जानेवारीला ह्याच नवीन वर्षाच्या सुरवातीला, त्याच्या लग्नानंतर एका वर्षाच्या आतच,त्याला मुलगी झाली होती. “श्री” ला आणि “सानिका” वहिनींना मुलींची आवड आहे आणि त्यांना परमेश्वराच्या कृपेने नेमके पहिले कन्यारत्न झाल्यामुळे “पहिली बेटी धनाची पेटी” म्हणत, आम्हा सर्वांना त्याने कबूल केलेली पार्टी आणि त्या सोनुलीचा ‘बारसा’ सुध्दा श्री च्या आजच्या वाढदिवसाच्याच दिवशी ठरवून दणक्यात पार्टी साजरी करायचा बेत श्री ने ठरविला होता… वास्तविक गर्दीच्या ठिकाणी, सर्वांच्या घोळक्यात जायचे मी पहिल्या पासून टाळीत आलो होतो. लोकं मला “इंट्रोवर्टेड”, आणि काही काही लोक ‘शिष्ट’ सुद्धा समजतात. कोणाचे लग्न कार्य अटेंड करायचे सुद्धा माझ्या जीवावर येत असे. पण श्री माझा जिवलग मित्र,आमची कोणतीही व्यक्तिगत गोष्ट ज्याला “प्रायव्हेट पर्सनल” म्हणतात,ती सुद्धा एकमेकांना ठाऊक असायची. आमचे व्यक्तिगत निर्णय सुध्दा आम्ही एकमेकांशी विचार विनिमय करूनच घ्यायचो. त्यामुळे त्याच्या लग्नाला सुद्धा मी जातीने पुढाकार घेऊन हजेरी लावली होती. एकाच शाळेत, एकाच कॉलेजात आम्ही शिकलो. पुढे बी. कॉम करून तो बँकेत ऑफिसर म्हणून लागला आणि मी सी. ए. ….. तसं पाहता त्याने लवकर लग्न केले. कारणही तसेच होते.सानिकाचे आणि त्याचे लव्ह मॅरेज, सानिकाच्या घरी हा आंतर जातीय विवाह पसंत नव्हता. तीचे दुसऱ्या कोणाशी लग्न लाऊन देण्याचा घरच्यांचा बेत ह्या पठयाने उधळून लावला होता. आणि मी सुद्धा लवकर लग्न करून मोकळा व्हावं म्हणून तो माझ्याही मागे तग लावून होता. पण आई गेल्यापासून मी लग्नाचा विचारही मनातून काढून टाकला होता. वास्तविक मी रूपाने देखणा, स्कॉलर, घरची श्रीमंती. पण माझे आगळे वेगळे विचार,त्यात एकलकोंडी स्वभाव त्यामुळे लग्नाच्या भानगडीत न पडलेलच बरं असा माझा विचार होता. श्री चे लग्न झाले आणि हळू हळू आमच्या भेटी कमी होऊ लागल्या तसा मलाही एकटे पणा जाणवू लागला. पण मला आवडेल, अशी साधी, सुंदर, सालस, सुशील, आणि सुशिक्षित त्यात मला समजून घेईल अशी समजूतदार मुलगी काही माझ्या नजरेत नव्हती. त्यात माझा स्वभाव म्हणे विक्षिप्त, माझे विचार जगावेगळे, आणि त्यात एकल कोंडा स्वभाव त्यामुळे नात्यात मला कोणी मुलगी सुचवायला देखील घाबरत. माझी स्वतः ची फर्म आहे. पण अजून पर्यंत अशी एकही मुलगी माझ्या नजरेत नव्हती. …. श्री ने बऱ्याच जणांना आग्रहाचे आमंत्रण दिले होते. मित्र, शेजारी, सहकारी, आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींनी तो डेकोरेट केलेला हॉल पूर्ण भरला होता….. अश्या गर्दीत माझा जीव घुसमटतो. श्री ला ह्याची पूर्ण कल्पना होती. त्याने मुद्दाम एका बाजूला सोफ्यावर माझी छान व्यवस्था केली होती…. हॉल सोडून मी आज लवकर परतू शकत नव्हतो कारण त्याने सर्व निमंत्रीतांना माझ्या कडून ‘रफी साहेबांची’ काही गाणी माझ्या सुरेल आवाजात ऐकविण्याचे जाहीर केले होते. श्री चा हा आग्रह मी टाळू शकत नव्हतो…, जुनी गाणी ऐकणं आणि म्हणणं हा माझा प्राण आहे. ह्याची त्याला पूर्ण कल्पना आहे… पण माझ्या साठी सुध्दा आज काही “सरप्राइज” असेल ह्याची मात्र मला कल्पनाच नव्हती….. आणि…..ती आली, तिने पाहिलं, आणि तिने जिंकले देखील…….(०६)
***********************
……सुमित्रा…..(०६)
‘कधी कोणात गुंतायचं नाही’ हा मनाच्या आरशावर मी सतत कोरत असलेला माझा निश्चय आणि मी केलेला पण…… पण, तरीही आज या हॉलच्या मुख्य प्रवेश द्वारातून सरळ तिने प्रवेश केला, आणि माझ्या नयन द्वारातून हलकेच माझ्या हृदयाच्या पायऱ्या उतरत, मनाचा पारदर्शक पडदा दूर सरला. आणि माझा निश्चय आणि पण दोन्हीही हवेत कुठल्या कुठे उडवत “तिने” आपल्या सुंदर प्रतीमेने तिथे आपले रूप कोरून मनोगाभारा पूर्णपणे व्यापून टाकला. तेथे प्रतिबिंबित झालेले तिच्या त्या सुंदर प्रतिमेचे ते अलौकिक रूप माझ्या मनोगाभाऱ्यात आयुष्यभर तसेच राहील ह्याची प्रथम दर्शनिच खात्री झाली….. आयुष्यात पहिल्यांदाच मला एका स्त्री विषयी मनापासून एवढं आकर्षण,एवढी ओढ,आणि अनामिक प्रेम वाटलं होतं….. प्रथम दर्शनी एखाध्या स्त्री बद्धल पुरुषाला असं हे वाटणं हे फक्त शारीरिक आकर्षण असू शकत का? की ज्याला आपण’ पॅशन्, ऍफेक्शन’ म्हणू शकतो. ते तसं असतं,…की निर्व्याज, निरागस आणि निश्र्चयी प्रेमाची मागील जन्मातील किव्वा जन्मोजन्मीच्या प्रेमिकांची, त्यांच्या त्या दोन आत्म्यांच्या मिलनाची ती एक खूणगाठ असते कोण जाणे ?….. ‘श्री’ च्या सानुलीचा नामकरण विधी प्रथम पार पडला तिचे “स्वरा” हे गोड नाव सर्वाँना आवडलेच पण मला स्वतःला खूपच आवडले. “स्वर” आणि त्यातही स्वरांचा बादशाह असलेल्या ‘रफी साहेबांवर’ जसा माझा जीव, तसाच ह्या छोट्याश्या, इवल्लुश्या “स्वरा” वरही माझा जीव जडला. स्वरानेही मोठी होऊन संगीताची जोपासना करावी. नाव कमवावं आणि आपल्या आई, वडीलांच्या आयुष्यात प्रेमाची, मायेची, सुरेल उधळण करीत त्यांच्या जीवनाची मैफिल गाजवावी असा शुभाशिर्वाद सुध्दा मी तीचा गोड पापा घेऊन तिला दिला… सर्वांना बारशाच्या अंजिराची बर्फी वाटायचे काम श्री ने मुद्दामच बहुधा माझ्यावर डोळा ठेऊन, तिच्याकडे सोपविले असावे. कारण सुरवातीला त्यानेच मला त्या गर्दीपासून बाजूला त्यांच्या जवळच सोफ्यावर बसवले होते. तेव्हा सुरवात माझ्या पासूनच झाली….. बर्फी हातावर ठेवतांना पहिल्यांदाच नजरेला नजर भिडली. काही क्षण तसेच गेले.मी तिच्याकडे, आणि ती फक्त माझ्या कडेच पहात राहिली. काळ बहुधा थांबला असावा. डोळ्यांच्या पापणीची उघड झाप करायचे मेंदूचे काम तो ही क्षणभर विसरला असावा. जन्मोजन्मीच्या नात्याची ओळख एका क्षणात पटली. न राहवून, मग तीच्यावराची नजर किंचितही न ढळू देता मी हसत विचारलं. “अहो स्वीट देताय नं”…. “हो ना! “सॉरी “. विसरलेच की.” ….. म्हणत तिने आपल्या नाजूक गुलाबी हाताने ती बर्फी, अजाणता माझ्या पुढे केलेल्या हातावर ठेवली……. “नाव काय”….. मी पुन्हा नजरेला नजर भिडवित म्हणालो. “आपल्याला माहित नाही का ?” ….एक हलकासा मिश्किल कटाक्ष…. “स्वरा”… “ओह नो!” व्हॉट ए सरप्राइज…. कमाल आहे, आपले नाव पण ‘स्वरा ‘ च आहे का?” ….. तिने खो खो हसत, मान हलवीत आपल्या लांब सडक,काळ्याभोर कुरळ्या केसांचा शेपटा उजव्या खांद्यावरून छातीवर घेत आपल्या नाजूक, लालचुटुक ओठावरील हात दूर करीत आणि ओठांवरचं हसू आवरत. अप्रतिम स्मित हास्य करीत म्हणाली “छे.. हो”….. मी “सुमित्रा”…… मला ‘स्वरा’ हे त्या गोड सानुल्या ‘छोटया परी’ चे आणि ‘सुमित्रा’ हे ह्या गोड, ‘मोहक तरुण परीचे’ नाव तिच्या देखण्या रुपासकट आवडले… काही माणसं, काही व्यक्ती आपल्याला प्रथम दर्शनीच आवडतात, त्यांच्याशी आपले जुळते, तर काही व्यक्तींचा काहीही दोष नसतांना सुद्धा उगाचच त्या आवडत नाहीत किव्वा त्यांच्याशी पटत तरी नाही. कदाचित ह्याचा पूर्व जन्माशी सुद्धा काही संबंध असू शकेल… श्री ने बर्थ डे केक कापला, “हॅप्पी बर्थ डे टू यु” सर्वांनी त्याला वीश केलं शुभेच्छांच्या, गिफ्टच्या आणि फुलांच्या गुलदस्त्याने तो ही भारावून गेला… खाण्यापिण्याची अतिशय उत्तम व्यवस्था होती. वातावरण आनंदित, प्रफुल्लित होते. सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते. पण माझे सर्व लक्ष फक्त आणि फक्त “सुमित्रा” वरच होते. तिचे ते लोभस आणि सालस रूप, मी डोळ्यात आणि हृदयात साठवित होतो. श्री चे लक्ष सुद्धा माझ्यावरच असावे.माझ्या आवडी, निवडी,माझे मन तो पूर्ण जाणून होता. आज सुमित्रा ला पार्टीला बोलाविण्याचे खरे कारण’ मला ती आवडेल, आणि मी लग्नाला होकार देईन’ हे तो जाणून होता….. सुमित्राला आणि मला एका बाजूला घेऊन त्याने आमची एकमेकांशी ओळख करून दिली. ती हल्लीच ट्रान्स्फर होऊन त्यांच्या ऑफिस मध्ये आली होती. तिची हुशारी,तिचा मेहनती, लाघवी आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, ह्यावर तो उस्फुर्त पणाने बोलत असताना ती सारखी लाजत होती. तिची ती अदब, ते रूप, तिच्यातली शालीनता माझ्या मनाला इतकी भावली की मला हवी होती ती ‘स्त्री’ हीच आहे आणि परमेश्वराने हीची निर्मिती फक्त माझ्यासाठीच केली असावी असं माझं अंतर्मन मला वारंवार सांगत होतं. माझी ओळख करून देताना ती सुध्दा मला भरल्या डोळ्यांनी पाहत असल्याची माझी खात्री झाली.दोन भिन्न शरीरे पण मन आणि आत्मा एकच असावा ह्याची प्रचिती आम्हा दोघानाही येत असावी. सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्या गाण्यांची आणि त्यात ‘रफी साहेबांची’ ही सुध्दा चाहती आहे हे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. परमेश्वर एखाद्यावर कृपा करतो म्हणजे काय, आणि ति किती असू शकते. ह्याची मनोमन खात्री झाली. सुमित्रा माझीच होणार असेल तर तिचा प्रत्येक शब्द मी आयुष्यभर झेलायला माझे मन जर तयार आहे, तर तिच्यासाठी मी आज जीव ओतून रफी साहेबांची गाणी का गाऊ नये………(०७)
***********************
……सुमित्रा…..(०७)
“श्री” च्या वाढदिवसाचा आणि त्यातील माझ्या गाण्याचा कार्यक्रम फारच छान झाला.परमेश्वराच्या कृपेने आपणहून माझ्या जवळ येत ‘सुमित्रा’ ने माझ्या हातात आपला नाजूक, कोमल, गुलाबी छटा असलेला हात देत, माझे मनापासून, अगदी तिच्या हृदयापासून सुहास्य वदनाने अभिनंदन केले. माझ्या आईची आठवण काढीत, कुलदेवतेचे “श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा” ह्यांचे मी मनापासून आभार मानले.त्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या आईच्या मृत्यू नंतर गेल्या दोन वर्षात माझ्या मनासारखे काही समाधानकारक असे झाले असेल, काही चांगले घडले असेल, तर ते आज तिची भेट होणे, आणि ती माझ्या सानिध्यात येणे, हे होय… माझी आई सुद्धा दिसायला खूप सालस, सुंदर अशी होती. आईच्या प्रेमानंतर माझ्या आयुष्यात जर मला खरे प्रेम कोणा ‘स्त्री’ कडून लाभेल, तर ती ‘सुमित्राच’ असेल असे माझे अंतर्मन मला खुणावत होते. तिच्या स्पर्शात आत्ता मला तिच ‘माया ‘ जाणवली. सुदैवाने सुमित्रा माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून आली तर खरे प्रेम आणि माया ज्याला मी सध्या मुकलोय, ते मला तिच भरभरुन देईल ह्यात शंका नाही… मला असं वाटतं की प्रत्येक पुरुष आपल्या पत्नी मध्ये कुठेतरी आपल्या आईचा अंश आणि स्त्री आपल्या पती मध्ये तीच्या वडिलांचा अंश शोधत असावेत. नाहीतरी “स्त्री ही क्षणिक कालची पत्नी आणि अनंत कालची माता असते.” असं म्हणतात…. एक गोष्ट नक्की की वडिलांचे प्रेम, त्यांचा आधार आणि त्यांच्याकडून चांगली शिकवण ही आपल्याला मिळतेच, पण जी ताकद आईच्या प्रेमात, मायेत आणि वात्सल्यात आहे, ती जगात कोणातही नाही. परमेश्वरा नंतर जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो आईचाच. म्हणूनच बहुधा परमेश्वराला आपण “माऊली” म्हणतो. त्या परमेश्वराला आपण कधी बघू शकत नाही. आपली तेवढी श्रद्धा ही नसते आणि भक्ती देखील….. लहानपणी “आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून “श्री” काराच्या नंतर शिकरे…. अ…आ… ई” …. हे खुद्द आईनेच मला शिकविले असले, आणि ती जरी “श्री साईबाबांची” भक्ती करायची, तरी मला पुढे असं वाटायला लागलं, की तिने लहानपणी मला, “प्रथम भक्ती करावी, तर आईची… आणि मग साई ची” … असं शिकवलं असतं तरी फारसं बिघडलं नसतं. कारण त्या माऊलीची सेवा हीच परमेश्वराची सेवा नव्हे का?…. श्री ने सुमित्रा आणि मला एकांतात बोलायला मिळावे म्हणून मुद्दाम तिला माझ्या जवळ सोफ्यावर बसायची विनंती करून तो बाकी पाहुण्यांना भेटायला गेला. मला तिचा सहवास हीच मोठी ‘पर्वणी’ होती. बाकी सगळे खाण्या पिण्यात दंग होते. मी ड्रिंक्स करीत नाही हे कळल्यावर ती मनोमन सुखावली…. सुमित्रा सुध्दा मितभाषी वाटली. मी कमी बोलतो पण एखादी व्यक्ती आवडली, मनाला भावली की माझ्या मनातले सर्व काही ओठावर यायला वेळ लागत नाही. मी माझ्या आवडी निवडी बद्दल मुद्दाम तिच्याशी हातचे न राखता बोलत होतो. ती सर्व मन लावून न कंटाळता ऐकत होती. “शी ॲपीअर्ड टू बी अ गूड लिस्टनर” समोरच्याला बोलता करणे आणि त्याच बरोबर ते मनलावून ऐकणे, ही सुध्दा एक कला आहे आणि ती कला तिला अवगत असल्याचे माझ्या लक्षात आले… मी तिला उद्देशून म्हटलेले तिच्यावरील, तिच्या रुपावरील ते स्तुती गीत “हुस्न वाले तेरा जवाब नही” तिला इतके आवडले होते की शेवटी तिच्याही ओठावर ते शब्द घोळत होते आणि ती गुणगुणत असल्याचे, सर्वांनी स्पष्ट ऐकले होते. … आणि आता तिने मला, ते गीत ‘मी फक्त तिच्यासाठीच गायल्याचे’ आणि ‘माझी तीच्या बद्धलची भावना खरोखरच तशी असल्याची’ माझ्याकडुन खात्री सुध्दा करून घेतली…. तिच्यासाठी रफी साहेबांची आणखीन दोन गाणी. चौदहवी का चाँद हो। आणि… एय गुलबदन एय गुलबदन। माझ्या ओठावर होती… कोणत्या स्त्रीला आपली अशी स्तुती एखाद्या पुरुषाकडून आणि ती सुद्धा चारचौघात आवडणार नाही म्हणा…. मी तसा “इमपेशंट” आहे.आता मी सुध्दा माझे नशीब आजमावण्यासाठी ‘देवाचे नामस्मरण’ करीत आणि माझे प्रेम माझ्या डोळ्यातून व्यक्त करीत ….. पुढे झालो….. “मित्रा” आय रिअली लाईक अँड लव्ह यू” असे म्हणत पटकन माझा उजवा हात तिच्या पुढे केला….. माझ्या नजरेतील भाव टिपत आणि तिच्या डोळ्यांची पापणी न हलविता ति पुढे झाली, आणि तिचा हात सुध्दा परमेश्वर कृपेने माझ्या हातात मिळाला. आमच्या दोघांच्या भावना आणि हृदयाची स्पंदने एकत्र होऊन हातातून एकमेकांच्या मनाच्या गाभाऱ्यातील “प्रेमदेवते” पुढे नतमस्तक झाली……. “थँकस् अ लॉट” मी उस्फुर्त पणे म्हणालो….. “पण मला अंतर देणार नाही ना?” ह्या तिच्या प्रश्नावर आणि तिच्या पाणावलेल्या डोळ्यात खोलवर नजर देताना माझेही डोळे पाणावले…..अश्रूंना सुध्दा अश्रूंची साथ हवी हवीशी वाटत असावी…… माझ्या आईची मला प्रकर्षाने आठवण झाली…. “सुधीर तुला चांगली बायको मिळेल,आणि मगच तू खरा सुखी होशील.” आईचे ते शेवटचे शब्द माझ्या कानात घुमत होते.माझ्या कुलदेवतेची आज माझ्यावर ‘कृपा’ झाली होती ….. स्वरांना, सुरेल साथ लाभून उर्वरित जीवनाची सरगम आता तालात डोलू लागल्याची नांदी झाली. आणि माझ्या ह्या बेसूर जीवनाला ह्या पुढे सप्त सुरांची साथ मिळण्याचं भाग्य लाभणार आहे, ह्याची मनोमन खात्री झाली……….(०८)
***********************
……सुमित्रा…..(०८)
“श्री” च्या चेहेऱ्यावर मी पाहत असलेला हा आत्ताचा आनंद आणि समाधान पाहून मनाला बरं वाटलं.पण हे समाधान फक्त ‘स्वरा’ चा उत्तम रीतीने झालेला ‘नामकरण’ विधी आणि त्याचा साजरा झालेला ‘सिल्व्हर जूबीली बर्थ डे’ हेच नव्हतं. तर सुमित्रा आणि माझी भेट घडवून आम्हाला एकत्र आणण्याची त्याची मनीषा पूर्णपणे सफल झाल्याचं,जेव्हा ‘सानिका वहिनी’ मला म्हणाल्या,तेव्हा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आजच्या पार्टीचे त्या उभयतांनी मुद्दाम आयोजन केले होते. अश्या पार्टीला यायला खरंतर ‘सुमित्राला’ आवडत नाही हे श्री ला पूर्णपणे ठाऊक होतं. तिचा नकार मिळूनही, तिने जरूर यावं ह्यासाठी त्या दोघांनी तिची बरीच आर्जव केली होती. त्या साठी त्याने घेतलेली मेहनत, आणि त्याची सांपत्तिक स्थिती नसतानाही त्याने आजचा केलेला सर्व खर्च. आणि शेवटी आम्हाला एकत्र पाहून त्याला झालेला अत्यानंद, हा एक ‘मित्र’ दुसऱ्या’ मित्राच्या ‘सुखासाठी काय काय त्रास घेतो आणि मनापासून कसे प्रयत्न करतो ह्याचे बोलके उदाहरण होते. माझेच नशीब थोर आणि माझ्या आईच्या आणि कुलदेवतेच्या, कृपाशीर्वादानेच हे घडले असावे….. मी परत घरी जातांना ,रात्रीचे १० वाजले असल्याने सुमित्रा ला माझ्या गाडीतून तिच्या घरी सोडून पुढे जावे हा माझा ‘मानस’ सुध्दा नेमका त्या उभयतांनी सुमित्रा ला बोलून दाखवला, स्त्रीसुलभ लज्जेने, तिने थोडे आढेवेढे घेतले, पण वरच्याच्याही मनात आज माझी इच्छा पूर्ण करण्याचे नक्कीच असावे. ती गाडीतून उतरतांना पुन्हा लवकरच भेटण्याचे तिच्याकडून माझ्या विनंतीला मिळालेल्या आश्वासना बद्धल मी परत तिचे आभार मानले… “गूड नाईट, सी यू, आय ॲम रिअली ओबलाईजड” म्हणत तिच्या सोसायटीच्या गेट मधून ती आत जाई पर्यंत मी कार बाहेर उभा राहून तिला पाठमोरी न्याहाळत होतो. तिच्या त्या लांबसडक काळ्याभोर कुरळ्या केसांच्या वेणीत माझे मन गुंतले असताना, मानेला झटका देत उजव्या खांद्यावरून तो केसांचा शेपटा पुढे घेत तिने मागे वळून तसेच मिनिटभर जागच्या जागी उभे राहून, हात उंचावित” गूड बाय, गूड नाईट” केले… घरी पोहोचताच गेटवर माझ्या हॉर्न ला आतून माझ्या लाडक्या “सोनी” ने नेहमी प्रमाणेच “प्रेमाचे” भुंकत माझे स्वागत केले. कृष्णा मावशीने सोनीच्या मला दिलेल्या प्रतिसादावरून मी आल्याचे ओळखून, दार उघडताच सोनी ने नेहमी पेक्षा जास्त वेळ माझ्या अंगावर उड्या मारीत, मी तिला उचलून घेईपर्यंत तिची ती अधीरता तशीच कायम ठेवीत, अगोदर माझे पाय चाटून आणि आता चेहरा चाटित कानात बराच वेळ काही तरी सांगत होती. आज माझ्या अंगाला सूमित्राचा झालेला स्पर्श तिला जाणवला असावा. आणि कुठेतरी सोनीला सुध्दा माझ्या प्रेमाला सूमित्रा ने दिलेल्या प्रतिसादाची खूणगाठ सापडली असावी. आपल्या मालकाच्या सर्व भावना ह्या ईमानदार मुक्या प्राण्यां पर्यंत कश्या काय पोहोचतात हे एक कोडेच आहे. माझा राग, माझा मूड सोनीने सतत सांभाळला आहे. हातपाय धुवून नेहमी प्रमाणे “आई आणि पप्पांच्या” फोटोला नमस्कार केला. आज येताना मुद्दाम आईच्या आवडीच्या ‘मोगऱ्याच्या’ फुलांचा हार आणला होता. अगरबत्ती फोटोला दाखवून आणि सर्व घरात फिरवून, देवघरात लावली. फोटोतील आईच्या चेहेऱ्यावर आज मला ‘स्मित’ जाणवले. मला मनासारखी सहचारिणी मिळणार, बहुधा म्हणूनच ती सुद्धा खुश असावी. लहानपणी पप्पा गेल्यावर आमच्यावर खूप वाईट दिवस आले होते. आईच्या साधेपणाचे फायदा घेत अनिल काकांनी लबाडीने इस्टेटीचा बराच वाटा आपल्या नावावर करून घेतला होता. पुढे आईनेच माझ्या साठी पप्पांच्या बिजनेस मध्ये बरीच मेहनत करून माझे शिक्षण पूर्ण केले. आणि आता कुठे चांगले दिवस येत होते तेव्हाच ती मला सोडून गेली होती…. लहानपणी शाळेत दाखविलेल्या लहान मुलांच्या जीवनावर आधारित “जागृती” ह्या चित्रपटातील आई वरच्या गीताची आज प्रकर्षाने आठवण झाली. लहान पणी ‘आशाताईंच्या’ त्या गीतावर मी ढसढसा रडलो होतो. आज तेच गीत पुन्हा ओठावर येत होते. आता आई असती तर सुमित्रा च्या सहवासाने मी आईला सुखात ठेवले असते. आईच्या चेहेऱ्यावर आज समाधान दिसले…. “आपण सर्व पशू, पक्षी, मुके प्राणी ह्यांच्यावर प्रेम करावे. “आईच्या ‘भुतदयेच्या’ ह्या शिकवणी मुळे मी लहानपणी घरात सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी, पाळले होते…. कसे कोणास ठाऊक पण आज आईच्या फोटोसकट, सोनी, मनू, मिठू आणि रंगबेरंगी लव्ह बर्डस ह्या माझ्या सर्व सवंगड्यांच्या चेहेऱ्यावर मला स्मित दिसत होते. सर्व आनंदात असल्याचे मी अनुभवत होतो.माझ्या आईचा आशिर्वाद आणि स्वर्गातून तिने कृपेच्या फुलांची माझ्या मस्तकावर केलेली उधळण ह्या मुळे नतमस्तक होत माझे दोन्ही हात पुन्हा आपोआप तिच्या फोटोपुढे जोडले गेले…… सुमित्रा कडून आईची माया आणि प्रेम मिळेल ही आशाच बहुधा आज आमच्या सर्वांचे मन प्रफुल्लित करून गेली असावी………….(०९)
***********************
……सुमित्रा…..(०९)
तसं पाहता,एरव्ही ऑफिस मधून मी रात्री ९ पर्यंत घरी आल्यावर १० पर्यंत जेवण वैगेरे आटपून ह्या माझ्या घरच्या सवंगड्यां बरोबर गप्पा मारून मगच झोपायला जातो.पण आज पार्टी मुळे लेट झाला होता तरी हे माझे मित्र माझ्या येण्याची वाट पाहत होते.’सोनी’ आणि ‘मनू’ तर माझ्या पायाशी बसून माझ्याकडे निरखून बघत होते.आपल्या मालकाचा मूड आज काही विशेष आहे हे त्यांना उमगले असावे.खरं तर कुत्रा आणि मांजर ह्यांचं विशेष काही पटत नाही पण सोनी कुत्री असून आणि मनू हा एक वस्ताद बोका असूनही त्यांची चांगलीच मैत्री आहे.सोनी माझे पाय चाटून आपले प्रेम व्यक्त करते तर मनूला आपले अंग माझ्या पायांवर रगडून आपलेच लाड करून घ्यायचे असतात. G O D गॉड च्या उलट असलेला हा D O G डॉग.हा योगायोग नसून ही परमेश्वराची मुद्दाम केलेली निर्मिती असावी.परमेश्वरा नंतर ह्या जगात असलेला,आपली खरी काळजी घेणारा असा सच्चा प्राणी कुत्राच आहे.दुसऱ्या क्रमांकावर मालकावर जीवापाड प्रेम करणारा घोडा असावा.म्हणूनच बहुधा आमच्या घरातील देवांच्या फोटोत,दत्तात्रेयांच्या पुढ्यात कुत्रे,आणि साईबाबांच्या जवळ घोडा मी सतत पाहत आलो आहे.मालकाच्या भावनांना जपणारा.त्याच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करणारा हा मुका जीव,आपला जीव धोक्यात घालून मालकाचे रक्षण करायला मागे पुढे पाहणार नाही.ज्याला “अनफॅदमेबल लव्ह ” म्हणतात ते खरे खुरे प्रेम करणारा हा प्राणी माझा सर्वात लाडका आहे.शिवाजी महाराजांच्या ‘वाघ्या’ कुत्र्याने आणि ‘राणा प्रताप चव्हाण’ च्या ‘चेतक’ घोड्याने धन्या साठी आपल्या जीवाचे बलिदान दिल्याचे आपला इतिहासच सांगतो.माझी आई गेल्यावर आमच्या “सोनी” ने अन्न त्याग केला होता,जवळ जवळ ती मरायलाच टेकली होती.कशी बशी शेवटी चुच कारून तिचे लाड करून तिच्याशी बोलत बसलो,”सोनू तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही,आणि तुझ्याशी बोलणार पण नाही ” असं तिला मांडीवर घेऊन बोललो.तेव्हा माझ्या नजरेतील अश्रूंचा मान राखीत,माझ्या चेहेऱ्याला चाटून मगच तिने आपले उपोषण सोडलं आणि ती परत जेवायला लागली.कुत्रा सदैव माणसाबरोबर राहणारा प्राणी आहे, उलट मांजर हे.’ वास्तू ‘ ला धरून राहते.कुत्रा कधीही चोरून खाणार नाही पण मांजर चोरून दूध प्यायला कमी करणार नाही.पण आमची सोनी आणि मनू दोघेही माझ्या आज्ञेत आहेत.मी जेवे पर्यंत बिचारे तसेच आपल्याला खाऊ देई पर्यंत बाजूला बसून वाट पाहत राहतात.म्हणूनच कृष्णा मावशींना मी ताकीद देऊन ठेवली आहे की माझे ताट वाढतांना त्यांचेही जेवण तयार ठेवा.आज मी जेवायला घरी नाही म्हटल्यावर बिचारे दोघेही उपाशी बसून होते.मगाशी मीच त्यांना जेवायला दिलं… ‘मिठू’ आणि आमचे ‘ लव्ह बर्डस ‘ ह्यांनी मी येताच बराच गोंगाट केला होता,आत्ता मात्र ते शांत आहेत.मी ही आता विश्रांती घ्यावी असे बहुधा ते मला सुचवीत असावे.कृष्णा मावशींना मी मगाशीच त्यांच्या खोलीत झोपायला पाठविले होते.सकाळी त्या बिचाऱ्या खूप लवकर उठून कामाला लागतात…. मी माझ्या बेडरूम मध्ये गेलो तशी सोनिही बेड खाली जाऊन बसली…..बराच वेळ सुमित्रा ची ती देखणी मूर्ती माझ्या डोळ्यापुढे सारखी येत होती.ती दिसायला तर सुंदर आहेच पण अतिशय सालस आणि त्यात तिचा स्वभाव सुध्दा खूप चांगला आहे,ती अतिशय नाजूक आणि शांतही आहे. सतत आपण तिच्याशी बोलत राहावं,तीच्या कडेच सारखं बघत राहावं असं मला वाटतं, ते शारीरिक आकर्षण नसून आम्ही ‘सोल मेट्स’ असावेत.कारण अशी ही अनामिक ओढ शारीरिक नसून आत्म्याचीच असावी.तिला पहील्यांदाच बघून,भेटून मला अशी ओढ वाटण्या इतके तीचे व्यक्तिमत्व सुध्दा दांडगे आहे. ह्यात शंकाच नाही.असं तिला सुंदर घडवताना परमेश्वराने विशेष लक्ष दिले असावे.आणि आता माझ्यावर विशेष कृपाही तो करीत असावा… तिच्या विचारात बहुधा आजची रात्र सरून जाणार असे वाटत होते.आत्ता तिला प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते . स्वप्नात ती नक्की भेटेल ह्याची मला खात्री होती..बरेच वेळा स्वप्नांचं जग हेच खरं तर सुंदर जग आहे,हे मी अनुभवले आहे.ज्या गोष्टी प्रत्यक्षात करायला आपल्याला जमत नाहीत ,आपण त्या करायला असमर्थ असतो किव्वा त्या करायला धजत नाही त्या स्वप्न रूपाने पुऱ्या होतात.माझी आई गेल्यापासून मला तिला भेटण्याची माझी इच्छा सुद्धा ही स्वप्नच पुरी करत असतात. आपल्या मनीषा पूर्ण करण्याचं ‘दिवास्वप्न ‘ सुद्धा आपण पाहत असतो.आणि ते प्रत्यक्षात उतरल्यावरचा आनंद काही औरच असतो.सुमित्रा सारखी सहचारिणी मला मिळणं हे माझंच नव्हे तर माझ्या आईचे देखील स्वप्न आहे.आता परमेश्वर ते प्रत्यक्षात कसे काय उतरवितो ते काळच ठरवील……(१०)
***********************
……सुमित्रा…..(१०)
रात्री तिच्याच विचारात बराच वेळ मी जागा होतो.डोळ्या पुढून तिचे ते लोभसवाणे रूप हटतच नव्हते,हटावे असे वाटतही नव्हते.एखाद्या स्त्री बद्धल मला इतके असे काही वाटेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते आणि डोळा लागताच स्वप्नात ती स्वतः स्वर्गातून एखादी अप्सरा, कुशल नृत्यांगने करीत फुलांच्या पायघडीवरून अलगद पदंन्यास करीत यावी, त्या प्रमाणे माझ्या समोर येऊन स्मितहास्य करीत उभी राहीली.तिच्याकडे निरखून पाहत असताना तिच्या डोळ्यात मला माझ्या आईचाच भास वारंवार होत होता.मी संभ्रमात पडलो.तिचा हात हातात घेऊन मग मीच तिला आमच्या देवघरात घेऊन गेलो.आईच्या फोटो पुढे आम्ही उभे होतो पण आता आई च्या फोटोत आई नव्हतीच.तिथे मला सुमित्राच दिसत होती.मला काही कळेच ना.मी जागा झालो.आणिअसं विचित्र स्वप्न का पडलं ह्याचाच विचार करीत होतो…. श्री च्या घरी,आणि तिच्या सोसायटीच्या गेटवर देखील, सुमित्रा ने पुन्हा भेटण्याचे ‘ प्रॉमिस ‘ केले होते.आम्ही कालच तर भेटलो होतो.पण बरेच दिवस झाल्या सारखे वाटून ती लगेच भेटावी अशी इच्छा होती.आज रविवार ऑफिसला सुट्टी,मी श्री ला फोन करून “प्लीज तिला रिक्वेस्ट करून,आज तिला बरोबर घेऊन माझ्या घरी तुम्ही याल का ? ” असे विचारून संध्याकाळी काही करून ती यावी अशी इच्छा प्रकट केली.श्री काहीही करून तिला पटवून माझ्याकडे आणीलच ह्याची मला खात्री होती.ती याविच म्हणून आईच्या फोटोला उदबत्ती दाखवताना आई पुढे तशी प्रार्थना सुध्दा केली. ऑफिच चे काही काम करायचे उरले होते,ते ही उरकून घेतले,पण ते करतांना सुध्दा माझे लक्ष आणि मन तीच्यातच गुंतले होते…..एखाद्याचे वेड लागणे,त्या व्यक्तीचा ध्यास लागणे, हे बहुधा हेच असावे.आई सुद्धा म्हणायची सुधीरच्या मनात एखादी गोष्ट,एखादी कल्पना आली की ती प्रत्यक्ष घडत नाही तो पर्यंत तो वेडापिसा होतो….खरतर मी वेडा नसतो पण “अनईझी” नक्कीच असतो…..सहा वाजेपर्यंत ते दोघे येणार हे कळल्यापासून मी सारखी त्यांचीच वाट पाहत होतो…. आज प्रथमच तिच्या पदस्पर्शाने माझी ही वास्तू पावन होणार होती.आज आई हवी होती.तिला सुमित्रा नक्कीच आवडली असती…. बाहेर कोणी अनोळखी आलं की लगेच ” मिठू” च्या पिंजऱ्यातील त्याच्या येरझऱ्या वाढतात,आणि “कोरे.. तो…..कोरे…तो” असा तो ओरडायला लागला,की मला लगेच माझ्याकडे कोणीतरी पाहुणा आल्याची खबर मिळते.सोनी सुध्दा भुंकून मला ‘ ऍलर्ट’ करतेच…..पण आज सोनी भुंकलीच नाही.मी खिडकीतून खाली पाहिले.. श्री आणि बरोबर सुमित्रा पण आल्याचे मी पाहिले.कृष्णा मावशी श्री ला ओळखत होत्या पण आज त्याच्याबरोबर सानिका नव्हती त्यामुळे त्या थोड्या गोंधळल्या.तो पर्यंत वरच्या बेडरूम मधून मी खाली येऊन त्या दोघांचे स्वागत केले.आत येता क्षणीच सोनी तिच्या पाया कडे घुटमळू लागली,बऱ्याच वर्षांची त्यांची ओळख असल्यासारखी सोनी तिच्या पायाला चाटू लागली. मला आणि श्री ला सुध्दा आश्चर्य वाटले.”धीस वॉज समथिंग स्ट्रेंज”.वास्तविक अनोळख्या सुमित्रा वर सोनीने भुंकण्या एवजी बऱ्याच वर्षांची त्यांची मैत्री असल्या सारखी वागत होती.सुमित्रा ने न घाबरता उलट तिला मांडीवर घेऊन ती सोनीला गोंजारत होती.सोनिलाही सुमित्रा आवडल्याचे पाहून मला खूप बरं वाटलं.मिठू पण गोड गोड शिळ घालून त्यालाही आनंद झाल्याचे दाखवत होता.हॉल मधील लव्ह बर्डस सुद्धा खुष होऊन चोचीत चोच घालून आपले ही प्रेम व्यक्त करीत होते.त्यांचे स्वागत करण्याच्या नादात,बोलण्याच्या नादात हॉल चा दरवाजा तसाच उघडा राहिला होता…आता बाहेरून आलेल्या वाऱ्याच्या झोता बरोबर बाहेरील गार्डन मधील गुलाबाच्या फुलांच्या मधुर सुवासिक वासाने मन प्रफुल्लित झालं.एकंदरित सुमित्रा च्या आमच्या घरातील पहिल्याच आगमनात वास्तू देवतेची सुध्दा कृपा तिच्या रुपात झाल्याची पावती मला मिळाली.तीला चाहा पेक्षा कॉफी आवडते म्हणून आम्हा सर्वांसाठी कृष्णा मावशी कॉफी करे पर्यंत सुमित्रा स्वतःहून उठून आमच्या देवघरात जाते आहे हे पाहून आश्चर्य व्यक्त करीत मी ही बरोबर गेलो. कुलदेवतेला नमस्कार करून, माझ्या आई वडिलांच्या फोटोलाही तिने मनःपूर्वक नमस्कार केला.ह्या सर्वांचे आशिर्वाद आम्हाला नक्कीच लाभतील ह्याची मनाला खात्री झाली.कॉफी नंतर आम्हाला बोलायला सवड मिळावी म्हणून श्री ने आमची रजा घेतली.वेळात वेळ काढून बिचारा श्री माझ्यासाठी तिला घेऊन आला होता.माझ्या गाडीतून तिला घरी पोहचविण्याची जबाबदारी माझीच होती.आम्ही वर माझ्या बेडरूम मध्ये एकमेकांच्या कौटुंबिक विषयावर ,शिक्षणा बद्धल बऱ्याच गप्पा मारल्या.माझं माझ्या आईवडलांवर विशेषतः आई वर असलेल्या प्रेमाचा तिला मनापासून आनंद झाल्याचं मी तिच्या चेहेऱ्यावर पाहत होतो.तिच्या आग्रहास्तव तिच्या बद्धल च्या माझ्या भावना व्यक्त होतील असे आणि तिला सुद्धा आवडणारे रफी साहेबांचे ‘आखरी दाव ‘ ह्या चित्रपटातील गाणे तिच्या आग्रहावरून म्हटलं.ते म्हणत असताना ती माझ्या आवाजाला आणि गाण्यातून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावनांना अनुसरून देत असलेली दाद माझा उत्साह द्विगुणित करीत होती.तिचे ते सोज्वळ रूप,निरागस डोळे,मानेला झटका देऊन लांब केसाच्या वेणीला खांद्यावरून आपल्या छातीवर घेण्याची तिची विशिष्ट लकब. एकंदरीत तिच्यातील ‘खानदानी अदा’ ह्यावर मी माझा जीव ओवाळून न टाकला तरच नवल………..(११)
***********************